वाट पहाणं किती त्रासदायक असत, हे समीरला आज पुन्हा जाणवलं. ‘साल, या पोरींना वेळच महत्वच नसत!’ त्याने सातव्या वेळेला आपल्या मनगटावरील घड्याळातवर नजर टाकली. आख्खे वीस मिनिट, तो या प्रेमदान हॉटेलच्या लॉन वर अंजलीची वाट पाहत होता! धिस इज टू मच! वेटर दोनदा ऑर्डरसाठी घुटमळून गेला होता. आता तर आसपासचे लोक पण त्याच्याकडे विचित्र नजरेने पहात होते. विशेषतः शेजारच्या टेबलवरील त्या दोन ‘झिरो ‘ फिगरवाल्या. अंजलीच हे नेहमीचंच आहे. वेळ द्यायची अन उशिरा यायचं. मग कारण द्यायची! गोड खळीदार हसायचं! झालं.! तीच ते ‘खळीदार’ स्माईल पाहिलं कि, कसलं तिच्यावर रागावता येतंय? पण आज नेहमी सारखं ढेपाळायचं नाही, खडसावून विचारायचं! दोन मिनिटात तो पुन्हा वैतागला. त्याने मोबाईल काढला आणि तिला फोन केला.
“अंजली, कुठे आहेस? किती उशीर? “त्याने घुश्यात विचारले.
“कुठे आहे? अरे, मी तुझ्या मनातच आहे कि!” अंजलीच्या गोड आवाजाने तो मोहरला.
“यार, मजाक नको! लवकर म्हणजे खूप लवकर ये!”
“सम्या, समोर बघ! मी आलेलीच आहे!”
‘सम्या’ने समोर पहिले.
समोरून त्याची अंजली येत होती. ग्रेसफुल पावले टाकत. पांढऱ्या शुभ्र ड्रेस मध्ये. स्लिम असल्याने ती आहे त्यापेक्षा ज्यास्तच उंच भासत होती. दोन पंख आणि हाती मॅजिक वॉर्ड दिली कि, ती फेयरलि टेल्स मधली ‘परी’च दिसली असती! वाऱ्यावर भुरभरणारे केस आणि ती ओढणी, तिच्या ऐटबाज चालीची मोहकता वाढवत होती. पण तिचे उडणाऱ्या केसांकडे किंवा ओढणीकडे लक्ष नव्हते. ती अर्जुनाच्या एकाग्रतेने, सम्याकडे पहात होती. तिला वाटपहाणारा सम्या जाम आवडायचा. आणि समीरचे लक्ष मात्र तिच्या पायाकडे होते. डौलदार पावले टाकताना, तिच्या पायातील पैंजणाची लयबद्ध हालचाल, त्याच्या हृदयगतीशी एकरूप आल्याचा त्याला भास झाला. तशी ती त्याला ‘सगळीच’ आवडायची, पण तिचे बोलणे आणि चालणे खासच होते. एका शब्दात सांगायचे तर -हिप्नॉटायझिंग-होते! हे सारे समीरच्या बाजूने होते. तिच्या मनाचा थांगपत्ता आजून त्याला लागत नव्हता.
“हाय साम्य! कसला भडकतोस? तुला न जरा सुद्धा धीर धरवत नाही!” टेबलवर खांद्याची पर्स ठेवून, समोरच्या चेयर मध्ये विसावत अंजली म्हणाली.
“तू न दिलेली वेळ पळत नाहीस. मला उगाच लटकावून ठेवतेस. मग राग येतो!”
“इंतजार का मजा और होता है!”
“खड्यात घाल तुझा तो ‘इंतजार’! एखाद दिवशी तुझी वाट बघता, बघता मरून जाईन! मग कळेल, ‘इंतजार का मजा!’ ”
“तसा हि तू ‘जिवंत ‘ आहेसच कुठे? रोज ‘तुझ्यावर मरतो!’ म्हणून काबुल करतोस! काय?”
“दोन कॉफी!” जवळ आलेल्या वेटरला ऑर्डर देऊन तो तिच्या कडे वळला.
“सम्या, आज इतक्या घाईत का बोलावलंस?”
“आता मी जे सांगणार आहे ते खूप महत्वाचं आहे.”
“मला माहित आहे! ‘लव्ह यु!’ म्हणणार आहेस!”
“स्टुपिड! ते तर आहेच, पण त्याहून हि खास —”
अंजलीचा मोबाईल वाजला.
“हा, सर, बोला.” अंजली फोनमध्ये गुंतली, तश्या समीरच्या कपाळावर आठ्या पडल्या. साल मी महत्वाचा कि, तो भुक्कड बॉस? हिला आपली काहीच कदर नाही. आज मारे इतकी तयारी करून आलाय. का? तर हिला प्रपोज करायचंय! आंधळे गुरुजी कडून मूहूर्त आणि शुभ घडी काढून घेतली!(पाचशे रुपय गेले) या बयेने उशीर करून ती शुभ घडी घालवली. त्यात हे ‘बॉस’च मांजर आडवं आलाय.
तो अंजलीचा फोन कधी संपतो म्हणून, असाह्यतेने तिचा कडे पहात होता. अंजलीला त्याचा डोळ्यात संताप,अगतिकता,आणि संशय दिसत होता. तिने फोन स्पीकरवर केला. कारण मागे एकदा ‘तू फोनवर त्या बॉसशी काय गुलु गुलु बोलत असतेस?’ म्हणाला होता.
“अंजलीजी, कुठे आहेत तुम्ही?”
“सर, मी हॉटेल प्रेमदानच्या लॉनवर, मित्रांसोबत कॉफी एन्जॉय करतीयय”
इतकं सविस्तर सांगायची काही गरज? फक्त ‘कामात आहे.” म्हणून नसत का सांगता आलं असत? पण नाही! ती नेहमीच आपल्या पेक्षा ‘बॉसला’ ज्यास्तच प्रेफर करते.
“उद्या एक फ्रान्सचे डेलिगेशन येणार आहे.”
“हो सर, मला कल्पना आहे.”
“मला काही रेफरेन्सेस आणि आकडेवारी लागेल. डील मोठी आहे. तुम्हाला जमेल का यायला? का रोजीला बोलावू? पण ती खूप चुका करते.”
“रोजी नको सर, मी येते लागलीच!”
निघाली त्या बॉसच्या फोनवर! सारखी त्याच्या इशाऱ्यावर नाचत असते! आणि हा सुद्धा बावीस जणांचा स्टाफ सोडून ‘अंजलीजी-अंजलीजी ‘ करत असतो. दोघात काही शिजत तर नसेल ना? कोणास ठाऊक? अंजली सुंदर आणि स्मार्ट आहे. हा बॉस माझ्याच वयाचा, चांगला उंच, स्लिम, किंचित सावळा आणि श्रीमंत! दर वेळेस नवीन स्पोर्ट्स कार मध्ये दिसतो.
“अंजलीजी तुम्ही प्रेमदानलाच थांबा. मी जवळच आहे. पीकप करतो. चालेल ना?”
“मी वाट पहातीयय !” अंजलीने फोन कट केला.
समीर बेचैन झाला. अश्या घाईत तिला प्रपोज कसे करणार? हा बॉस म्हणजे ‘कबाब मी हड्डी!’ हे याच नेहमीचंच आहे. अंजली जरा जवळ आली कि हा फोन करून ‘बिबा’ घालतो! अन अंजली पण गुमान त्याच्या मागे जाते. माझे अंजलीवर प्रेम आहे हे तिला माहित आहे. पण तीच? आजवर कधी सिरियसली ‘लव्ह यू ‘ म्हणाली नाही. पण कधी स्पष्ट पणे नाकारलंहि नाही. हा सगळा घोळ मिटावा म्हणून आज तिला प्रपोज करण्याचा त्याने घाट घातला होता. पण सगळंच मुसळ केरात जाणार हे दिसत होत.
तेव्हड्यात तो सव्वासहा फुटाचा, हँडसम बॉस, दमदार पावले टाकत अंजली जवळ आला. उंची कपड्याचा सूट आणि फॉरेन डिओच्या मंद तरी, मर्दानी सुगंधात तो लपेटलेला होता. त्याला पाहून क्षणभर समीरला कॉप्लेक्स आला.
“सर, हा समीर, माझा मित्र, आणि समीर, हे माझे बॉस प्रथमेश. ” अंजलीने दोघांची ओळख करून दिली. चार दोन वेळेला समीरने प्रथमेशला दुरून पहिले होते, आज प्रत्यक्ष ओळख होत होती.
“हाय समीर, नाईस टू मीट यू!” प्रथमेशने पोलाईट स्माईल करत समीरशी हस्तालोंदन केले, अंजली कडे वळत,
“चला अंजलीजी. निघुयात!” म्हणून तो वळला सुद्धा. अंजलीने घाईत टेबलवरली पर्स उचलली आणि प्रथमेशला जॉईन झाली. ती दोघे वितळणाऱ्या डांबरासारख्या काळ्याढुस्स BMW मध्ये अदृश्य होजीस्तोवर समीरची नजर त्यांचा पाठलाग करत होती. अंजली त्याच्या शेजारी बसल्याची त्याच्या मनाने नोंद घेतली.
“वाव! काय ग्रँड पर्सनॅलिटी आहे! रियल हि-मॅन! लकी गर्ल! असा एखादा आपल्याला मिळाला पाहिजे! साली, जिंदगी सुधर जायेगी!” प्रथमेशच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पहात, त्या शेजारच्या ‘झिरो फिगर’ आपसात बोलत होत्या. पण हे वाक्य समीरच्या काळजाला भोक पडून गेले! समजा आपण अंजलीच्या जागी असतो आणि आपल्या समोर, समीर आणि प्रथमेश हे पारियाय असते तर? त्याच्या मनाने जो संकेत दिला, तो त्यालाच नर्व्हस करून गेला.
“बिल!” त्याने वेटरला आवाज दिला. त्यात त्याच्या रागाचे प्रतिबिंब ऐकणाऱ्याला जाणवत होते.
०००
चमकदार काळ्या कुळकुळीत कपड्याची कफनी, कपाळाच्यावर डोक्याला तसलाच बांधलेलं फडकं, पोळ्याच्या बैलाच्या गळ्यात असतास तश्या रंगी-बेरंगी टपोऱ्या मण्याच्या, स्फटिकाच्या, रुद्राक्षाच्या मळा, घातलेले माणूसा समोर, समीर बसलेला होता. तो ‘बाबा चंपालाल बंगाली’ होता!
‘बेपार, बेरोजगार, बेईमानयार, भूत-प्रेत, जारण-मारणं, कोरट -कचेरीका लफडा, दुष्मानपर काबू, तथा वशीकरण! सबका एक हि जवाब! बाबा चंपालाल बंगाली!! -हमारी किधरभी ब्रांच नाही है! नकली बाबासे सावधान! शनिचर बंद!’ वेड्या वाकड्या अक्षरात लिहलेल्या फळकुटछाप बोर्डाशेजारी बाबा आपली गांज्याची चिलीम, मनलावून डोळेमिटून ओढत बसला होता. तंद्री लागत होती. मधेच डोळे किलकिले करून, त्याने बावळट चेहऱ्याच्या समीरला पाहून घेतले. तरुण पोट्ट, म्हणजे नौकरीचा नाहीतर छोकरीचा प्रॉब्लेम असणार! एकंदर कपड्यावरून, शेजारी ठेवलेल्या लॅपटॉपच्या सॅकवरून नौकरीचा प्रॉब्लेम दिसत नव्हता! लव्ह लफडं! हीच पॉसिबिलीटी ज्यास्त होती!
“बाबासे कुछ मत छिपायो! बाबा सब जनता है! तेरी समस्या समझ गया!” बाबा चंपालाल, आपले लालभडक डोळे समीरवर रोखत गरजला.
“मै नायी बताया, फिर कैसा सम्झ्या?”
“मराठी बोल मला येत!” समीरची हिंदी एकून बाबा धास्तावून म्हणाला. त्याच काय कि हा चंप्या पूर्वी देवपूजा, सत्यनारायण असलीच कामे करायचा. पण इंटरनेटने त्याच्या धंद्याची माती केली. लोक रोजची ‘सुखकर्ता दुःखहर्ता —‘ आरती सुद्धा ऑनलाईन करू लागले! म्हणून त्याने हा धंदा सुरु केला होता.
” मग, सांगा बर माझा काय प्रॉब्लेम आहे?”
“एक लाडकी! उचिसी !”
बराबर!
“अजून!”
“तुझे डर लागत है !”
क्या बात है? साला खरच सॉलिड दिसतोय बाबा!
“मी काय करू?”
“तुझे जो करना सो तू कर! जो होनेवाला है, ओ रुकनेवाला नाही! पर मुझसे क्या चाहिये?”
” ‘ती’ माझ्या पासून दूर जायला नको, असा काही तरी उपाय सांगा!”
आच्छा म्हणजे पोरगी दुसरीकडे गुंतले हि भीती आहे याला. दुसरा कोणीतरी, याच्या पेक्षा सरस असण्याची शक्यता आहे. किंवा याच वन वे लव्ह असेल. हीच भितीतर एनकॅश करायची असते.
“ओ, जो दुसरा नौजवान है उस्का बंदोबस्त कराना है, या लाडकी को ‘वशीकरण ‘मे बांधना है?”
“दोन्ही!”
“पागल! एकही मिलेगा!”
“मला नाही आत्ता डिसाईड येत!” समीरने शरणागती पत्करली.
क्षणभर बाबा विचारात पडला. कालच त्याने एक खविस एका काळ्या गोफातल्या चांदीच्या छोट्याश्या पेटीत जखडला होता. तो प्रयोग किती यशस्वी झालाय हे त्याला पहायचे होते.
“इक फंडा है! होना क्या?”
“काय?”
“इक गलेका तावीत दूंगा. पेहन ले. तेरा जब निर्णय हो तब, तावीत के चांदिके पेटी पे दोनो हात रखकर उसे मांग लेना. तेरी एक इच्छा पुरी होगी! उसके बाद तावीत को बहते पनीमें बहा देना. याद रख, ये अभद्रशक्ती है, सम्भलकर इस्तमाल करना! ये सिधी चीज नाही देगा. ‘मुझे अमीर बना’ ऐसे मांगेगा तो नाही मिलेगा. पर ‘सामनेवाले से अमीर कर दे!’ ऐसा मांगेगा तो, तू ऊस सामनेवालेसे अमीर हो जाएगा, या ओ तुझसे गरीब हो जाएगा !”
समीरने काही न बोलता, पाचशेच्या दोन नोटा त्याच्या समोर ठेवल्या.
कवटीचे चित्र असलेल्या एका बोळक्यातून, बाबाने एक ताईत बाहेर काढला. त्याला करंगळीच्या जाडीची एक गोल पेटी होती. बाबाने त्याला कुंकवाची चिमट वाहिली. हातात काळेतीळ आणि मूठभर उदाची पावडर घेतली. डोळे मिटून तोंडाने अगम्य मंत्र म्हणत, तो ताईत,- आज कालच्या भाषेत – ऍक्टिव्हेट केला. उदाची मूठ कोपऱ्यातल्या रसरसल्या कुंडात टाकली. गप्पकन धुराचा लोट उठला. समीरच्या कपाळाला कुंडातली राख फासून त्याच्या गळ्यात तो ताईत, बाबाने स्वतःच्या हाताने बांधला! त्या चांदीच्या पेटीचा समीरच्या गळ्याला गारढोण स्पर्श होत होता. एखादा विषारी साप गळ्यात घातल्याची भावना समीरला होत होती. तो शहारला!
०००
सिनेमाची इंटरव्हल झाली. समीरने आपला मोर्च्या कॉफी काउंटरकडे वळवला. त्याने अंजलीला ‘येतेस का?’ म्हणून विचारले होते. पण नेहमी प्रमाणे तिला ऑफिसात ‘काम’ होते. कॉफीचा मग घेऊन तो थोडासा दूर जाऊन उभा राहिला. गरम कॉफीने त्याच्या जिभेला चटका दिला. कारण तो डोळे फाडून समोर पहात होता. अंजली! अंजली आणि प्रथमेश, एकाच बाटलीतून स्ट्राने कोला सिप करत होते! त्यांचे जगाकडे लक्ष्य नव्हते. ती दोघे आपसात गुलुगुलु गप्पा मारण्यात मग्न होते. कोला संपवून, ती जोडी समीरच्या पुढ्यातूनच गेली. पण त्याला नोटीस केले नव्हते! समीरच्या पायाखालची जमीन हादरली. एक अटीतटीचे युद्ध हरल्याची भावना त्याच्या मनाला चाटून गेली. आपण आपली ‘परी ‘ गमावली! प्रथमेश तिला आपल्यापेक्षा ज्यास्त जवळचा अन प्रिय आहे. म्हणूनच हल्ली ती आपल्याला टाळत असते. हि त्याची भावना कठोर सत्यात उतरत होती. ‘आपण तिला आवडत नाहीत’ हे त्याच्या पराभूत मनाने ‘सत्य’ म्हणून स्वीकारले!
सिनेमा तसाच सोडून तो मल्टिप्लेक्स बाहेर पडला.
०००
कालच्या अंजलीच्या वागण्याने समीर बेचैन झाला. सकाळी त्याने चारदा फोन लावला. नो रिप्ल्याय! काय ते, तो समजून गेला. तिच्या घरी जावून समक्ष जाब विचारावा असे एकदा त्याच्या मनात आले. पण त्याने काय झाले असते? एक तर ती घरी भेटणारच नव्हती, भेटली तरी काहीतरी थातुरमातुर कारण देऊन त्याची बोळवण करणार होती. त्याने तो बेत रद्द केला.
त्याने थंडगार पाण्याची बदली डोक्यावर उपडी करून घेतली. तश्याच ओल्याडोक्याने दोन्ही हात गळ्यातल्या ताईताच्या पेटीवर ठेवले. काय मागावे? डायरेक्ट बेनिफिट मागता येणार नव्हता. क्षणभर विचार करून त्याने डोळे बंद केले.
“या ताईतातील काळ्या शक्तीच्या दूता, अंजलीच्या प्रिय व्यक्तीचे मान, नको हात पाय मोडू दे! चांगला सहा महिने खटल्यावर पडला पाहिजे!”
क्षणभर त्याच्या हाताला तो ताईत गरम झाल्याचा भास झाला. आणि कोणीतरी खसकन ओढल्या सारखा गळ्यातून तुटून खाली पडला. ती चांदीची पेटी फुटली, त्यातून वाफ निघत होत्या! समीरने तो जमिनीवरला ताईत उचलला, घराशेजारच्या ओढ्यात टाकण्या साठी.
०००
आज चार दिवस झाले. समीरच्या मनाप्रमाणे काहीच घडत नव्हते. तो लंबू, प्रथमेश धट्टाकट्टा फिरत होता. साला, बाबा चंपालाल बंगाली, होपलेस निघाला. हजार रुपयाला चंदन लागलं! अंजलीचे चार-दोन मिस कॉल आणि तितकेच मेसेज आले होते. पण त्याने दुर्लक्ष केले होते. हि अंजली बहुदा दोन्ही डगरींवर पाय ठेवून उभी आहे. दोघांना खेळवत असावी. पण असे नाही. आपण जितके तिला ओळखतो त्यावरून, इतकी ती ‘डिप्लोमॅटिक’ नाही. पण तिचा प्रथमेशकडे जरा ज्यास्तच ओढा आहे! तिला भेटून स्पष्ट विचारण्याची वेळ आली आहे. आजच संध्याकाळी, काय तो सोक्षमोक्ष लावून टाकू! त्याने खिशातून मोबाईल काढला. अंजलीचा नंबर टॅप आणि फोन कानाला लावला. रिंग वाजत होती. त्याने रस्ता क्रॉस करायला पाऊल उचलले. फोन लवकर उचल ना यार!
कारचा हॉर्न आणि करकचून ब्रेक दाबल्याने होणारा आवाज, ऐकणाऱ्या लोकांचे काळीजाचे पाणी करून गेला!
०००
“सम्या, स्टुपिड! आबे रस्ता क्रॉस करताना, कशाला कानाला मोबाईल लावलास? रस्ता क्रॉस केल्यावर फोन केला अस्तास तर, काय जगबुडी आली असती? बर तर बर, एक पाय अन एक हातावरच भागलं! जीवाचं काही बर -वाईट झालं असत तर? मी काय झालं असत? याचा काही विचार?” अंजली एकीकडे समीरला रागवत होती, तर दुसरीकडे डोळे पुसत होती!
एक पाय अन एक हात प्ल्यास्टर मध्ये जखडून ते लटकावल्या स्तिथीत समीर हॉस्पिटलच्या बेडवर समाधानाने आडवा पडला होता. समाधानाने? हो समाधानानेच! साला, तो बाबा चंपालाल, पॉवरफुल निघाला! आपणही लकीच म्हणायचो! या अपघाताने दोन गोष्टी सिद्ध झाल्या होत्या. एक तर थोडक्यात जीव वाचला. ‘प्रिय व्यक्तीचे हात-पाय मोडू दे, ऐवजी आपण जर ‘त्याला मरण येऊ दे.’ असे त्या ताईताला मागितले असते तर? एव्हाना आपले उत्तर कार्य उरकून लोक घरी गेले असते! आणि दुसरे समाधान ‘तिची प्रिय व्यक्ती आपणच आहोत!’ हे पण झालाय कि!
— सु.र. कुलकर्णी.
आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय. पुन्हा भेटूच. Bye.
फारंच छान आणि परिणामकारक.कथेचा pace उत्तम असल्यामुळे सतत पुढे काय होईल याची उत्सुक्ता होती.मस्तं..लिहीत रहा..शुभेच्छा.