आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक सात
निसर्गाचे नियम सर्वांसाठी सारखेच-भाग दोन !
यापूर्वी लिहिलेल्या उपवास मालिकेमधे खरंतर हे सर्व नियम सांगितले आहेतच, पण…..
आपलं जसं एक मन असतं, तसं निसर्गाचं एक मन असतं. विश्व मन. आपण जसा विचार करत असतो, तसा निसर्ग पण विचार करत असतो. आपलं मन जेव्हा विश्वमनाशी जोडलं जातं, तेव्हा खूप प्रसन्न वाटतं. विश्वाची सर्व एनर्जी, उर्जा आपण जेव्हा आपल्या मनापासून स्विकारतो, तेव्हा ही आनंदाची अनुभूती आपल्याला येत असते.
आपण जसा विचार करतो, तसं आरोग्य आपणाला मिळत असतं. कोणत्याही रोगाची बीजे ही आपल्याच मनामधे असतात. ती विश्वमनाशी जोडली गेली की, तीच स्पंदने पुनः आपल्यापाशी येतात.
आपल्या उपनिषदांमधे हेच सांगितले आहे. ब्रह्मांडामधे प्रचंड शक्ती आहे. ब्रह्मांडातील सर्व चांगल्या गोष्टी माझ्यासाठी दास बनून येऊ शकतात. हे विश्व मला सतत मदत करत आहे. मला माझ्या प्रत्येक कार्यात ही शक्ती सूक्ष्म रूपात मदत करत आहे. माझ्या सर्व गरजा विश्वमनाकडून पुरवल्या जात आहेत. हे विश्व खूप सामर्थ्यशाली आहे, त्यामुळे माझ्या सर्व योग्य गरजा विश्वमनाकडून सहज पूर्ण होणाऱ्या आहेत. त्याच्यासाठी या गरजा म्हणजे किस झाड की पत्ती !
फक्त योग्य शब्दात, योग्य वेळी त्या मागितल्या पाहिजेत. त्या सर्व इच्छा पूर्ण होणारच आहेत, असा विश्वास पाहिजे, या आनंदात सतत राहिलो तर त्या मिळतातच !
वास्तुशास्त्रामधे पण हेच सांगितलेले आहे. वास्तु कायम “तथास्तु” म्हणत असतो. घरात कायम सकारात्मक स्पंदने असतील तर कोणतीही प्रबळ अनिष्ट शक्ती कोणताही त्रास देऊ शकत नाही. निसर्गाचे हे नियम, ही स्पंदने, ही उर्जा घेण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. असा सकारात्मक विचार करायला शिकलं पाहिजे.
माझ्या आजोबांना डायबेटीस होता, वडीलांना पण होता, आता मलाही तो होणार आहे, असा विचार जर मनात प्रबळ होत गेला तर, कितीही पथ्य पाळले तरी डायबेटीस तुम्हाला शोधत तुमच्याकडे येणारच. हाच निसर्गाचा नियम आहे.
मग विचारांची स्पंदने जर सकारात्मक ठेवली तर विश्वमना पर्यंत पोचणारा परिणाम सकारात्मकच असणार ! म्हणजेच काहीही झाले तरी मला डायबेटीस होणार नाही, वाढलेल्या साखरेचा मला काहीही त्रास होणार नाही, अशी स्पंदने जर निसर्गामधे प्रक्षेपित केली तर तीच स्पंदने जास्त ताकद घेऊन पुनः आपल्याचकडे परत येतात आणि रोगापासून हवे असलेले संरक्षक कवच आपणाला मिळत असते. यालाच आजच्या भाषेत प्रतिकारशक्ती म्हणतात.
राॅन्डा बर्न यांनी लिहिलेले एक पुस्तक आहे, द सिक्रेट नावाचं. या पुस्तकात हेच रहस्य सांगितलेलं आहे. आपण जो विचार करतो, तो एवढा सकारात्मक करा की विश्वमनाशी तो जोडला जाईल.
रोन्डा बर्न यांचे नाव एवढ्यासाठीच घेतले की आपली मानसिकताच अशी बनली आहे, की पाश्चात्य तज्ञ जे सांगतात, तेच अंतिम सत्य. जणुकाही आकाशातूनच पडले आहे, आपल्या पराभूत भारतीय मानसिकतेचा तो परिणाम आहे, इतकंच. बाकी विशेष नाही.
सो बी पाॅझिटीव्ह, नेचर हियर्स यु !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
07.05.2017
Leave a Reply