आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी – भाग 37
नैवेद्यम् समर्पयामी – भाग अकरा
नैवेद्य सेवन करून झाल्यावर हात तोंड धुवुन झाल्यावर आणखी एक अनोखा उपचार केला जातो. तो म्हणजे चंदन लावणे.
“करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामी” असा मंत्र म्हणून देवाच्या हाताला चंदन लावले जाते.
हे चंदन, चंदन या झाडाच्या खोडापासून उगाळलेलं असावं. चंदनाची पावडर, गोपीचंदन, कुंकू पाण्यात कालवून गंध तयार करणे, अष्टगंध पाण्यात कालवणे, यापेक्षा चंदन उगाळून ते वापरणे हे देवाला आवडते. देवाला म्हणजे आपल्या देहातील अंतःस्थ देवाला !
जेवढे जास्त उगाळावे तेवढा चंदनाचा सुवास आणि औषधी गुणधर्म बाहेर येत जातात.
चंदन कपाळाला लावले जाते, ते औषध म्हणून ! अतिशय थंड गुणाच्या या चंदनाची उटी अंगाला लावणे, ही पद्धत दक्षिण भारतात आजही आहे दक्षिण भारतातल्या सर्व देवालयामधून चंदन उगाळणारी खास माणसे असतात आपल्याकडे जसा तीर्थप्रसाद देतात, तसा दक्षिणेकडे उगाळलेले चंदनाची गोळी प्रत्येकाच्या हातावर देतात, ती प्रत्येकाने आपल्या कपाळावर लावावी, असा संकेत आहे. स्त्री आणि पुरूष असा भेद न करता हे चंदन लावले जाते. फक्त महाराष्ट्रात उभा टिळा लावतात, तर दक्षिणेत आडवा. एवढाच फरक. पण चंदन तेच. काम तसेच. औषधी गुण तेच.
जेवणानंतर हाताला जेवणातील पदार्थांचा वास राहिलेला असतो. किंवा काही तेलकट पदार्थ हाताला चिकटतात. ते निघून जावेत, असं हे कर्मकांड. आजही आपल्याकडे जेवण झाल्यावर पानात राहिलेली लिंबाची फोड अथवा मीठाची चिमूट जेवल्या हाताला चोळून घेतात. ती याचसाठी. लिंबाच्या रसामुळे बोटांना लागलेला रस्सा, भज्यांचे तेल, लोणच्याचा अंश, आदि भोजनांश सहजपणे निघून जावेत. हात स्वच्छ व्हावेत. उगाळलेल्या चंदनाची जागा फक्त ताटातील लिंबाच्या फोडीने घेतली इतकेच ! कालानुरूप फरक पडतो तो हा असा !
जेवणानंतर हाताला लागलेला मसाला आदि जरी अगदी विषारी नसले तरी दाह करणारे असतात. जसे पाटावरवंट्यावर मिरच्या वाटल्यानंतर बोटांची होणारी आग किंवा दाह केवळ पाण्याने धुऊन जात नाही, त्यासाठी तेल गुळ असे पदार्थ वापरावे लागतात. तसंच जेवणानंतर हाताला जो मसाल्याचा सूक्ष्म अंश असतो, तो जावा, यासाठी हे चंदन लेपन. हे कपाळावर नसून हाताला बोटाला आहे, हे लक्षात घ्यावे.
जे जे देवासाठी ते ते देहासाठीच असते, हे कधीही विसरून चालणार नाही. त्यातील कर्मकांडे ही मानवी मूल्यांच्या संवर्धनासाठी असतात. ही शोधण्याची दृष्टी तोच देत असतो, यालाच देवाची कृपा म्हणतात. तोच कर्ता करविता मी निमित्तमात्र !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
30.06.2017
Leave a Reply