‘आज नगद.. कल उधार’. ‘मैंने उधार बेचा.. मैंने नगद बेचा.’
‘उधार एक जादू है.. हम देंगे.. आप गायब हो जाओगे’.
‘उधार सिर्फ ८०-९० साल के लोगों को ही दिया जाएगा.. वह भी उनके माता-पिता से पूछ कर.’
‘ग्राहक राजा होता है और राजा कभी उधार नहीं मांगता…’
अशा उधारी संदर्भातल्या पाट्या तुम्ही आम्ही बाजारात, दुकानाबाहेर नक्कीच वाचलेल्या असतील. व्यापार हा कोणताही असो… म्हणजे खरमुरे विकणाऱ्या पासून तर टाटा, बिर्ला, मुकेश अंबानी असो… या ‘उधारी’ नावाच्या रोगापासून प्रत्येक व्यापारी, दुकानदार दूर राहण्याचा प्रयत्न करीत असतो परंतु कितीही खबरदारी बाळगली तरी ‘उधारी शिवाय धंदा नाही”, हेच त्रिकालाबाधित सत्य आहे.. यात शंकाच नाही.
नेहमीच दुरून कन्नी मारणारा.. परंतु एखाद वेळी समोर भेटल्यावर उगाचच चेहऱ्यावर कृत्रिम हसू आणणारा परंतु मनातल्या मनात,”अं… खुपच शान मारतो .. पैसा काय याच्याच जवळ आहे का? असे तं लय पाहिले शान मारणारे… एक दिवस अशी पटकनी देईन ना!!! तवा समजीन..”, असा संवाद, मनातल्या मनात पुटपुटणाऱ्या माधवराव नावाच्या नातेवाईकाचा, कधी नव्हे तो घराबाहेर पडल्यावर, “ओ….नानाभाऊ… राम.. राम.. हो.. गुरु.”, असा मोठ्ठा, सावत्राम मिलाच्या भोंग्या सारखा आवाज कानावर पडला आणि इच्छा नसतानाही, कॉलेजला उशीर होत असतानाही, मला माझे दुचाकी स्वयंचलित वाहन बाजूला थांबवावे लागले.
“गेल्या दोन वर्षापासून या कोरोनामुळे, दसऱ्याची काही भेट गाठच नाही गुरु…. गळ्यात गळ्या तं मिळा… राजेहो…”, असं म्हणत त्यानी मला (त्याच्या मनातील डाव साधण्यासाठी) घट्ट मिठीच मारली. ‘हा अफजलखानाचा आपणास जीवे मारण्याचा डाव आहे’, हे ओळखण्या इतका, मी शिवाजीराजें सारखा हुशार जरी नसलो.. तरी ‘आता आपण प्रेमाच्या बाहुपाशात गुदमरुन नक्कीच मरणार आहोत..’, याचा अंदाज मात्र मला आलेला असल्यामुळे, अत्यंत शिताफीने मी त्याच्या मिठीतून दूर झालो. काही क्षण निरव शांतता… दोघांच्याही चेहऱ्यावर फक्त स्मित हास्य.. ‘शेवटच्या बॉलवर आपण याला कसेही त्रिफळा उडवीत,विकेट घेत, विजय मिळवूच’, अशा अविर्भावात मी…. पण दुसरीकडे तो मात्र, ‘एक बॉल.. सहा रन …अशा परिस्थितीतही आपण पाकिस्तानच्या रमीझ राजा सारखा षटकार मारुन, हा सामना आपल्याच बाजुला करून घेऊ…’, अशा भ्रामक कल्पनेतील… अजूनही तो… मात्र मैदान सोडण्यास तयार नव्हता.
आता मात्र त्याने नेमके माझ्या दुखत्या नसेवर बोट ठेवले होते. “काहो… वहिनी काही खाऊ घालते की नाही? वहिनी तं चालल्या पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे.. कलेकलेने वाढत. अन तुम्ही मात्र… अमावस्येच्या चंद्राप्रमाणे चाल्ले राजा कमी कमी होत… कशाची काळजी आहे बुवा?” असे म्हणत, त्यानी माझा हँडलवरचा हात आपल्या हातात घेतला. पहिल्यांदाच मला बायको आपल्या सोबत, डबलसीट नसल्याचा पश्चाताप झाला होता. ती जर का असती आणि तिने वरील, तिच्या बाबतीतले अलंकारिक भाषेतील, तिच्यावर उधळलेली मुक्ताफळे ऐकली असती… तर क्षणात आमच्या कुटुंबाने ( माऊलीने) दुर्गेचे रूप घेऊन या महिषासुरास ठार मारलेच होते म्हणून समजा… आणि मीही या संधीचा फायदा घेत आमच्या दुर्गा देवीचा वाघ होत.. (तसा मी बाहेर असतोच… फक्त घरी भूमिका तेवढी बदलते..) त्याच्या पायाचा नक्कीच चावा घेतला असता.
या सर्व रागाच्या आगीत तप्त लाल झालेल्या कोळश्याच्या भट्टीवर कल्हई काम झाल्यावर, पाण्याचा झबका मारून, भट्टी शांत करावी… तसा त्याने माझा हात हातात घेत, त्यावरून त्याचा हात मोठ्या आशेने फिरविला. (आम्ही दोघेही जातीने तांबटकारच असल्यामुळे वरील व्यवसायिक दाखल्याची अनुभूती दोघांच्याही मनात बहुदा आली असावी) बस!! त्या भट्टीवर, ते कल्हई केलेले भांडे, पाण्याच्या बकेटित बुडवून, शांत करत… त्याच भांड्यात आता हा माधवराव त्याचे इच्छित पक्वान्नं शिजविण्याच्या बेतात, मला स्पष्टच दिसत होता.
“धोका!! धोका!!!”, असा स्पष्टच आवाज त्याच्या स्पर्शातून मला येऊ लागला. एक हात माझ्या हाताच्या पंजाच्या खाली व दुसरा हात त्याच्यावर ठेवत, हलकासा दाब देत, त्याने आता शिकार जाळ्यात पकडलेली होती. “बकरा हलाल होत असताना, त्याच्या डोळ्यात त्याचे मरण दिसते म्हणे”… असे काही कट्टर मटन खाणारे म्हणतात.. (आपला त्याच्याशी काहीही संबंध नाही बरं… मटन कशाशी खातात,ते गोड की आंबट? हेही अजून आपल्याला माहीत नाही… नाहीतर उगाच घरात आमच्या माऊली (बायको) सोबत भांडण लावण्यास, काही मित्र तयारच बसले आहेत..) हे मी त्यावेळी अनुभवत होतो.
“मले माहित आहे.. नाना भाऊ म्हणजे.. मोठ्ठा मानूस… समाज नाव काढते तुमचे… कठीन प्रसंगी धावून येणारा देव माणूस म्हणजे… नानाभाऊ!!!”, हे ऐकल्यावर, बस्स! डोक्यावर काळा कपडा टाकत… फाशीसाठी तयार असलेला मी… सर्वांगाने थरथरत होतो.
“दहा हजाराचं काम करा,. लय ऐले होऊन राहिले, नाना भाऊ… इज्जतीचा सवाल आहे”… “अरे… पण माधवभाऊ… असे काय काम पडले?… कोणी आजारी आहे का?”.. मी आता जरा भाऊक होऊनच विचारपूस करण्यास सुरुवात केली होती. “आजारी होऊन मरन पत्करीन… पन त्याहीपेक्षा मोठं संघट आहे, नानाभाऊ.. काय सांगू?”, आतापर्यंत मोठा दुश्मन वाटत असलेला माधव, मला का कुणास ठाऊक? सासुरवाडीच्या लोकांसारखा, निरागस वाटायला लागला होता.. (“मी गीतेवर हात ठेवून शपथ घेतो की, जेही बोलेन खरे बोलेन…. खोटे बोलणार नाही…) “तीन वर्षाचा टॅक्स भरा… आज तरी आठवणीने”, असं खडसावून सांगत माझ्या हातात १५ हजार रुपये नेमकेच माऊलीने (बायकोने) कॉलेजमध्ये जाता जाता दिले होते. त्यातून काही एक विचार न करता, मी दानशूर कर्णाच्या आवेशात, बॅगमधून, पाकीटातले, माधवरावास, तटकन दहा हजार काढून दिलेत.
पंधरा दिवसांनी माधवरावांची बायको, दुपारी आमच्या माऊली सोबत एक विशेष भेट घेण्यासाठी आली होती. दुपारी चहाच्या वेळेवर आलेल्या मालती वहिनी, आमच्या सौभाग्यवतीं सोबत (माऊली सोबत) ट्वेंटी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकून आल्याच्या आनंदाने, गळ्यातील मंगळसूत्र दाखवत म्हणाल्या,” बघ.. मी तुला म्हटले होते ना!! आमचे हे (माधवराव) काहीही करतील.. डाका टाकतील… चोरी करतील… कुणालाही बेवकूब बनवून ( मलाच.. अजून कुणाला?) पैसे उधार मागतील… पण माझे गहान ठेवलेले मंगळसूत्र आनूनच देतील..”, हे ऐकून तर माझे दहा गेले पाच राहिले. (तसेही ते गेलेच होते.. व उरलेले पाच हजार रुपये, अजूनही बॅगेत होते.. पाकिटातून मान वर काढत.. माझ्याकडे थोडे मिश्किल हसत.)
“तू चहा देतेस.. की, जाऊ मी बाहेर प्यायला..?” कधी नव्हे मी भडकणारा, “ना ना भडके” तिने मात्र त्या माझ्या रागावण्याचे जराही मनावर घेतलेले नसल्यामुळे, मी आमच्या जठारपेठेतील ‘प्रेमाचा चहा’, या चहाच्या दुकानावर, माझे दुःख हलके करण्यासाठी बसलो. (कारण आपल्याला चकण्या सोबतचे दुसरे पेय जमत नाही ना!!! म्हणून..)
” विसरा ताण जगाचा… प्या चहा प्रेमाचा”… अशी पाटी वाचत, मी चहाचा घोट, फुक मारत.. मारत.. आपल्याच मनाशी मात्र बोलत होतो,” जाऊ दे ना नाना.. प्रेमाची उधारी चुकवली असे समजून विसरून जाऊ”..
“वो… भाऊ.. खुर्ची खाली करा. दहा रुपयाच्या चहात, अर्धा अर्धा तास बसणार का, एसीमध्ये? दुसरेही गिऱ्हाईक आहेत ना भाऊ?” मी भानावर येत दहा रुपयाची नोट, त्या चहावाल्या दुकान मालकास देत उगाच विचारले,” या तुमच्या प्रेमाच्या चहामुळे… प्रेमाच्या उधारीचे दुःख हलके होते का हो? आजही माधवराव जेंव्हाही भेटतात, तेव्हा त्यांच्या चेहर्यावर, मला एकच व्यापारीभाव, आनंद ओसंडून वाहताना दिसतो आणि तो म्हणजे, तुमने (म्हणजे मी) उधार बेचा…. मैने( माधवनी) नगद बेचा. (नव्हे.. नव्हे.. नगद खिंचा) माझी ‘प्रेमाची उधारी” अजूनही त्याच्या अंगावर तशीच कायम आहे. ती मला परत मिळावी, यासाठी मी कधीच प्रयत्नही करणार नाही. कारण जगात प्रेमच एक अशी गोष्ट आहे.. जी एक दुसऱ्यांच्या चुकांना माफ करण्यास शक्ती प्रदान करते.
(असे जरी असले.. तरी, माझ्या वाचक मित्रांनी, मला उधार मागू नये. कारण मी त्यांना वाचक समजत नसून ‘राजा’ समजतो आणि….. राजा कधीच उधार मागत नाही, हे मला चांगलेच
लेखक:-‘विठ्ठलसुत’
प्रा.डॉ.नाना विठ्ठलराव भडके. अकोला, महाराष्ट्र.
फोन नंबर:- 7720033936 (व्हाट्सअप)
9518572502 (व्हॉइस कॉल)
आम्ही साहित्यिक चे लेखक
Leave a Reply