आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 21-धूपं समर्पयामी-भाग दोन
धूपन ही एक उत्तम चिकित्सा म्हणून आयुर्वेदात वर्णन केली आहे. औषधे टिकून रहावीत यासाठी जी भांडी बरण्या वापरल्या जात त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या लाकडाच्या धुराने धुपीत करून घ्यायला सांगितले आहे. उद्देश्य एकच. जंतुनाश ! जखमेतील सूक्ष्म जीव नाहीसे व्हावेत, मरून जावेत, जखमांना धूप दाखवण्याची पद्धतही आपल्याकडे आहे. अनेक प्रकारचे हट्टी त्वचारोग धुपन केल्यावर काबूत येतात. धुपन करण्याची अगदी साधी सोपी पद्धत आहे. कोळसा पेटवून लाल करून घ्यावा, त्यावर धूपन द्रव्य घालावे, आणि जिथे आवश्यक आहे तिथे युक्तीने फिरवावा.
कोळसा नसेल तर काय ? आणि धूपन द्रव्य कोणती ? असेच प्रश्न आले ना मनात.
कोळसा नसेल तर नारळाची करवंटी गॅसवर ठेवावी आणि पेटवावी. पूर्ण पेटल्यावर ती एका पत्र्यावर काढून घ्यावी आणि त्यावर कोणत्याही प्रकारचे तीक्ष्ण वास येईल अशी जंतुनाश करणारी द्रव्य घालावे. जसे धूप, हळद पूड,कांद्याची साले, लसणीची साले, लवंग, वेलचीची टरफले, काजूची टरफले, मिरचीचे देठ, मीठ मोहोरी, तूप तांदुळ, कढीलिंबाची किंवा कढीपत्त्याची पाने, ज्यातून तीक्ष्ण वास येईल असे काहीही चालेल. ज्याचा दळ गेलेला आहे असा मसाला, किड पडलेली हळकुंडे, टोके झालेली मिरचीपूड, यापैकी सुद्धा काहीही चालेल. पण प्रमाण कमी वापरावे. अगदी चिमूटभर. नाहीतर धूप, गुग्गुळ, हिंग, डिंक, यासारखे नैसर्गिक निर्यास, नाहीतर काळाच्या ओघात फुकट गेलेली आयुर्वेदातील चूर्ण, जसे त्रिफळा चूर्ण, अविपत्तिकर चूर्ण, हिंग्वाष्टक चूर्ण, यापैकी चूर्ण देखील धूपाप्रमाणे वापरावे. आपल्याला तीक्ष्ण वास तयार करायचा आहे, हे तत्व लक्षात ठेवायचे. आणि त्या वासाचा आपल्याला त्रास न होता, फक्त रोगजंतु घराबाहेर जावेत हा हेतु, ही युक्ती मात्र वापरावी. नाहीतर घरात एवढा धूर होईल की, आपणालाही आपले घर सोडावे लागेल ऐसे न व्हावे !
वर्षातून एकदा घरामधे होम करावा तो यासाठी असाही विचार करायला हरकत नाही. यासाठी द्रव्य म्हणून अनेक प्रकारच्या समिधा वापरल्या जातात. वड, गुळवेल, औदुंबर, पिंपळ, रूई, पळस, दुर्वा, तीळ, शिजलेला भात, रेशमी वस्त्र, केळी, नारळ, तूप, इ. अनेक हविर्द्रव्य सांगितलेली आहेत. ही सर्व औषधे आहेतच. यांचा धूर महा औषध आहे.
एक साधे उदाहरण बघूया. जो मिरची चावतो, त्याला ती तिखट लागते, नाकातोंडातून पाणी येते, डोळे चुरचुरतात, अंगाची आग होते हे फक्त मिरची चावणाऱ्यालाच होते इतरांना नाही. पण हीच मिरची निखाऱ्यावर टाकली तर हीच सर्व लक्षणे तिथे आसपास असणाऱ्या सर्व माणसांवर दिसतात. याचा अर्थ एक मिरची जर जाळली तर त्याचा परिणाम सार्वजनिक स्वरूपात दिसतो, आणि चावण्यापेक्षा जहाल रूपात दिसतो. हा आहे धुराचा सूक्ष्म परिणाम. त्रिफळा किंवा हळदी सारखे प्रमेहावर काम करणारे औषध, दोन चिमूट प्रमाणात जर निखाऱ्यावर धुपाप्रमाणे घालून रोज सकाळी सायंकाळी घरात सर्वत्र फिरवले तर ? ….
तर निर्माण होणारा धूर प्रमेहातील क्लेद म्हणजे चिकटपणा कमी करायला मदत करतो, असा अनुभव घेतला आहे. आपणही असा प्रयोग करायला हरकत नाही. अपाय नक्कीच नाही.
आपल्याकडे सायंकाळी मीठ मोहोरीची दृष्ट काढण्याची पद्धत आहे. ती या चिकित्सेतीलच एक भाग आहे. हा “मिनी होम” झाला. सायंकाळच्या वेळी घरात प्रवेश करणाऱ्या वाईट शक्तींना, जीवजंतुंना, अटकाव करण्यासाठी हा धूर मदत करणार नाही का ?
ज्यांना या शक्तींचे अस्तित्व मान्य नाही, त्यांनी देखील असा धूर घरात रोज सकाळ संध्याकाळ करावा. त्यांचे विचार शुद्ध व्हायला वेळ लागणार नाही.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
14.06.2017
Leave a Reply