आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 7
नंतरचा उपाय अर्घ्य.सुगंधीत पाण्याने हात धुवायला अर्घ्य वापरले जाते. पाण्यात चंदन, अक्षता, दुर्वा, इ. वस्तू घालून हे पाणी देवाला हात धुण्यासाठी दिले जाते.
काही खाण्यापिण्यापूर्वी हात पाय धुवायचे असतात, एवढे समजले तरी पुरेसे आहे. नंतरचा उपचार आचमन. ज्याविषयी आधी लिहून झालेले आहे.
स्नान आणि अभिषेक केल्याशिवाय पूर्ण शुद्धी होतच नाही. गंगा आदि सप्त नद्यांचे पवित्र पाणी आंघोळीकरीता आहे, अशी कल्पना करून आपणही स्नान करावे. स्नानाने शरीराची शुद्धी तर होतेच पण मनाची शुद्धी देखील होते. स्नान करीत असताना लक्ष स्नानाकडेच असावे, तरच स्नानाने मानसिक शुद्धी होईल.
पंचामृत स्नान, भस्म स्नान, इ. प्रकारावरील सविस्तर आरोग्यटीपा यापूर्वी आपण वाचलेल्याच असतील.
स्नान करीत असताना काही सूक्ते म्हणायला सांगितलेली आहेत. मंत्राचे विशिष्ट स्वरामधे उच्चारण केले असता, त्यातून निर्माण होणारी स्पंदने, लहरी यांनी वातावरण सात्विक बनते. घंटा, शंख इ. मुळे निर्माण केल्या नादामुळे काही जंतु मरतात, असेदेखील वाचल्याचे स्मरते. मंत्र स्वतः म्हटले तर उत्तमच, पण केवळ ऐकले तरी आरोग्याची प्राप्ती होते, असाही एक संदर्भ मंत्रोच्चाराच्या फलश्रुतीचा मिळतो. गायत्री मंत्राच्या योग्य उच्चाराने, कॅन्सर सारख्या रोगाच्या पेशींची वाढ थांबते, असेही लक्षात येत आहे. मात्र मंत्राचे उच्चारण निर्दोष हवे, स्पष्ट हवे, जीभेला पहिल्यापासूनच तशी सवय हवी तरच ते उच्चार जमतात, नाहीतर अर्थाचे अनर्थ होऊ शकतात, म्हणूनच समाजातील काहीजणांनाच ते काम नेमून दिलेले होते. जर उच्चारात जरा चुक झाली तरी निर्माण होणाऱ्या लहरींची स्पंदने बदलतात, आणि अर्थ चुकतो. चिता आणि चिंता, खून आणि खूण, जहाज, चमचा, श आणि ष यातील उच्चारात फरक पडून चालत नाही.
काही वेळा शब्द उच्चारणाऱ्याला त्या शब्दांचा अर्थ माहिती असत नाही, पण ज्याला तो अर्थ समजला पाहिजे, त्याला जर योग्य उच्चारात एखादे वाक्य ऐकवले तर, या वाक्यातून जे समजायला हवे होते ते त्याला सहज कळते.
जसे, “आज सांच्याक तुका चाराक सावतांथुय च्यॅयक बोल्लयला आसा” हे मालवणी वाक्य, मालवणी न कळणाऱ्या माणसाला काहीच अर्थबोध घडवणार नाही. पण ज्याला अर्थ कळणार नाही त्याने, जर हे वाक्य नीट उच्चारासह पाठ केले, आणि ज्याला मालवणी भाषा समजते, त्याच्यासमोर जाऊन उच्चारले तर ? ….
……..त्या मालवणी माणसाला कळेल की, ” मला सायंकाळी चार वाजता सावंत यांच्याकडे चहा प्यायला बोलावले आहे.”
कळले का मंत्रामधील उच्चाराचे महत्त्व ?
जे जे देवासाठी, ते ते देहासाठी.
जरा जरी फरक झाला तरी नुकसान हे ठरलेले.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
01.06.2017
Leave a Reply