आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 26-दीपं दर्शयामी-भाग तीन
जसे इंधन तशी काजळी.
जर दिवा तेलाचा असेल तर काजळीचे प्रमाण वेगळे. मेणाचा असेल तर वेगळे. राॅकेलचा असेल तर काजळी जास्ती आणि पेट्रोल जाळले तर काजळी एकदम कमी. स्पिरीटला काजळी धरणारच नाही, तर विमानातील इंधनाची ज्योतच दिसणार नाही. म्हणजे जसे इंधन तशी काजळी. भगवत गीतेमधे या अर्थाचा एक श्लोक आला आहे…
भक्ष्ययते यद् ध्वान्तम कज्जलम च प्रसूयते।
यद् दीपोज्वलेत कज्जली भवेत् ।
जायते तादृशी प्रजा।
झिरोचा बल्ब, एल ई डी बल्ब, ट्यूबलाईट, फ्लुरोसंट बल्ब, हॅलोजन, हाय मास्क बल्ब या प्रत्येकापासुन मिळणारा प्रकाश वेगवेगळा.
आपल्याला ज्या कारणासाठी प्रकाश हवा आहे, त्याप्रमाणे योजना हवी. फक्त मलाच वाचायचे आहे, किंवा लेखन करायचे असेल तर टेबल लॅम्प पुरतो ना ! तिथे हॅलोजन नको ! आता तर पेनच्या रिफिलच्या टोकापुरताच उजेड पाडणारी पेन पण निघाली आहेत.
या प्रत्येक यंत्रणेला लागणारी विद्युत उर्जा देखील वेगवेगळी असते. काही ठिकाणी एसी करंट, काही ठिकाणी डीसी करंट काही ठिकाणी स्टॅबीलायझर, काही ठिकाणी अॅडेप्टर, तर काही ठिकाणी फक्त मायक्रोचीप पुरते. तसेच आहे. दिव्यातील इंधन जसे असेल तसे परिणाम आपणास मिळतात.
जो दिवा देवासाठी तसाच तो देहासाठी समजून घ्यावा. जशी काजळी दिव्यामधे तशी देहामध्ये देखील काजळी बनते. आपल्या अन्नाचा दर्जा जसा असेल, तशी काजळी बनण्याचे प्रमाण कमी जास्त होईल.
खाल्लेल्या अन्नातून चांगले आणि वाईट असे दोन भाग तयार होतात. चांगल्या उत्तम प्रतीचा आहार जर आपण सेवन केला तर तयार होणारे प्राॅडक्ट उत्तम प्रतीचेच असणार. मध्यम प्रतीचा आहार घेतला तर मध्यम प्रतीचे प्राॅडक्ट तयार होणार. आणि हलक्या प्रतीचे अन्न घेतले तर हलक्या दर्जाचे प्राॅडक्ट तयार होणार.
आड्यात जे असेल तेच पोहोऱ्यात येणार ना !
बिर्याणी करायची असेल तर तांदुळ बासमतीचाच हवा. साधा भात करायचा असेल तर तांदुळ मसूरी किंवा कोलम हवा. आणि पेज करायची असेल तर उकडा तांदुळ उत्तम असतो. आपल्याला कोणते प्राॅडक्ट बनवायचे आहे ते ठरवले तर तांदुळ कोणता वापरायचा ते निर्णय बदलतात.
तसेच शरीर पुष्ट करायचे असेल तर आहाराची योजना वेगवेगळी हवी. केवळ मांसधातु वाढवायचा असेल तर आहार वेगळा, रक्त वाढवायचे असेल तर आहार वेगळा आणि सगळेच धातु वाढवायचे असतील तर आहार वेगळा असतो.
या अन्नाच्या दर्ज्याला आयुर्वेदीय ग्रंथकार आणि गीताकार, सत्व रज तम असे नामाभिधान करतात.
आहार सात्विक असेल तर सर्व इंद्रिये, अवयव, धातु, अगदी मन सुद्धा सात्विक बनते. आहार राजसिक असेल, तर शरीरावर होणारा परिणाम राजसिक असतो, आणि आहार तामसिक असेल तर विचार आणि कृती तामसिक होते. हेच सांगण्यासाठी, पटवून देण्यासाठी, (पटवून घेणाऱ्याला) दिव्याचे उदाहरण ग्रंथकर्ते देतात.
“शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी” असे तुकाराम महाराजांनी देखील म्हटलेले आहे.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
19.06.2017
Leave a Reply