नियम एक.
कोणताच नियम पाळू नये – भाग तीन.
माणूस बाहेरून जरी एक दिसला तरी आतून तो प्रत्येकाहून वेगळा असतो. रस्त्यावर काम करणारी, दगड फोडणारी लमाणी मंडळी सर्व साधारणपणे आंध्र प्रदेश मधून आलेली असतात. त्यांचे अतिशय कष्टांचे, उन्हातान्हात काम असते. रापलेले पण, पिळदार मजबूत शरीर, वात पित्ताची प्रकृती. पुस्तकी ज्ञानाप्रमाणे त्यांना तूप अत्यंत आवश्यक. पण जर त्यांना मी “रोज तूप भात जेवा” असे सांगितले तर त्यांना तूप भातही पचणार नाही. कारण सवयच नाही. त्यांची खायची सवय काय ? तर सुकी भाकरी आणि वर लालबुंद तिखटाचा गोळा थोड्याश्या तेलात परतलेला पाला आणि माशाचा तुकडा डाळीचे लाल पाणी आणि भात. पण त्यांचे शरीर त्यांना या अन्नातूनच पूर्ण ब्रह्माची अनुभूती देते.
आहार षडरस युक्त हवा हा नियम झाला, पण तान्ह्या बाळांचे काय ? त्यांना असा सहा चवींचा आहार चालत नाही. त्यांच्यासाठी फक्त मधुर रसाचे दूधच. त्या तान्ह्यांच्या शरीराला जे जे हवे आहे, ते ते सर्व पोषण या एकाच मधुर रसातून मिळते. असे असले तरी शरीर आणि आत्मा, इंद्रियांच्या मदतीने, त्या शरीराला जे जे हवेय, ते ते तयार करवून देत असते.
बरं आपणाला तरी कुठे जाणीव असते, आपण जे खातोय त्यातून पुढे काय काय घटक तयार होत आहेत ? रक्त कसे कुठे तयार होते ? हाडांचे पोषण कसे होते ? शुक्र कसे तयार होते ? नवीन पेशींची वाढ कशी होते ? जुन्या पेशींचे विघटन आणि त्यातून पुनर्निर्माण कसे होते ? यामागे आवश्यक असलेली शक्ती आणि युक्ती कोण पुरवते ? विज्ञानाने आज हे सर्व ज्ञान पहाता येते. या सर्वांची उत्तरे शोधता येतात. शोधली देखील ! पण त्याचे जसे फायदे झाले तसे तोटेही झाले. आपण परावलंबी झालो. अभिमानी झालो. आणि नियमांनी स्वतःला बांधून घेतले. हे हे घटक एवढ्या एवढ्या प्रमाणात तयार आहेत, म्हणजे मी “हेल्दी”, अश्या भ्रामक कल्पनांमधे स्वतःचे आरोग्य रंजन करवून घेऊ लागलो. आणि वास्तविक आरोग्यापासून फार दूर गेलो. माझे सर्व रिपोर्टस नाॅर्मल असून देखील ” मी नाॅर्मल नाही” याची जाणीव जेव्हा मनाला होते, तेव्हा मनावर होत असलेले परिणाम, विज्ञानातील यंत्रे मोजू शकत नाहीत, हे सत्य समजेपर्यंत आपले आरोग्य आपल्यापासून दूर गेलेले असते.
दर दोन तासांनी काहीतरी खावे, दररोज पाच सहा लीटर पाणी प्यावे, हे नियम झाले. आणि
जेवढी भूक आहे तेव्हा जेवावे, जेवढी तहान आहे, तेवढे पाणी प्यावे, हा व्यवहार झाला. यातील जेवढे तेवढे हे शब्द महत्त्वाचे ! मेंदू बुद्धीने जे सांगतो, ते ह्रदयात भावनेला पटले पाहिजे.
व्यवहार आणि नियम यात गल्लत झाली की आरोग्य हमखास बिघडते.
ऐकलेले आणि बघितलेले यात चार बोटांचे अंतर असते, तसे नियम आणि वास्तव यात एक हाताचे अंतर असते.
कपाळावर डावा हात ठेवून, कोपर कुठे येते पहा, म्हणजे हे अंतर समजेल.
— वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग. 9673938021
12.04.2017
Leave a Reply