आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी – भाग 35
नैवेद्यम् समर्पयामी – भाग नऊ
देवाचे जेवण पूर्ण झाल्यावर ताम्हनात तीन पळ्या पाणी सोडायला सांगितले जाते. जर भटजींनी म्हटलेले मंत्र नीट ऐकलेत, तर यातील अर्थ लक्षात येतील. नाहीतर एकाबाजूने भटजी मंत्र म्हणताहेत, आणि दुसऱ्या बाजूला पूजा करताना यजमान मोबाईल वर बोलाताहेत, आणि यजमानीण आपला मेकअप करतेय, असे असेल तर हे केवळ कर्मकांड होते आहे असे समजावे. मग कावळे काव काव करायला टपलेले आहेतच. “अशी कर्मकांडे करण्यात वेळ कशाला घालवा ? जो नाहीच आहे त्याला नैवेद्य तरी कशाला दाखवा.” वगैरे वगैरे.
तर भटजी असं म्हणतात, तीन वेळा ताम्हनात पाणी सोडा.
नैवेद्यान्तरेण आचमनीयम् समर्पयामि ।
हस्तप्रक्षालनम् समर्पयामि ।
मुखप्रक्षालनम् समर्पयामि ।
जेवणानंतर एक वेळा आचमन करावे. देवाचे नाव घेऊन एक पळी पाणी तळहातावर घेऊन पिणे म्हणजे आचमन करावे.
खरंतर प्रत्येक घासच देवाचे नाव घेत तोंडात घालायचा असतो. निदान तसा भाव तरी ठेवायचा. “आतले अन्न पचवायला मी आता देवाला सांगितलेले आहे, आता मला काळजी नाही, त्यातील गुणदोष तो बघेल.”
खाताना भीती नसावी आणि खाल्ल्यानंतर आठवण न यावी. या दोन्ही गोष्टी देवाच्या स्मरणाने साध्य होतात. म्हणूनच भगवंत म्हणतात, “तुझा अधिकार फक्त कर्म करण्यापुरता. ( फक्त माझे स्मरण करत अन्न गिळायचे…) म्हणजेच केलेले कर्म तू मला अर्पण करणे. मी तुला त्याचे योग्य ते फळ, वेळ आल्यावर देणार आहे. यावर विश्वास ठेवायचा. म्हणजे पचन सुलभ होते.
आचमन करण्याने, अन्ननलिकेला आतील बाजूला लागलेले अन्न पुढे ढकलून अन्न नलिका धुतली जाते. एवढंच पळीभर पाणी जेवणानंतर घ्यावे, हा पण एक सोयीस्कर अर्थ.
जेवणानंतर देवाचे हाय धुवायला पाणी दिले जाते, तोंड धुवायला, चूळ भरायला, त्याच्या हातावर पाणी घातले जाते. केवढी एकरूपता साधली जाते. आपल्याकडे जेवायला आलेल्या प्रत्येक पाहुण्यांना सुद्धा आपण असाच उपचार करावा. ( केवळ व्हीआयपी पाहुण्यांना नको )
त्याही आधी जेवल्यानंतर हात धुवायचे असतात आणि खळखळून चूळ भरायची असते, एवढे तरी सांगितले गेलंय.? कोणासाठी सांगितले असेल हे कर्मकांड ? देव जो स्वतः निर्लेपी, निर्मोही, निर्गुण निराकार आहे त्याच्यासाठी ???
जे जे देवासाठी ते ते देहासाठी.
वीतभर वाटीत बोटं बुचकळली आणि टीचभर पेपरला तोंडं पुसली की झालं हस्तमुख प्रक्षालन ! काय चाललं आहे ? कुठे भारतीय संस्कारातील दोन्ही हात स्वच्छ धुणे, खळखळून चुळा भरणे आणि कुठे पाश्चात्य प्रकारातील वाटीभर पाण्यात फक्त एका हाताची बोटे बुडवणे आणि ओठावरून कागद फिरवणे ?
नियमितपणे जर पाण्याने खळखळून चुळा भरल्या जात असतील तर दात किडत पण नाहीत, चुळ भरण्याने दातात अडकलेले अन्नकण बाहेर निघून जातात. आणि दाताला किड लागण्यापासून वाचवले जातात, म्हणून काही खाल्ल्यानंतर तोंड धुवावे, हात धुवावेत, हे देवपूजेच्या माध्यमातून दररोज सांगितले जाई.
पाश्चात्य देशात हस्त, मुख प्रक्षालन कसे करावे हे माहितीच नव्हते, वेळ मिळेल तेव्हा, पावासारखे सुके पदार्थ फिरत फिरत खायचे, आमटी भाजी, चटणी लोणचे असे ओले पदार्थच त्यांच्या ताटात न आल्याने, हाताला अन्न चिकटत नव्हते. त्यामुळे तोंड, हात धुणे हा संस्कार त्यांच्या संस्कृतीमध्येच नव्हता.
अन्न हातानी मुरडणे, कालवणे, एका हातानी त्याचे घास करणे, एका हातानीच खाणे, खाल्ल्यानंतर हात उष्टे होतात, म्हणून ते धुणे, हे त्यांच्या संस्कृतीमध्येच नव्हते. त्याचा परिणाम म्हणून या सर्व पाश्चात्य लोकांना दात आणि हिरड्यांच्या मोठ्या समस्या निर्माण होतात. आणि या समस्या निवारणासाठी दंततज्ञ !! आपल्या गावात, तीस वर्षापूर्वी किती डेन्टीस्ट होते, आणि आता गावामधे दंततज्ञ किती आहेत ? ओझरता सर्व्हे केलात तरी, यांची वाढलेली संख्या लक्षात येते. या दातांच्या रोगाची मूळ कारणे कुठे आहेत, कशात आहेत, याचा एकदा शोध घेतला पाहिजे.
ज्या पाश्चात्य देशात एकेकाळी दात घासणे, चुळ भरणे, गुळण्या करणे कधी माहितीच नव्हतं, त्यादेशातील लोकांनी, ज्या भारत देशातील वयोवृद्धांचे बत्तीस दात स्मशानामधे सुद्धा मोजून घेतले जात… अश्या आमच्या भारत देशातील लोकांचे, “मौखिक आरोग्य कसे चांगले राहील?” यावर चर्चासत्रे घ्यावीत, यापेक्षा मोठा विनोद नाही.
……..पण आज जमाना बदल गया है। यालाच “कलियुग” असे नाव. दुसरं काय म्हणणार ?
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
28.06.2017
Leave a Reply