नवीन लेखन...

जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग सतरा

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे क्रमांक चार

जगण्यासाठी औषधं काम करत नाही – भाग आठ

औषध घेतलं पण गुणंच आला नाही. असं बऱ्याच वेळा होतं. असं का होत असेल. काही तरी चुकतंय, कुठेतरी चुकतंय, हे शोधून काढलं की दोष निघून जातो. कोणत्याही समस्या या याच पद्धतीने सोडवायच्या असतात. ही आयुर्वेदीय दृष्टी प्राप्त व्हायला हवी.

जसं आपली एखादी टुव्हीलर सुरूच होत नाहीये, बंद पडली आहे. तिची काय काय कारणं असू शकतात, याचा विचार करतो तेव्हा पहिलं कारण इंधन संपलेलं असणं,इंधनाचा दर्जा योग्य नसणं, इंधनामधे कचरा असणं, टाकीमधे असलेलं इंधन कार्बोरेटरला न मिळणं, कार्बोरेटरमधे कचरा अडकणं, कारबोरेटरमधे एअर येणे, दुसरं, बॅटरी संपलेली असणं, अन्य पार्टस मधे काहीतरी गडबड निर्माण होणं, सायलेन्सर साफ नसणं, अशी अनेक कारणांचा विचार एकाच वेळी करावा लागतो.

घरातलं उदाहरण घेऊ, पुरणपोळी योग्य लुसलुशीत न होण्याची कारण काय असतील, याचा नीट विचार केला तर अनेक कारणांचा शोध घ्यावा लागतो. जसं चणाडाळ योग्य प्रतीची नसणं, ती नीट न शिजणं, नीट वाटली न जाणं, शिजल्यावर कटाचे पाणी नीट निथळून न घेणं, नीट न ढवळता आल्याने पातेल्याच्या बुडाला शिजलेली डाळ करपणं, दुसरं गुळ चांगला नसणं, तो योग्य प्रमाणात न घेणं, त्याचा पाक योग्य न होणं, डाळीमधे एकत्र करताना योग्य त्या प्रमाणात योग्य त्या वेळी एकत्र न करणं, नीट न ढवळणं, तिसरं पीठंच चांगले नसणं, योग्य तेवढं तिंबलं न जाणं, त्या पीठात सढळ हस्ते तेल न घालणं, तिंबून झाल्यावर योग्य तेवढा वेळ जाऊ न देणं, तवा योग्य नसणं, विस्तव नीट नसणे, पोळपाट नीट नसणं, नीट लाटताच न येणं, तव्यावर पसरवणं, ती फिरवणं, परतणं,खमंग भाजल्यावर वाफ जाईपर्यंत पसरून ठेवणं, अतिरिक्त पीठ हळुवार काढून घेणं,तिची नीट घडी करून ठेवणं……इ.इ.
पुरणपोळीचा मनसोक्त आस्वाद घेता येत नाही, याची ही एवढी कारणं असू शकतात. ही अगदी वरवरची कारणे झाली, सूक्ष्म कारणांचा विचार केलेलाच नाही. इ.इ. अनेक कारणे जेव्हा लक्षात घेतली जातील, आणि ती जेव्हा दूर केली जातील, तेव्हा पुरणपोळी अगदी म न प सं त झालीच पायजे.
बरोबर ना !

अगदी हीच, अशीच कारणे, औषधं लागू न पडण्याची आहेत,

वैद्याचे निदान चुकणे, वैद्याकडून औषधाची निवड चुकणे, अनुपान सांगायला विसरणे, चुकणे, इ.

औषधे देणाऱ्या मदतनीसाकडून, औषध द्यायची वेळ चुकणे, चुकीचे औषध देणे, चुकीच्या वेळी देणे, औषध देताना विश्वासाने न देणे, वैद्याने सांगितलेले अनुपान न निवडता, स्वतःच्या मनाने त्याअनुपानात बदल करवून देणे, इ.इ.

रुग्णाने, दिलेले औषध पूर्ण मात्रेत न घेणे, अर्धे औषध वाटीत तसेच ठेवून पटकन वाटी धुवून टाकणे, गोळी घेतल्याचे नाटक करून, ती तोंडातच लपवून, चुळ भरण्याच्या बहाण्याने ती गोळी थुंकुन टाकणे, कंटाळत औषध घेणे, विश्वासाने न घेणे, “एवढी औषधे संपवली, आता ह्या एवढ्याश्या गोळीने काय होणारे” असा नकारात्मक विचार औषध घेताना मनात निर्माण होणे, इ.इ.इ.

औषधाचा दर्जा योग्य नसणे, खूप जुने (एक्स्पायर्ड) दळ गेलेले औषध वापरणे, जसे सांगितलेले आहे तस्सेच औषध न मिळणे, काही औषधांचा संग्रह हा विशिष्ट ग्रहणाच्या वेळी, विशिष्ट नक्षत्र असताना, विशिष्ट दिशेचे, विशिष्ट मंत्र म्हणून, त्या वनस्पतीला प्रार्थना करून, विशिष्ट विधी करून, तोडून संग्रहीत करायची असतात. वाळवताना सावलीत वाळवणे, कडक उन्हात वाळवणे, वाळवून झाल्यावर ती योग्य त्या ठिकाणी संग्रहीत न करणे, काही औषधे भाताच्या राशीत, काही जमिनीमधे पुरून, काही औषधे मधात बुडवून, काही औषधे लाकडी कपाटात, काही काचेच्या बरणीत ठेवायची असतात. तर काही औषधे तयार करताना सूर्य हवा, तर काही औषधे तयार करताना चंद्राचा प्रकाश त्यावर पडायला हवा, काही औषधे तयार करताना विशिष्ट मंत्र म्हटले असता, औषधांची कार्यशक्ती वाढते, इ.इ.इ.इ.

अबबबबब एवऽढीऽ कारणे असू शकतात, याला ग्रंथकार चिकित्सेचे चतुष्पाद असा शब्द योजतात. वैद्य, परिचारक, रूग्ण आणि औषध.
पाचवे कारण दैव अनुकुल असणे वा नसणे, हा दैववाद देखील आयुर्वेद मानतो.

हे परम्युटेशन काॅम्बीनेशन, ज्याचे जुळले त्याला औषधांचा गुण आलाच म्हणून समजा !

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
26.04.2017

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..