प्रिय हा अती श्रीगणपती देव लाडका
नाहीं जगीं कोणी गणेशासारखा ।।
तुंदिलतनू, सोंडेमधें मोदक धरी
तोलीतसे भरलें तबक हातावरी
एकवीस हा नैवेद्य प्रिय या गजमुखा ।।
मांडीवरी पद ठेवुनी ऐटित बसे
तोंडावरी स्मित नेहमी विलसत असे
हातीं धरी निज-दंत मोहक मोडका ।।
बांधीयलें अपुल्या कटीवर फणिधरा
त्या बंधनें सांभाळिलें पीतांबरा
जागा दिली पायींच वाहन मूषका ।।
दावीतसे भक्तांस लोभस रूपडें
पण रौद्र बनुनी विघ्न-दुष्टांशी लढे
नाशून त्यांना वाढवी अमुच्या सुखा ।।
मज मार्गदर्शक लाभला गणनायक
करतो विनायक पथ पुढिल निष्कंटक
मजसंगतीं गणपति गुरू, बंधू, सखा ।।
प्रथमेश हे, अतिश्रेष्ठ तूं देवांमधे
अमुच्या मनां तव दर्शनें उन्मेश दे
आम्हांवरी ठेवी कृपा, गणनायका ।।
– – –
– सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
Leave a Reply