आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक सात
निसर्गाचे नियम सर्वांसाठी सारखेच – भाग सात !
जमिन एकच. पाणी एकच. मातीतून मिळणारे पोषण एकाच प्रकारचे. पण एकाच वेळी कारले, जांभूळ, चिंच, आंबा, मिरची अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बीया रूजत घातल्या, तरी तयार होणारे झाड वेगळेच होते. फक्त बी वेगळी असली की, झाडांचे रूप रंग सगळंच बदलून जातं. यालाच निसर्ग म्हणतात.
एकाच मातीच्या गोळ्यात या सर्व बीया एकत्र करून ( सीड बॅक करून ) जरी जमिनीत पुरल्या तरी त्या बीयांना आवश्यक ते सर्व पोषण त्याच जमिनीतून घेतले जाते. आणि या बियांतून निर्माण होणाऱ्या प्रत्येक झाडाला गोड आंबट तिखट तुरट फळे लागतात. यालाच निसर्ग म्हणतात.
तसंच प्रकृतीचं आहे. एकाच आई वडीलांच्या जीन्समधून जन्माला आलेल्या बहिण भावंडांच्या प्रकृती वेगवेगळ्या असतात, विचार वेगळे असतात. पचनशक्ती वेगळी असते, ताकद, प्रतिकारशक्ती सगळंच वेगळं असतं. यालाच निसर्ग म्हणतात.
प्रकृती म्हणजेच निसर्ग !
सगळा निसर्ग, अख्खं ब्रह्मांड नाही समजलं तरी चालेल. आपली प्रकृती ओळखता आली तरी पुरेसं आहे. कारण आपली प्रकृती हे विश्वाच छोटंस रूप आहे. या प्रकृतीलाच निसर्ग म्हणतात.
बीयापासून झाड बनायला प्रत्येकाला वेगवेगळा वेळ लागतो. प्रत्येक झाडावर कळी यायचा वेळ वेगळा असतो. कळीचं रूपांतर फुलात आणि पुढे फळात व्हायला काळ जावा लागतो. या काळालाच निसर्ग म्हणतात.
रोगाची सुरवातीला काही लक्षणे निर्माण होतात. या लक्षणांना योग्य वेळी ओळखता आले पाहिजे. नाही तर ती लक्षणे पुढे रोगात रूपांतरीत होतात. ही लक्षणे निसर्ग आपणाला सांगत असतो. निसर्गाशी एकरूप होता आलं, की ही लक्षणे आपणाला सहजपणे कळतात. या जाणीवेला निसर्ग म्हणतात.
ही जाणीव प्रत्येकाला जन्मापासूनच असते. किंबहुना जन्मापूर्वीपासूनच असते. म्हणून तर जन्माला आल्यावर लगेचच दूध ओढून आत गिळायचे असते, हे बाळाला न शिकवता कळत असते. हे शिकवणाऱ्याला निसर्ग म्हणतात.
हे सर्व शिकवणारा निसर्ग हा सर्वात मोठा गुरू आहे. शिकण्यासाठी आवश्यक असतील ते सर्व गुण, प्रत्येक शिष्याने योग्य प्रकारे आत्मसात केले की, कोणाही शिष्याला ज्ञानप्राप्तीला वेळ लागत नाही.
कारण,
शिकवणारा गुरू सर्वांना एकाच पद्धतीने शिकवत असतो. कारण निसर्गाचे नियम सर्वांसाठी सारखेच असतात.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
12.05.2017
Leave a Reply