आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक नऊ
कामासाठी दिवस, विश्रांतीसाठी रात्र-भाग सहा
आज काल काय झालंय.
दिवसाची कष्टाची कामे झालीत कमी,
जी कामं आहेत ती फक्त आरामखुर्चीत बसून बसून आणि बसून !
आणि सोफ्यावर झोपून खाणं झालंय जास्ती.
रात्रीची झोप झालीय कमी आणि जागरणं झालीत जास्ती !
वेळ पडतोय कमी आणि टीव्ही चॅनेल्स झालीत जास्ती !
पैशांची किंमत झाली कमी आणि पैसे झाले जास्ती !
मनमोकळ्या गप्पा झाल्यात कमी आणि चॅटींगसाठी वेळ झालाय जास्ती !
टीव्ही वरील सर्व चॅनेल्सवरचे एकुणएक पिक्चर्स जणु काही आपल्यासाठीच बनवले आहेत. फुकट बघता येतात, म्हणून आयपीएल पण झाल्या. याच्या जोडीला “मनोरंजन” म्हणून काहीतरी हवेच ना, म्हणून दिमतीला हाय फाय सिरीयल्स आहेतच !
सिरीयल्सच्या मधल्या जाहिरातींच काय करणार ? विचारांना एका ठिकाणी स्थिर बसू न देणाऱ्या रिमोटने दुसरी चॅनेल्स बदलली तरी तिथेही जाहिरातीच ! एकुणच काय, तुमच्या खिशातले पैसे आमच्या खिशात, आमच्यातचे तुमच्यात ! म्हणून भारतात एकवेळ थंडीची लाट येईल, पण मंदीची लाट कधीच येणार नाही.
95 % जनतेला सिरीयल्स मधला झामझौल मोहक वाटतो. मोह निर्माण झाल्यावर त्यातून इर्षा जन्माला येते. माझ्याकडे पण हा सगळा ताकझाक हवा, असे वाटू लागते, त्यासाठी खिशात असलेले पैसे पुरणारे नसतात. म्हणून अधिकाधिक प्रयत्न सुरू होतात. ज्या झोपेसाठी रात्र आहे, त्या झोपेच्या वेळी अशा सिरीयल्स पाहून आपल्या झोपेचं खोबरं तर करतोच, पण नको ते मानस रोग पाठी लागतात. आणि दिवस पण खराब करून टाकतो.
म्हणजे रात्रही गेली आणि दिवसही गेला.
एवढंही पुरत नाही, म्हणून हायफाय वायफाय सुरू करून घेतलं. नको ते चॅटींग, रात्री अपरात्री सुरू झालं. डोक्यावरून पांघरुण पांघरून गप्पा रंगू लागल्या. या मॅच्युअर गप्पा अजाण पालकांना समजू नये, याचा ताण सुरू झाला. नेहमीच्या गप्पागोष्टी नकोश्या वाटू लागल्या. वेळ कसा जातोय, ते लक्षात येईनासं झालं. अभ्यासाचं वेळापत्रक कोलमडून पडू लागलं. हुशार मुलांची आणि बुद्धिमान मुलींची बुद्धी गहाण पडू लागली. जागरणं घडू लागली आणि नको ती स्वप्न पडू लागली.
रात्रीचर्या बिघडू लागली.
तरूण तरूणींच्या चेहेऱ्यावरील चर्या बिघडू लागली.
दिवस आणि रात्रीची कामं पुरती बदलून गेली आणि समाजाची घडी सगळी विस्कटून गेली.
यम नियम न पाळता, अनावश्यक आरोग्य नियम, यम बनू लागला आणि “यम” आपला पाश आवळू लागला.
जगण्याची भीती वाटू लागली आणि मरण येऊ नये म्हणून औषधे ही गरज बनली.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
21.05.2017
Leave a Reply