आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी – भाग 38
नैवेद्यम् समर्पयामी – भाग बारा
अन्नंब्रह्मारसोविष्णुर्भोक्तादेवोमहेश्वरः।।
अन्न हे ब्रह्मस्वरूप आहे. अन्नाच्या सहा चवी या स्वयं विष्णु आहेत. आणि भोजन करणारा हा प्रत्यक्ष देवाधिदेव महादेव आहेत. म्हणजे आपण जे जेवतो ते भोलेनाथांसाठी असा भाव ठेवावा.
अहं वैश्वानरोभूत्वाप्राणिनांदेहमाश्रितः।
प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नंचतुर्विधम् ।।
अमृतोपस्तरणमसी…पाश्य मौनी ।
…..जलंस्पृष्ट्वा यथेष्टं भोजनंकुर्यात् ।।
एकदा जेवायला सुरवात केली की जेवण संपेपर्यंत मौन पाळावे. यथेष्ट (यथेच्छ नव्हे ! यथा इष्ट, म्हणजे जे आपल्या प्रकृतीला योग्य असेल ते! आणि यथेच्छ म्हणजे मला जे खावेसे वाटते ते. किती फरक आहे ना ! शेवटी आरोग्य महत्त्वाचे!
जेवण पूर्ण झाले की, जी आपोषणी घ्यायची असते, त्या पळीभर पाण्यामधील अर्धे पाणी अंगठ्यावरून पितरांसाठी जमिनीवर सोडायचे असते.
किती सूक्ष्म विचार केला आहे पहा, हात आणि तोंड धुवायला अंगणामधे जावे. (ताटामधेच किंवा बाऊलमधेच पुचुक पुचुक करू नये.) येताना पायावर बाहेरील जमिनीवरचे जे जीवजंतु अंगावर येऊ नये म्हणून परत येताना सुद्धा हातपाय धुवूनच घरात यावे. (अंगणादौ पाणिमुखेसंशोधयेत् । हस्तौ पादौ प्रक्षाल्याचम्य शतपदनिगत्वा।)
हातपाय धुवून येताना पोटावर हात फिरवत यावे आणि अग्निदेवतेला सांगावे, “मी जे अन्न खाल्लेलं आहे ते, काहीही शेष न राहाता जिरून जावे. या देहाला सुख प्राप्त व्हावे, या अन्नामुळे माझे सर्व शरीर रोगरहित व्हावे.”
हे म्हणत म्हणत, असा भाव मनात ठेवत, पोटावरून उलटसुलट हात फिरवावा, म्हणजे जेवताना अन्नपाण्याबरोबर गिळली गेलेली हवा किंवा पचनामधून तयार झालेला वात बाहेर येतो. (ज्याला आपण ढेकर म्हणतो.) आणि पचन सुधारते.
(….इत्युदरंपरिमृज्य…..)
(ही सर्व संस्कृत अवतरणे ऋग्वेदीय ब्रह्मकर्म या पोथीतून घेतली आहेत.)
जेवण झाल्यावर पोटावरून हात फिरवणे ही किती छोटी गोष्ट आहे, ( असे रोज दोन्ही वेळा करावे, म्हणजे आपले पोट किती वाढत आहे याकडे आपले लक्ष वेधले जाते हा दूरदृष्टीचा अॅगल ) पण तेवढा सुद्धा वेळ आपल्याकडे असत नाही. पोट पुढे यायला लागले की मग मात्र पोट पुढे आलेल्याच डाॅक्टरांच्या दवाखान्यात किती वेळ जातो, याचे मोजमापच नाही. ????
भोजनापूर्वी कुत्रा, मांजर, पोपट आदि पाळीव प्राणी यांना जेवू घालावे. घरासमोर आलेल्या अतिथीला अन्नदान करावे. घरामागे बांधलेल्या गाईवासरांसाठी गोग्रास काढावा. जेवायला सुरवात करताना भूतबली काढावा, कावळ्याला घास ठेवावा. आणि जेवणानंतर पितरांसाठी अन्नपाणी द्यावे.
असा समष्टी विचार भारत सोडून अन्य कोणत्याही देशात केला जातो का ? केला जात असेल का ?
नक्कीच नाही.
म्हणून तर संपूर्ण जगामध्ये फक्त आपल्या प्रिय भारत देशाला “माता” असे संबोधले जाते.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
01.07.2017
Leave a Reply