कार्यमग्नता जीवन व्हावे
मृत्यू ही विश्रांती या गीताला अनुसरून सार्थक जीवन अनेक जण जगले असतील परंतु अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाचे द्वितीय राष्ट्रीय अध्यक्ष जगदेव राम उरांव ह्यांचे जीवन त्या गीता सोबतच त्यातून प्रकट होणाऱ्या भावविश्वाशी तंतोतंत एकरूप झालेले पाहायला मिळते.
15 जुलै 2020 मध्ये अगदी मृत्यू येण्यापूर्वीची सारी धडपड ही अपेक्षित असलेल्या एका बैठकीला जाण्यासाठीची होती खरंतर गेली अनेक वर्षे प्रकृती अस्वस्थतेमुळे हळूहळू प्रवास व बैठकीमध्ये त्यांनी आवश्यकता असल्यास यावे ह्या वर प्रमुख कार्यकर्त्यांचा कटाक्ष असायचा परंतु जे कार्य आपल्याला जबाबदारी म्हणून दिलेले आहे ते मृत्यूपर्यंत करत राहत अगदी सेनापती प्रमाणे कार्यक्षेत्रामध्येच मृत्यू व्हावा अशी ज्यांची प्रबल इच्छा होती त्या पुढे नियतीला अखेर झुकावे लागले.
जेव्हा त्यांना सांगितलं गेलं की, “तुम्ही बैठकीत अपेक्षित आहात परंतु आम्ही सर्वांनी मिळून ठरवलेले आहे की तुम्ही तिथे उपस्थित नाही राहिलात तरी चालेल.” कोविडच्या त्या काळामध्ये एक दिवस त्यांनी कसा बसा तग धरला अगदी असह्य झाल्यानंतर शेवटच्या क्षणाला “मुझे बैठक मे जाना है असं म्हणून उठले” आणि जमिनीवर धारातीर्थी पडले.
जवळजवळ 1949 पासूनचा हा प्रवास अंतिम क्षणापर्यंत कार्य मग्नतेचा ध्यास व श्वास घेत समाप्त झाला. तसं बघितले तर जगदेव राम जी हे वर्तमान छत्तीसगडमधील जशपूरच्या जवळील कोंमडो या गावचे; 9 ऑक्टोबर 1949 रोजी उरांव जनजाती परिवारात जन्मलेले जगदेव राम हे बाल्य काळापासूनच संघाचे स्वयंसेवक. तत्कालीन कोणा एका प्रचाराकाच्या स्पर्शाने व सहवासाने स्वयंसेवक म्हणून सुरू झालेला प्रवास केवळ जशपुर अथवा उरांव समाजाचे नेतृत्व करण्या इतका सीमित न राहता एक प्रगल्भ जनजाती त्याहीपेक्षा प्रखर हिंदुत्ववादी नेता, सर्वमान्य, सम्यक विचार करणारा, कार्यकर्त्यांना आपलासा वाटणारा, कृतिशील, धैर्यशील, चारित्र्य संपन्न स्वयंसेवक, प्रत्यक्ष प्रचारक म्हणून घोषित नसतानाही अविवाहित राहून प्रचारका प्रमाणे जीवन जगणारा, लाखो वनवासी बांधवांना अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून योग्य मार्गदर्शन करणारा राष्ट्रीय नेतृत्व करणारा प्रवास जगदेव रामजींच्या रूपाने जगाने पाहिला.
खरंतर जगदेव रामजी हे त्या काळामध्ये संघ स्वयंसेवक म्हणून कार्य करत असताना अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाची गंगोत्री असलेल्या जशपूरमध्ये कल्याण आश्रमाचे संस्थापक बाळासाहेब देशपांडे यांच्या सहवासात 1968 मध्ये आले आणि त्यांच्या परिस स्पर्शाने पुढे एक सुवर्णमयी जीवन बनून सर्व बाबतीमध्ये झळाळून निघाले.
बलदंड शरीर व संघाचे तृतीय वर्षाचे शिक्षण यामुळे कल्याण आश्रमाच्या शाळेत प्रथम शारीरिक शिक्षक म्हणून ते रुजू झाले परंतु बाळासाहेबांनी जगदेव राम जींच्या अनेक गुणांची पारख करत त्यांना पुढे शिक्षण घेण्यासाठी पाठवले त्यातून इतिहास विषयांमध्ये एम ए पर्यंत शिक्षण त्यांनी पूर्ण केले. जगदेव रामजींचे संस्कृत भाषेवरी प्रभुत्व होतं त्यामुळे शाळेमध्ये ते खेळासोबत संस्कृत ही शिकवायचे.
ज्या जनजाती समाजाचे आपण काम करतो आहोत त्याच जनजाती समाजाचे नेतृत्व विकसित झाले पाहिजे हा आग्रह बाळासाहेब देशपांडे यांनी सुरुवातीपासून ठेवला होता. त्यात जगदेव रामजींचे समर्पण, स्वयंसेवकत्व, निष्ठा, अभ्यासाची तळमळ व आपल्या समाजाप्रती असलेली कणव, संवेदना यातून बाळासाहेबांना आपल्या नंतरच्या वारसदाराची चिंता मिटली आणि त्या दृष्टीने त्यांनी जगदेव रामजींना घडवायला सुरुवात केली. अत्यंत विनम्र, समर्पण भावनेने आपले व्यक्तीत्व बाळासाहेब व कल्याण आश्रमाच्याच्या चरणी समर्पित करत जगदेव रामजी मिळेल ती जबाबदारी स्वीकारत पुढे जाऊ लागले.
1975 मध्ये तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी देशभरामध्ये आणीबाणी लावली त्यात अनेकांना तुरुंगवास भोगावा लागला. जगदेव रामजींनी पण सत्याग्रह करत कारावास स्वीकारला.
आणीबाणी संपल्यानंतर कारावासातून बाहेर आल्यानंतर केवळ जशपूर परिसरात निर्माण झालेल्या वनवासी कल्याण आश्रमाचे काम अखिल भारतीय स्तरावर नेण्याची योजना सुरू झाली आणि बाळासाहेबां सोबत जगदेव रामजींचा अखिल भारतीय प्रवास व समाजदर्शन सुरू झाले.
स्वयंसेवक असलेल्या जगदेव रामजींनी बाळासाहेबांनी दाखवलेला विश्वास सर्वार्थाने सार्थ केला. अत्यंत निर्मळ व निस्पृह व्यक्तिमत्व, साधी राहणी केवळ दोन झब्बे आणि संघ गणवेशा सोबत आवश्यक प्रवास साहित्य असलेली छोटी बॅग हे धिप्पाड व भारदस्त व्यक्तिमत्व लाभलेल्या जगदेव रामजींची पहिल्यापासूनची निर्माण झालेली ओळख शेवटपर्यंत कायम राहिली त्यात काही ही फरक पडला नाही कारण त्यांच्या कडे असलेली बॅग ही अनेकांनी सांगूनही बदलली गेली नाही. मी ही एकदा प्रयत्न करून त्यांच्या हातात दिलेली ट्रॉलीची बॅगही शेवटच्या क्षणी त्यांनी नाकारून कोणत्या ही नवीन बॅगेला तिची जागा घेवू दिली नाही किंवा आकाराम ही मोठी करू दिले नाही. अनेक वर्ष सोबत करणारी बॅग व चप्पल त्यानीं केवळ कठीण प्रसंगी साथ दिली म्हणून शेवटपर्यंत वारंवार दुरुस्ती करून वापरली. चराचरामध्ये देवाचे अस्तित्व असते आणि त्याचे आणि आपले निच्छित असे नाते हे मानणाऱ्या जनजाती समाजाचे तत्व त्यांनी आपल्या बॅग व चपलेच्या बाबतीमध्ये पाळले ही त्यांची विशेषता होती.
एकदा निश्चित झालेला प्रवास कोणत्याही कारणाने रद्द करणे हा त्यांचा स्वभाव नव्हता मग तिकीट कन्फर्म झालेले असो अथवा नसो किंवा अंगात अगदी 100 च्या वर ताप असताना ही प्रवास करून संघटन प्रमुखांनी कशा प्रकारचा आदर्श अन्य लोकांसमोर ठेवला पाहिजे त्याचे ते प्रेरणा पुरूष होते त्यामुळे आपणही असेच कार्यकर्ता जीवन जगले पाहिजे अशी अनेकांना प्रेरणा मिळत गेली.
स्वतः आजारी असतानाही नियोजित कार्यक्रमात बदल न करता, विश्रांती न घेता सतत कार्य करत राहणं, कार्यकर्त्यांना सदोदित हसतमुख राहून भेटणं. कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी समजून घेणे बरोबरीने कार्यकर्त्यांना बैठकीतून योग्य मार्गदर्शन करणे. मिळालेल्या वेळेमध्ये विविध विषयावर वाचन, मनन करणे हा त्यांचा व्यासंग होता आणि हे सर्व पैलू प्रमुख कार्यकर्त्यांच्या समोर, बैठकीमध्ये सर्वत्र दिसायला लागले त्यातूनच बाळासाहेब देशपांडे यांच्या नंतर वनवासी कल्याण आश्रमाचं आणि एकूणच जनजाती समाजाचे नेतृत्व हे स्वाभाविकपणे जगदेव रामजीं कडे चालून आले.
1993 मध्ये ओडिसाच्या अखिल भारतीय संमेलनामध्ये बाळासाहेबांनीच आपल्या उपस्थितीमध्ये कार्यकारी अध्यक्ष म्हणून वनवासी कल्याण आश्रमाची धुरा त्यांच्याकडे दिली. 1995 मध्ये अधिकृतपणे त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारली व 2020 मृत्यूपर्यंत ती यशस्वी पणे पार पाडली.
या सर्व काळात अत्यंत कठोर मेहनत करत. क्षण क्षण झिजत वनवासी कल्याण आश्रमाला अखिल भारतीय स्वरूप देण्यामध्ये त्यांचे फार मोठे योगदान राहिले.
राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर अत्यवश्यक वेळेलाच त्यांनी प्रवास हा वातानुकूलित ट्रेन मधुन केला असेल अन्यथा द्वितीय वर्गातील स्लीपर मधील प्रवास हे त्यांच्या कार्य साधनेचे मंदिर होते.
जगदेव रामजीनी अनेक बैठक, कार्यक्रम विशेष प्रसंगातील समारोप हा नुत्य नवीन असायचा. ऐतिहासिक, पौराणिक व सामाजिक अनेक दाखले त्या मध्ये असायचे. त्यावरून त्यांची वाचन शक्ती ही अफाट होती हे जाणवायचे.
राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जगदेव रामजींच्या स्वभावाचे व आदर्शवत व्यवहाराचे आणखीन एक वैशिष्ट्य सांगता येईल ते म्हणजे त्यांनी कधी ही आपल्याच जनजाती पुरता विचार न करता, त्याबजूने कोणता ही झुकाव न देता आपण एका अखिल भारतीय संघटनेचे अध्यक्ष आहोत ह्या नात्याने देशभरातल्या पूर्वोत्तर भारतापासून ते दक्षिण भारतापर्यंत प्रवास करताना, सर्वांना आपले मानले. सर्वांचीच आत्मीय पूर्ण व्यवहार करून त्यांच्या सुखदुःखाची संघटन अधिकारी सोबतच पारिवारिक नात्याने समरस झाले. याचा परिपाक म्हणजे जगदेवरामजीं सोबतच अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम संस्था ही नगरवासी, ग्रामवासी, वनवासी आम्ही सारे भारत वासी बरोबरीने तू मे एक रक्त याचे प्रतिनिधित्व करणारी, सर्व व्यापक झाली.
संघटने सोबतच साऱ्या जनजाती समाजाचे नेतृत्व त्यांनी केलं. विविध जनजातीय संघटनेमध्ये ही समन्वय व संवाद निर्माण केला त्यातूनच नगरीय समाज व जनजाती समाज यातील दरी त्यांनी आपल्या व्यवहाराने, स्वभावाने व आचरणाने पूर्णपणे मिटवून टाकली आणि ते खऱ्या अर्थाने हमारे ! सबके जगदेव रामजी म्हणून देशभरामध्ये प्रसिद्ध पावले.
मला आठवतं ते आपल्या आजारपणात तपासणीसाठी महाराष्ट्रातील संभाजीनगर येथील डॉक्टर हेडगेवार रुग्णालयात यायचे. अंतिम वेळेला उपचारासाठी आलेले असताना त्याच वेळेला नाशिक येथील आपल्या एका कार्यकर्त्याच्या घरी दुःखद घटना घडली होती. आपल्या आत्यंतिक वेदना दूर सारून त्याचे दुःख दूर करण्यासाठी जगदेव रामजींनी अगदी सर्व लोकांचा आग्रह मोडून त्या कार्यकर्त्याच्या घरी जाऊन सांत्वना दिली.
अशाच एका प्रवासाच्या दरम्यान मुंबईमध्ये त्यांना अस्वस्थ वाटायला लागले. प्माझ्या सह प्रमुख कार्यकर्ते घाबरून गेले डॉक्टरांनी तातडीने हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यास सांगितले आपल्या व्यवस्थेतून पहिल्यांदा टॅक्सीने जायचं असं ठरलं नंतर एक कार्यकर्ता गाडी घेऊन आला परंतु जगदेव रामजी कार्यालयीन व्यवस्थेनुसार टॅक्सी मधूनच अत्यंत नाजूक अशा प्रसंगी देखील हॉस्पिटल पर्यंत गेले.
कार्यालयामध्ये, “टॅक्सी से यात्रा करना ठीक नही”असे मी त्यांना म्हणताच ते म्हणाले, “यात्रा होगी या तो फिर से कार्यक्षेत्र मे या…. कसोटीच्या क्षणी सुद्धा तत्व पाळणे आणि त्यानुसार आचरण करणे हे श्रेष्ठ पुरुषाचे लक्षण मानले जाते आणि जगदेव रामजी त्यातही यशस्वी झाले.
अशा प्रकारे केवळ कार्यक्षेत्रात नाही तर, बैठकीमध्ये घराघरांमध्ये जगदेव रामजी हे सहजतेने, आपल्या आत्म्मिय पूर्ण व्यवहाराने, अकृत्रिम अशा स्नेहाने छाप पाडत होते आणि यातूनच वनवासी कल्याण आश्रम ही अनेक ठिकाणी योग्य पद्धतीने पोहचत होती.
जशपूर हे मूळ संस्थानिक राज्य होते त्यामुळे बाळासाहेब देशपांडेंच्या दैवी कर्तृत्वा सोबत वनवासी कल्याण आश्रमालला ही पहिल्या पासून राजाश्रयाचा वरदहस्त लाभला परंतू जशपुर परिसरात सामान्य जनजाती परिवारात जन्मलेल्या जगदेव रामजीने आपल्या अलौकिक प्रतिभेने राज परिवाराचा विश्वास व स्नेह संपादित केला. त्यामुळे जसा सामान्य कार्यकर्त्यांच्या बरोबर त्यांचा वावर होता तसा समाजातल्या सर्वश्रेष्ठ अशा व्यक्तीं अनेक साधू संत महंतांमध्येही जगदेव रामजींची उठबस व आत्मीय संबंध होते त्यामुळेच जगातील विविध अनेकांना आपण मूळ कोण आहोत? याचा शोध सुरू झाला तेव्हा भारतात भरलेल्या जागतिक अंडर कल्चर संमेलनात त्यांना विशेष निमंत्रित करून त्यांना सन्मानाने डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली. परंतु आपल्या हयातीत त्यांनी आपल्या बाजूने कोणालाच याची भनक लागू दिली नाही. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची कागदपत्रे जी समोर आली त्यात ही बाब उघड झाली इतकी निर्मोहिता शोधून सापडायची नाही. बरोबरीने 2011 मध्ये त्यांना छत्तीसगडचा आदिवासी सेवक सन्मान पुरस्कारही प्राप्त झालेला होता. अशा अनेक मान सन्मानाने सन्मानित असलेले व्यक्तिमत्व शेवटपर्यंत अत्यंत नम्र व एकाच ध्येय मार्गाने कार्य करत राहिले.
वनवासी कल्याण आश्रमा मधील ‘वनवासी’ शब्दाने संघटनेने अनेक प्रहार झेलले आहेत. विरोधकांनी आदिवासी-वनवासी शब्दावरून अनेक वेळा जनजाती समाजाला भ्रमित केलेले आहे परंतु जगदेव रामजींनी कधीच आदिवासी शब्दाचे समर्थन केले नाही. वनवासी आणि जनजाती हा सर्वार्थाने हिंदूच आहे ह्या बाबत ते केवळ आग्रही नव्हते तर सर्व व्यासपीठावर ठणकावून मांडत राहिले.. आपल्या पत्रव्यवहार व विविध लेखा मध्ये ही त्यांनी ह्या बाबतीत कधीच तडजोड केली नाही.
जगदेव रामजीनी आपले सामान्य कार्यकर्ता पण कायम जपलं. ते लौकिक अर्थाने कोणी अध्यात्मिक पुरुष अथवा संत नव्हते परंतु जगलेले जीवन अध्यात्मिक पातळी, संतांपेक्षा ही कमी दर्जाचे नव्हते. ते बाळासाहेब देशपांडे किंवा अन्य लोकांप्रमाणे स्वयंप्रकाशित नव्हते परंतु त्यांनी आखून दिलेल्या मार्गावर ते शेवटपर्यंत निर्धाराने सर्वांना सोबत घेवून कार्यकुशलततेने चालत राहिले.
त्यांच्या बाबतीत असे म्हणता येईल की काया वाचा मनाने वनवासी कल्याण आश्रमाला आणि अंगीकृत विचाराला कुठेही कमीपणा न आणता प्रत्येक वेळेला वनवासी समाजाची व वनवासी कल्याण आश्रमाची मान ताठ ठेवली.
15 जुलै 2020 रोजी बैठकीला जायचंय याच ध्येयाने प्रेरित होवून अखंड कार्यसिध्द स्वरूपात देह ठेवणाऱ्या जगदेव रामजी आजही कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या स्मृतीने जिवंत आहेत. उद्या त्यांचा स्मृतिदिवस त्यानिमित्ताने ह्या प्रेरणा पुरुषाचा जो सुगंध आहे तो असाच बहरत राहो. त्यांची जीवनगाथा अशा माध्यमातून वेगवेगळ्या सर्वदूर पोहोचत राहो. वनवासी कल्याण आश्रम महाराष्ट्राने स्वर्गीय जगदेव रामजींच्या स्मृतिप्रत्यर्थ प्रत्येक वर्षी जनजाती समाजाच्या उन्नतीसाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याला त्यांच्या नावाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्याची प्रथा सुरू केलेली आहे तर अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाने अशा थोर कार्यकर्त्याला, महापुरुषाला आपल्या प्रत्येक कार्यक्रमाच्या अत्यावश्यक तसबिरी मध्ये भारतमाता, प्रभू श्रीराम, भगवान बिरसा मुंडा, वनयोगी बाळासाहेब देशपांडे सोबत सन्मानाचे स्थान प्रदान करून शेवटपर्यंत कार्य मग्न असलेल्या त्यांच्या जीविताला अमर केले आहे.
शरद जयश्री कमळाकर चव्हाण
Leave a Reply