अशा अनेक व्यक्ती आहेत की, अगदी सामान्य स्थित असून, अतिशय कष्ट व प्रयत्न करून स्वतःचा उत्कर्ष केला. अशा व्यक्ती प्रसिद्ध पराङगमुख असतात. अशाच व्यक्तीची गाथा लिहिली आहे, वाचून प्रेरणा मिळेल याची खात्री आहे.
बालपण व शिक्षण
वडील गोपीनाथ मार्तंड काटेकर वाशीमचे राहणारे, तेथे तहसील कार्यालयात रीडर म्हणून नोकरीस होते. सरकारी नोकरी असल्याने बदली होत असे. तेथून त्यांची मूर्तिजापूर येथे बदली झाली. त्यांना चार अपत्य, सुधाकर हा दोन नंबरचा. त्याचा जन्म १३-०४-१९३४ रोजी मूर्तिजापूर येथे झाला. येथून वडिलांची बदली अकोला येथे झाली.
सर्व कुटुंब सुस्थितीत होते. अकोला येथे पहिलीत प्रवेश घेतला. तिसरी पर्यंतचे शिक्षण झाले. त्याच वेळेस वडिलांना सेवानिवृत्तीचा आदेश मिळाला. आणि समस्या निर्माण झाली. सुरुवातीस जिंनिंग कंपनीत काम केले. त्या नंतर नगर जिल्ह्यात पुणतांबा येथे वडील नोकरीस आले.
सुधाकरला शिक्षणासाठी मावशीकडे जावे लागले. पण मावशीचे लग्न झाल्यामुळे मामाकडे शिकाववयास यावे लागले. मामाचे गाव ब्राह्मणी त्या ठिकाणी पीठाची गिरणी नव्हती. तीन मैल, दोन पायली दळण डोक्यावर घेऊन जावे लागत असे. त्याच दरम्यान प्रपंच चालेना म्हणून सगळे ब्राम्हणीस आले. पंधरा दिवसानंतर आजोबांनी आईस विचारले. अने, – आईचे नाव अनुताई – किती दिवस राहणार?
आई – यांना नोकरी लागली की लगेच जाणार.
आजोबा – तू काय आमच्या तोंडाला पाने पुसायला आलीस. तू लगेच तुझ्या घरी जा.
प्रसंग आल्यावर आई वडील सुद्धा असे वागू शकतात.
पुढील वाटचाल
सुधाकरच्या मातोश्री अतिशय स्वाभिमानी. सगळेजण पुणतांबा येथे आलो. वडिलांना अकोला येथे नोकरी मिळाली. तेथील इंग्रजी शाळेत इयत्ता सहावीत प्रवेश घेतला. परंतु प्रपंच चालणे कठीण होते. शाळा सोडावी लागली. वडिलांच्या ओळखीचे एक गृहस्थ होते, ते सरफाच्या दुकानात मुनीम होते. त्यांनी त्या दुकानात कामास घेतले. तेथे सकाळी दुकान झाडून घेणे, मालकाच्या घरी रोज संध्याकाळी पाणी भरणे ही सर्व कामे करावी लागत असत. प्रसंगी उधारी वसूल करण्याकरता जावे लागत असे. चांगली नोकरी मिळण्याकरिता शिक्षण नव्हते, त्यामुळे आहे ती नोकरी करणे भाग होते. शिकण्याची इच्छा पण परिस्थिती प्रतिकूल.
वडिलांची नोकरी बदल
वडिलांना कोपरगाव तालुक्यातील, साकरवाडी येथील कारखान्यात नोकरी मिळाली. अकोल्याहुन सकरवाडीस आलो. सरकारी नोकरी असल्यामुळे वडिलांना पेन्शन मिळत होती, परंतु ती अपुरी पडत होती. तरीसुद्धा सकरवाडी येथील शाळेत इयत्ता सहावीत प्रवेश घेतला. इथे जर काळ अनुकूल झाल्यामुळे सुधाकरच्या सातवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले. त्या काळात सातवीची परीक्षा बोर्डाची परीक्षा असे. या परीक्षेला महत्व होते. या परीक्षेत तो ७४%गुण मिळवून पास झाला. त्यामुळे सगळ्यांनी कौतुक केले.
पुढील शिक्षण व नोकरी
सातवी उत्तीर्ण झाल्यावर पुणतांबा येथील हायस्कुलमध्ये प्रवेश घेतला. पण घरात आर्थिक अडचणी निर्माण होऊ लागल्या, त्यामुळे शिक्षण अर्धवट सोडून
नोकरी धरावी लागली.
आणि तिथेच ऑफिस मध्ये शिपाई म्हणून नोकरी करावी लागली. ऑफिस झाडण्यापासून सर्व कामे केली. ती नोकरी सोडून शेती खात्यात कौंटर म्हणून कामास लागलो. म्हणजे उसाची लागवड केलेली असते. एका गुंठ्यांत किती कोंब उगवले ते मोजणे. काही दिवस तेथे काम केल्यावर स्टोअरकिपर म्हणून दुसरीकडे बदली करण्यात आली. सर्व वस्तूंचा, सामानाचा हिशोब ठेवणे हे काम.
नोकरीत बदल
वडिलांना पेन्शन मिळत होती. पेन्शन व सुधाकरचा पगार कसाबसा प्रपंच चालत
होता. वडील पेन्शन आणण्यास अकोल्यास जात असत. पेन्शन आणण्यास अकोल्यास गेले असता, वाशीम येथे गेले. कदाचित तिथे असतांना प्रकृती बिघडली असावी. तेथून ते कान्हेगाव, सकरवाडीस येण्यास रेल्वेने निघाले, कोणीतरी मनमाड स्टेशनवर त्यांना उतरवून दिले. तिथेच बाकावर झोपून राहिले. तेथील स्टेशन मास्तर त्यांना ओळखत असल्याने त्यांनी कान्हेगाव येथील स्टेशन मास्तरला निरोप देण्यास सांगितले. सुधाकर त्याच्या मित्रांना घेऊन मनमाड रेल्वे स्टेशनवर गेले. प्रकृती जास्त बिघडल्याने बोलू शकत नव्हते. त्यांना विचारले मला ओळखले? ते म्हणाले हो तू सुधाकर आहेस.
त्याना तेथील हॉस्पिटल मध्ये नेले पण उपयोग झाला नाही. तेथेच त्यांचा देहांत झाला. तेथून त्यांना घरी आणले. सुधाकरच्या डोक्यावरचे छत्र हरपले.
वडिलांच्या देहांता नंतर आईचे भाऊ, आई, बहीण कोणीही फिरकले नाही. कारण भेटावयास गेल्यास मदत करावी लागेल ही भीती. परिस्थिती वाईट असल्यावर
जवळचे नातेवाईक सुद्धा विचारत नाहीत हा अनुभव आला. मातोश्री स्वाभिमानी असल्याने तिने कोणालाही मदत मागितली नाही.
एक दिवस वर्तमानपत्रात जाहिरात वाचली. पुण्यास रेल्वे पोलीस भरती आहे.त्या ने विचार केला आपणही प्रयत्न करून पहावा. म्हणून तो पुण्यास गेला. तेथे त्याची रेल्वे पोलीस म्हणून निवड झाली. सुरवातीस पुणे, खडकी येथे एक वर्ष ट्रेनिंग होते. भत्ता मिळत असे. ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर दादर येथे नेमणूक झाली.
दादर येथील वास्तव्य
दादर येथे तो रेल्वे पोलीस म्हणून सुरवात झाली. पगार रुपये ८० महिना. पैकी रुपये ४० घरी मातोश्रीस पाठवीत असे. खात्यात ऑपरेटरच्या काही जागा भरावयाच्या होत्या. पण त्याकरिता SSC म्हणजे अकरावी पास आवश्यक होते. मी तर आठवीतून शिक्षण सोडलेले. शिकण्याची इच्छा होती. बहिस्थ अकरावी होता येते हे समजले. तेथे रात्रीच्या शाळेत प्रवेश घेतला. नोकरी बारा तास. तरी पण जिद्द होती. अभ्यास केला. केलेल्या प्रयत्नाला यश आले व मॅट्रिक ही पदवी मिळाली. खूप आनंद झाला. त्यामुळे अधिक प्रगती करण्याची उमेद वाढली. दादरला दोन वर्ष नोकरी केली. पण त्या नोकरीत मन रमले नाही. त्याच काळात सकरवाडी येथे नवीन हायस्कुल सुरू झाले होते. तेथे लेखनिकाची जागा भरावयाची होती. तेथे अर्ज केला. दादर येथील नोकरी सोडली.
उष:काल
साखर कारखान्याची माध्यमिक शाळा, सोमय्या विद्यामंदिर, नवीन सुरू झाली होती. तेथे लेखनिक या पदाची जागा भरावयाची होती, अकरावी पास व टंकलेखन येणारी व्यक्ती पाहिजे होती. मला टंकलेखन येत नव्हते. तेथे जवळ सोय नव्हती. तेथून सोळा मैल अंतरावर कोपरगाव या ठिकाणी टायपिंग शिकण्याची सोय होती. सायकलवर आठवड्यातून चार दिवस जाऊन टायपिंगची ४० ची परीक्षा पास झालो. माध्यमिक शाळेत लेखनिक म्हणून १७ जानेवारी १९६१ रोजी कामास सुरुवात केली व त्याच दिवशी मनाशी निश्चय केला की या शाळेत मुख्याध्यापक पदापर्यंत प्रगती करायाची. सुरवातीस दोनच वर्ग होते. ८ वी व ९ वी त्यामुळे कोणी रजेवर गेल्यावर शिकवण्याचे काम करावे लागे. घराची विस्कटलेली घडी बसण्यास सुरुवात झाली.
उष:काल २
बहिस्थ विद्यार्थी म्हणून प्रि-डिग्री परीक्षेस बसलो. अभ्यासात खंड पडू द्यावयाचा नाही असे ठरवले. त्याच दरम्यान विवाह झाला १९६४ मध्ये. सर्व कुटुंब एकत्र. भाऊ, भावजय…. नोकरी करणारा एकटा आणि पगार त्याकाळात रु.११०/-. परंतु तसा पुरेसा होता. प्रि डिग्री पास झालो. नंतर समजले की इंदोर येथील प्रथम वर्ष झाल्यावर पुणे येथील विद्यालयात तृतीय वर्षात प्रवेश मिळतो. इंदोर येथील परीक्षा दिली व पुणे विद्यालयात प्रवेश घेतला. संसार, नोकरी आणि अभ्यास म्हणजे तारेवरची कसरत. रात्री जागून अभ्यास करणे. १९६७ मध्ये सुनीता, कन्या हिचा जन्म झाला. १९६९ मध्ये गजानन – मुलगा याचा जन्म झाला व १९७३ सीमा – कन्या हीचा जन्म झाला.
उष:कल ३
बी.ए.प्रथम वर्षी नापास झालो. पण प्रयत्न सोडला नाही. दुसऱ्या वर्षी पास झालो. आतापर्यंत शाळेची वर्ग संख्या वाढलेली होती. शाळा मोठया जागेत बदलण्यात आली. मला बी.ए. डिग्री मिळाल्यामुळे अप्रशिक्षित शिक्षक म्हणून काम करण्यास संधी मिळाली. त्या काळात शिक्षक म्हणून काम करण्यास फारसे कोणी उत्सुक नसत. कारण पगार कमी होते. प्रशिक्षित शिक्षक होण्यासाठी बी.एड. होणे आवश्यक होते. नोकरी सोडून बी.एड. होणे अशक्य होते. त्याच वर्षी खात्यामार्फत बी.एड.होण्याची योजना सुरू झाली. बी.एड. होण्याची संधी उपलब्ध झाली. मला खात्यामार्फत संगमनेर येथील विद्यालयात प्रवेश मिळाला. बी.एड.ला इंग्रजी व भूगोल हा विषय घेऊन बी.एड. पूर्ण केले. प्रशिक्षित
उपशिक्षक या पदावर नियुक्त झालो. वयाच्या पस्तिसाव्या वर्षी बी.एड. ही पदवी घेतली.
शाळेचा विस्तार वाढला, विद्यार्थ्यांची संख्या वाढली. त्यामुळे पर्यवेक्षकपदाची जागा निर्माण झाली व पर्यवेक्षक म्हणून बढती मिळाली. जबाबदारी वाढली व अनुभवात भर पडली
मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती
या शाळेचे मुख्याध्यापक निवृत्त झाल्यामुळे या पदाची जागा निर्माण झाली.
संस्थेच्या दोन शाळा होत्या, पदोन्नती ही सेवा ज्येष्ठतेनुसार होते. माझ्या आधी दोन शिक्षक होते. त्यांनी पदोन्नती स्वीकारण्यास नकार दिला. नंतर मला विचारण्यात आले. लेखनिक म्हणून कार्यालयीन अनुभव. शिक्षक म्हणून अनुभव व पर्यवेक्षक म्हणून प्रशासकीय अनुभव व आपण कुठेही कमी पडणार नाही हा आत्मविश्वास. त्यामुळे हे पद स्वीकारण्यास अनुमती दिली. २ जुलै १९८० रोजी मुख्याध्यापक म्हणून सुधाकरला पदोन्नती मिळाली.
तेरा वर्ष मुख्याध्यापक पदावर काम करून १ डिसेंबर १९९३ ला सेवानिवृत्त झालो.
सेवानिवृत्तीचा नंतरचा काळ
“कणश:क्षणश:चैव विद्यामर्थं च साधयेत्”
कणाकणाने धन व प्रत्येक क्षणी विद्या मिळवावी. मला सुरवाती पासून ज्योतिष शास्राचा छंद होता. अस्ट्रालॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट, चेन्नई येथील ज्योतिष शास्राची विशारद परीक्षा दिली. नवीन माहिती मिळाली. वाचनाचा छंद होता. ज्ञानेश्वरी, श्री मदभागवत ही पुस्तक वाचली नव्हती. ती वाचल्यावरनंतर एक नवीन दिशा मिळाली.
ज्येष्ठ नागरिक संघाचे काम केले. सहली काढल्या. वयाच्या ७५ व्या वर्षी संगणक शिकलो व ज्योतिषशास्रावर ब्लॉग लिहिला. sudhakarkatekar.blogspot.in या नावाने पाहू शकता.
सिंहावलोकन
वयाच्या पंच्यांशीव्या वर्षी ज्यावेळेस मागे वळून पाहतो त्या वेळेस खरोखरच आश्चर्य वाटते. इयत्ता आठवीत असतांना शाळा सोडावी लागली. अनेक आपत्तींना तोंड देऊन मुख्याध्यापक पदापर्यंत मजल मारली. हे श्रेय कशाचे आहे. त्या वेळेस लक्षात येते की, परिस्थिती कशीही असो, मनामध्ये स्वतःची प्रगती करण्याची इच्छा पाहिजे. आत्मविश्वास पाहिजे, जिद्द पाहिजे, अपयशामुळे खचून न जाता जिद्दीने प्रयत्न चालू ठेवले पाहिजे. तरच आपण स्वतःचे ध्येय गाठू शकतो….
— सुधाकर काटेकर
खूपच छान व प्रेरणादायी आहे.
धन्यवाद