आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – क्रमांक पाच
पहिलं पचल्याशिवाय दुसरं आत टाकू नका – भाग 2
घरातला तुरडाळ ठेवलेला डबा आठवतोय ? जेव्हा डब्यातील तुरडाळ संपतेय, तेव्हा मार्केट मधून तुरडाळ आणली जाते. तेव्हा डब्यात तळाला थोडी तुरडाळ शिल्लक असते. या शिल्लक असलेल्या तुरडाळीवर नवीन तुरडाळ ओतली जाते. असं जेव्हा वारंवार होईल, तेव्हा काय होतं ? तळातील जुनी तुरडाळ तशीच ठेवून जर त्यावर नवीन तुरडाळ ओतली गेली तर काय होईल ? जुनी तुरडाळ काही दिवसांनी खराब होईल. तिला दुर्गंध येऊ लागेल, अशी दुर्गंध येणारी डाळ डब्यात तशीच राहिली तर वरून पडणारी चांगली तुरडाळदेखील काही दिवसात दुर्गंधित होऊ लागेल आणि काही दिवसांनी डब्यातील सर्व तुरडाळ वास येणारी होईल.
असं होऊ नये म्हणून काय करावे ?
जी तुरडाळ तळात राहिलेली असते, तिला आधी एका ताटामधे काढून घ्यावी. नवीन तुरडाळ डब्यात भरावी. आणि डब्यात सर्वात वर जुनी तुरडाळ भरावी. त्यामुळे ती पहिल्यांदा वापरली जाईल. फुकट जाणार नाही.
बेकरीवाल्याकडची बरणीतील शेव संपत आली की तो बेकरीवाला, ती बरणीतील तळातली शेव आधी वेगळी काढून मगच नवीन शेवेचं पाकीट बरणीत रिकामे करतो. आणि वर जुनी शेव परत भरतो, जेणेकरून पहिली शेव सहज संपून जावी.
पहिलं संपल्याशिवाय दुसरं भरलं तर पहिलं पण फुकट जाते आणि दुसऱ्या पदार्थाचा आनंदही निघून जातो.
अगदी तस्संच पोटामधे देखील होत असावं. आधी न पचलेल्या अन्नावर वरून कितीही सात्त्विक अन्न घातले तरी ते सर्व अन्न फुकट जाईल. कारण न पचलेलं अन्न म्हणजे आम. या आमामधे चांगले अन्न एकत्र झालं की, सर्वच अन्न “आममय” होईल.
त्यामुळे पहिलं अन्न पचल्याशिवाय दुसरं अन्न आत टाकलं तर नुकसान ठरलेलंच ! म्हणून पहिलं पचल्याशिवाय दुसरं आत टाकू नका.
नासलेल्या दुधात कितीही चांगले दूध ओतले तरी सर्व दूध नासणारच !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
02.05.2017
Leave a Reply