जीवनातल्या मंगलकलशा नाव तुझे आई असू दे
स्तोत्र तुझे गाण्यासाठी माझी गीतगंगा वाहू दे ॥
जगातील महानता आकारावी का आई म्हणूनी
का साकारावी उदात्तता मायेचे लेणे लेवूनी
परिसीमा त्यागाची एकवटाया नि : स्पृह प्रेमाची मूर्ती होऊनी
का यावे उदयास भाग्य जन्मींचे हे आईरुपानी ,
छत्र तुझे , दैव माझे , आई पुण्याई माझी सदैव राहूदे ॥ १ ॥
आविष्कार त विधात्याच्या भारावल्या स्थितीचा
मन दिले आभाळाचे सडा शिंपूनी अमृताचा
बांधिले काळीज तुझे गुंफून धागा दुर्मिळाचा
भावनांचा दिला श्वास नि स्पर्श तुला परीसाचा
तेज आहे सूर्याचे नि चांदण्याची तुला स्निग्धता दे ॥ २ ॥
आकारले मातीला या तू रक्ताचे शिंपण करुनी
मायेच्या उधळणींमधूनी नि पंखांच्या पखरणींखालूनी
नित्य उगवली नवी क्षितीजे माझी तुझ्या कुशीतूनी
नित्य उभे पाठीशी केले सामर्थ्य तुझ्या अमृतस्पर्शानी
तुझ्याच अन् आशांचा दीप हृदयी माझ्या तेवू दे ॥ ३ ॥
जीवनाच्या मंगलक्षणी पूजण्याचा शब्द तू
समर्थतेच्या अंतकाळी जपण्याचा मंत्र तू
आकांक्षांच्या पूर्ततेची अविरत प्रेरणा नि ध्यास तू
आभाळातल्या मांगल्याच्या दिव्यत्त्वाचा आभास तू
तू श्वास , आश्वास भविष्याचा तूच विश्वास राहू दे ॥ ४ ॥
ऋणांतून तुझ्या व्हावे उतराई कसे या तोकड्या हातांनी
वसा तुझ्या मायेचा वाह्न पिढ्यांसाठी का व्रतस्थ होऊनी
ओठांतील कृतज्ञता कशी ही न कळे ओघळे डोळ्यांकाठी
सरले , नुरले शब्द काही तरीही फिरुनी येतो ओठी
आई , आई म्हणूनी हृदयाचा माझ्या झंकार असू दे ॥ ५ ॥
–यतीन सामंत
Leave a Reply