आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 18-पुष्प सहावे
आपल्याकडे सार्वजनिक धार्मिक कार्यक्रम असला की तोरणं बांधायची पद्धत आहे. आंब्याची पाने, नारळाच्या झावळ्या, भेडलेमाडाची कातरी पाने, केळीची झाडे, गोंड्याच्या माळा, नारळाचे तोरण, भाताच्या लोंब्या, इ.इ. नी अंगण, दरवाजे, प्रवेशद्वार सजवले जातात. याचं आयुर्वेदात काही महत्त्व असेल का ?
आंब्याच्या पानाला एवढे महत्व का दिले असेल ? दरवाज्याच्या तोरणासाठी तेच, गुढीसाठी तेच, कलशस्थापना करण्यासाठी आंब्याचा टाळ हवाच. अभिषेक करताना देखील आंब्याची पाने हवीत, हळद चढवायला देखील आंब्याचीच पाने. इतकंच काय तर विवाह होमाच्या वेळी विस्तव आणताना देखील ताज्या आंब्याच्या पानानी हा विस्तव झाकून आणला जातो.
उत्तम जंतुनाशक गुण आंब्याच्या पानात दडलेले आहेत. प्रमेहामधे आंब्याची पाने वापरली जातात. आंब्याच्या पानातून येणारा चीक आणि वास देखील औषधी आहे. म्हणून तर आंब्याच्या लोणच्यामधे देठाचा भाग असलेल्या फोडी आवर्जून घातल्या जातात. त्यातील औषधी चीक आणि वास यावा यासाठी आणि जंतुसंसर्ग न होता लोणचे वर्षभर टिकावे यासाठीच !
हे आम्रपल्लव जसे आध्यात्मिक कर्मकांडामधे आहेत, आंबा, वड, पिंपळ, पायर (म्हणजे प्लक्ष किंवा पिंपुरणी,) औदुंबर याना अध्यात्मामधे विशेष महत्व आहे, तसेच पंचपल्लव आयुर्वेदात सांगितलेले आहेत.
(आम्र जंबु कपित्थानाम् बीजपुरक बिल्वयो: ।।)
जी गोष्ट आंब्याची तीच झेंडू किंवा गोंड्याची. गुढी तोरणामधून सर्वत्र सूक्ष्मातून जंतुनाश व्हावा, साथीचे रोग येऊ नयेत यासाठी केलेल्या या आध्यात्मिक उपाययोजना तर नसतील ?
हे सामाजिक आरोग्य सांभाळण्यासाठी केले जाणारे सार्वजनिक उपचार असू शकतात का ? असा दावा नाही, पण काहीतरी तथ्य असणारच. आपण ते एकतर डोळस बुद्धीने म्हणजे ज्ञानयोग वापरून, किंवा सांगितलेले कर्म, रूढी परंपरा म्हणून करत रहावे, म्हणजे कर्ममार्गी व्हावे किंवा विकल्प मनात न आणता साध्या सोप्या भक्ती मार्गाने जावे. पण काहीच करणार नाही, आणि फक्त विरोधाला विरोध करीत रहायचे असे मात्र नको.
गुढी उभारली जाते. सगळ्यांकडे एकाच वेळी एकाच पद्धतीने उभारली जाते. एकाच पद्धतीने गोंड्याची माळ, आंब्याची कडूलिंबाची पाने, तांब्याचा कलश, दरवर्षी ओला नवीन बांबू, दरवाज्यामधे स्थापना, कढीलिंबाची चटणी खाऊन वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरवात करायची. हे सर्व का केले जाते ? केवळ भक्ती ? केवळ धर्म ? केवळ कर्मकांड ? केवळ रूढी परंपरा ? केवळ वार्षिक उत्सव ? केवळ दिखावा ?
नक्कीच नाही. नीट डोळे उघडून पाहिले तर त्यात दडलेले सार्वजनिक आरोग्य दिसेल.
सहस्त्र तुलसीदले, सहस्त्र दुर्वा, सहस्त्र बेल सहस्त्र नामानी कशासाठी वाहिले जातात ? एकीकडे सांगायचे सगळे देव एकच आहेत. कोणत्याही देवाला हाक मारा, ती एकाच ईश्वरापर्यंत पोचते, मग हजारदा त्याचेच नाव का उच्चारायचे ? एकदा हाक मारून पुरणार नाही का ? असे असंख्य प्रश्न आज केवळ अज्ञानामुळे अनुत्तरीत रहातात आणि धर्माकडे पहाण्याचा दृष्टीकोन विकृत होऊ लागतो.
काही ना काही निमित्त करून ही कर्म कांडे पुनरावृत्त करण्यामागे “बूस्टर डोस” देण्यासारखा हेतू तर नसेल ?
या सर्व कर्मकांडामागे लपलेले आरोग्य शोधायचे कुणी ? निदान विचार तरी सुरू करूया.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
11.06.2017
Leave a Reply