आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 22-धूपं समर्पयामी-भाग तीन
दृष्ट काढणे ज्यांना अगदीच गावंढळ आणि कालबाह्य वाटत असेल त्यांच्यासाठी आणखी एक शास्त्रोक्त पर्याय आपल्याकडे आहे, तो म्हणजे अग्निहोत्र. वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झालेल्या या यज्ञ चिकित्सेने फक्त भारतातच नव्हे तर परदेशात सुद्धा प्रचंड मोठे मानाचे स्थान मिळवलेले आहे. काही देशातील कायदे देखील या यज्ञासाठी पालटण्यात आलेले आहेत. एक भारतीय म्हणून अभिमान वाटावा अशी ही अग्निहोत्र चिकित्सा.
अग्निहोत्र हा अगदी साधा सोपा विधी आहे. घरी, शेतावर, कार्यालयात, गाडीमध्ये अगदी 10 मिनिटात करता येतो. फक्त अग्निहोत्रासाठी सुर्योदय व सूर्यास्त ह्या दोन्ही वेळा पाळायच्या असतात. त्या काटेकोर पाळल्यास त्याचे फायदे प्रचंड आहेत. यावर पुणे विद्यापीठामधे प्रबंध पण सादर झालेला आहे. आणि गंमत म्हणजे हा प्रबंध सादर केलाय ऑस्ट्रीया येथील एका अभ्यासकाने !
अग्निहोत्रासाठी खालील गोष्टी लागतात.१. तांब्याचे अथवा मातीचे पिरॅमिडच्या आकाराचे हवन पात्र.
२. गाईच्या दुधापासून बनवलेले शुद्ध तूप २-३ चमचे.
३. गाईच्या शेणाच्या गोवऱ्या ४-५ तुकडे.
४. हातसडीचे अख्खे तांदूळ दाणे म्हणजे अक्षता. ४-५ ग्रॅम. सूर्योदयाचेवेळी ह्या तांब्याच्या पात्रात गाईच्या गोवऱ्यांवर थोडे तूप लावून, त्या पेटवून त्यामध्ये गाईच्या तुपात भिजवलेल्या अक्षता खालील मंत्र म्हणत हवन म्हणून अर्पावे लागतात.
सूर्याय स्वाहाः | सूर्याय इदम् न मम ||
प्रजापतये स्वाहाः | प्रजापतये इदम् न मम || सूर्यास्तावेळी अग्निहोत्र करावयाचे असल्यास खालील मंत्र म्हणावे लागतात. अग्नये स्वाहाः | अग्नये इदम् न मम ||
प्रजापतये स्वाहाः | प्रजापतये इदम् न मम ||
इदम् न मम म्हणजे हे माझे नाही याची मला पूर्ण खात्री आहे. हे तुझे तुलाच अर्पण. हा भाव मनात ठेवणे म्हणजे इदम् न मम ।
हे सर्व अर्पण केल्यावर पाच मिनिटे शांतपणे अग्नीसमोर बसणे. येत असलेल्या ज्वाळा आणि धूर याकडे शांत बसून ध्यान केल्यास खूप शांतीचा अनुभव येतो.
हा निर्माण होणारा धूर अनेक रोगावरील औषध आहे. एन्फ्लुएन्झा, काॅलरा, टीबी, इ. रोगांचे जंतु या धुराने मरतात, असे (परदेशातील सुद्धा ) प्रयोगशाळेत सिद्ध झालेले आहे. अग्निहोत्राच्या राखेचे पाणी देखील अम्लपित्त, ग्रहणी, उष्णतेचे आजार, पचन विकृती आमि अनेक मानसिक आजारांवर अतिशय प्रभावी परिणाम दाखवतात.
काळानुसार आपण बदलले पाहिजे, या तत्वानुसार मोठ्या यज्ञांपेक्षा हे छोटे अग्निहोत्र घरच्या घरी दररोज केले तर अधिक फायदा होतो.
शेतीसाठी देखील हा धूर किटकनाशक म्हणून सिद्ध झालेला आहे. अनेक देशामधे आज अग्निहोत्र शेती सुरू आहे.
अग्निहोत्रासाठी ज्या गोवऱ्या लागतात, त्या भारतीय गो वंशाच्याच लागतात. पाश्चात्य गोवंशामध्ये औषधी गुण नाहीत हे पण यापूर्वी अनेक वेळा सिद्ध झालेले आहे.
म्हणजे घर निर्जंतुक होण्यासाठी धूर तयार व्हायला हवा, तो औषधी हवा, त्याठी अग्निहोत्र करायला हवे. अग्निहोत्रासाठी गोवऱ्या हव्यात. त्यासाठी शेण हवे, त्यासाठी गाय हवी, ती भारतीय वंशाचीच हवी. म्हणजे तिची जोपासना व्हायला हवी. ही एक साखळी आहे. आरोग्य मिळवण्यासाठी ही साखळी पूर्ण होणे आवश्यक आहे. म्हणजेच पूर्ण आरोग्य मिळवण्यासाठी “भारतीयत्व” हा एक महत्त्वाचा दुवा आहे.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
15.06.2017
Leave a Reply