आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 3
संकल्प केल्याशिवाय कोणत्याही कामाची सिद्धी नाही. आपण अमुक पूजा का करीत आहोत, याचा संकल्प प्रथम करावा लागतो. जसे, श्री सत्यनारायणाची पूजा करताना मी सत्याने वागेन, सत्याचाच स्विकार करेन, सत्याचीच साथ करेन, सत्य कधीही सोडणार नाही, नेहेमीच माझे धोरण, संभाषण सत्याचेच असेल. ( कारण सत्य बोललेले कधीही लक्षात ठेवावे लागत नाही.) पण संकल्प केल्याप्रमाणे आचरण आपण ठेवले नाही. सत्य बाजूलाच जाईल आणि पूजा हे फक्त कर्मकांड होईल. असे होऊ नये. यासाठी संकल्प महत्त्वाचा असतो.
कोणत्याही पूजेतील संकल्प लक्षात घेतला की, त्यातील स्वार्थ परमार्थ लक्षात येईल.
“अस्माकं सकुटुंबानां सपरिवाराणां क्षेम स्थैर्यः आयुः आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थं, द्विपद चतुष्पद सहितानां शान्त्यर्थं समस्त मंगल अवाप्त्यर्थं समस्त अभ्युदयार्थं च कल्पोक्त फलाप्त्यर्थं अमुक देवताप्रीत्यर्थं यथा मिलितोपचारद्रव्यैः षोडशोपचार पूजां अहं कर्म करिष्ये ।”
या संकल्पामधे “आयु आणि आरोग्य” असे दोन शब्द दिसताहेत.
आरोग्य कोणाचे ?
समस्त कुटुंबाचे, सर्व परिवाराचे, एवढेच नव्हे तर घरातील द्विपद म्हणजे पोपटासारखे पाळीव प्राणी, चतुष्पद म्हणजे चार पायाचे प्राणी, जसे, गाय बैल, म्हैशी, वासरे यांचे क्षेम असावे, या सर्वांचे आयुष्य आणि आरोग्य वृद्धींगत व्हावे, यासाठी मी जे द्रव्य उपलब्ध आहे त्यातून ही सोळा उपचारांची पूजा करीत आहे.
केवढा विशाल दृष्टीकोन आहे या संकल्पामागे ! आणि मागायचेच आहे तर त्यात कंजुषी कशाला? आणि देणारा समर्थ असेल तर फक्त स्वतःपुरते कशाला मागायचे ? सर्वांसाठी सगळेच मागायचे !
माऊलींनी पण पसायदानातून मागणे मागताना, विश्वाच्या कल्याणासाठी, जो जे वांछील तो ते लाहो, असंच भरगच्च मागितलं आहे.
देनेवाला छप्पर फाड के देने के लिए बैठा है तो दुबळी (फाटकी ) माझी झोळी घेऊन का जावे ?
मागताना लाजू नये, आणि देताना माजू नये असे म्हणतात. एक दिवस देणाऱ्याचे (देते ) हात व्हावे. प्रत्येक वेळी मागतच रहायला हवे असे नाही. कधीतरी “देणारा” देखील व्हावं. त्यातला आनंद आणखीनच वेगळा !
आनंद मिळण्यासाठी थोडे कष्ट, थोडी कर्मकांडे देखील करावेच लागतात ना !
अहो, एटीएम मधून आपलीच रक्कम मिळायला सुद्धा थोडा वेळ लागतोच ना, थोडी वाट पहावी लागतेच. जर तुमच्या खात्यात पुरेशी रक्कम असेल तर तुम्हाला तुमचे पैसे मिळणारच ! थोडा इंतजार तो करना पडेगा . काही वेळा पासवर्ड चुकतो, काहीवेळा मशीन बंद असते, काहीवेळा चुकीची रक्कम टाकली जाते, काही वेळा खात्यामधे पुरेशी रक्कम नसते, तर काही वेळा सर्व गणित जुळवून देखील उत्तर चुकीचे येते.
त्याची कृपा होण्यासाठी थोडा वेळ वाट पहावी लागते. तो कृपाघन कृपा करणारच, असा भाव ठेवला तर अपेक्षित फळ मिळणार हे नक्कीच.
औषधे देखील पोटात जाऊन, हवा तिथे अपेक्षित गुण दिसायला थोडा वेळ लागतोच ना, तसंच आहे.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
28.05.2017
Leave a Reply