आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे क्रमांक तीन – रोगाचे लेबल लावू नका.”
ज्याप्रमाणे एखाद्या एसटी ला पाटी लावली की ती गाडी त्याच मार्गाने फिरेल. त्याच मार्गाने जाताना त्याच सर्व नियमांचे पालन करावेच लागेल. तेच सर्व खड्डे, तेच स्पीड ब्रेकर, तेच अडथळे, तेच वाहतुकीचे नियम, तेच थांबे, तीच वेळ, तशीच गती अपेक्षित ठेवली जाते. कारण आपण गाडीला बोर्ड लावलेला असतो. हा बोर्ड लावला नसता तर हीच गाडी मोकळेपणाने कुठेही सहजपणाने फिरवता आली असती.
हं! रोगाच्या बाबतीत असेच आहे. एकदा आपण आपल्याला विशिष्ट रोगाचे लेबल चिकटवून घेतले की, स्वतंत्र विचाराने जाऊच शकणार नाही.
जसे, मी रक्तदाबाचा रोगी आहे, असे स्वतःला लेबल चिकटवले, डाॅक्टरनी तसे सांगणे हे डाॅक्टरांचे कर्तव्यच आहे, त्यामुळे ते तसे सांगणारच. पण आपण ठरवायचे आहे की मी या कायमस्वरूपी रोगाची पाटी मला चिकटवून घ्यायची आहे की नाही.
एकदा मी रक्तदाबाचे लेबल लावले की सहजपणे आपण गृहीत धरतो,
आता ही औषधे कायमची…..
कुठेही गेलो तरी औषधे लक्षात ठेवायची कायमची…….
या औषधांबरोबर त्याचे दुष्परिणाम कायमचेच…
त्यासाठी दरमहा तपासणी कायमची……
वैद्यकीय खर्च कायमचा…..
मीठ कमी अळणी जेवणे कायमचे…..
अधिक श्रमाची कामे बंद कायमची…..
तेल तूप नारळ शेंगदाणे बंद कायमचे…..
कधीच टेन्शन घ्यायचे नाही, याचे टेन्शन कायमचे……
यामधे जरा चूक झाली की जे होईल त्याला मीच जबाबदार आहे, कायमचा ……
आणि हे वयाच्या तिसाव्या वर्षीपासून आजन्म….
संपला जीवनातला आनंद !
आणि येतं अकाली वृद्धत्व.
लवकर म्हातारे झाल्यासारखं वाटू लागतं.
पुल म्हणतात तसं
……..जेव्हा भज्याच्या वासाने मन भरून जायच्या अगोदर जेव्हा अॅसिडीटी आठवते, तेव्हा समजावं आपण म्हातारे झालो…..
……..तरूणीकडे लक्ष जाण्याअगोदर जेव्हा तिच्या कडेवरील मुलाकडे पहिले लक्ष जाते तेव्हा समजावं आपण म्हातारे झालो…
…….पिकनिकला निघताना औषधांच्या डब्याची जेव्हा आठवण होते, तेव्हा खुशाल समजावं, आपण म्हातारे झालो….
म्हणूनच म्हणतो,
सदा तरूण रहा.
काढून टाका गाडीचा बोर्ड आणि मस्त फिरवा गाडी, मन मोकळेपणाने.
आणि एन्जाय करा जीवनाची पिकनिक. औषधांच्या डब्याशिवाय !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
18.04.2017
Leave a Reply