नको ना रे राजा नको
असा माझ्यावर रूसुस
वड्यांवरचे तेल नको
वांग्यावर तू काढुस
संसार म्हणजे लागणार रे
भांड्याला भांड
पण मनातल्या संतापाला
तू हळुवारपणे सांड
तापलेल्या वातावरणात
एकान बसावं चूप
वाफाळलेल्या वरणभातावर
ओतेन मायेचं साजुक तूप
प्रेमाला असु द्यावी
रूसव्या फूगव्याची जोड
प्रेम म्हणजे लोणच्याची
आंबट तिखट फोड
थोडीशी थट्टा मस्करी
म्हणजे जगण्याची मजा
कोशिंबीर खाणे म्हणजे
का रे समजतोस तू सजा
जगणं झालय थोडं बेचव
येतेय जीवनाला झापड
प्रेमानं खा ना रे तू देते
कुरकुरीत मसाला पापड
भिजुया प्रेमाच्या पावसात
हो ना रे तू आता राजी
आला बघ रिमझिम पाऊस
देइन तुला गरम भजी
नको बुडवूस जास्त प्रेमात
अरे येतील मला मोड
निर्मळ अश्या प्रेमाला
नाही रे कशाचीच तोड
उमजले नाही कुणाला
हे अजीब गुलाबी कोडं
प्रेमाला उपमा नाही
ते असतं शिऱ्यापेक्षा गोड
– डॉ.सुभाष कटकदौंड