प्रिय…
२ दिवसांनी तुझा वाढदिवस आहे. तुझ्यासाठी अगदी नकोसा वाटणारा दिवस. कारण; सगळ्यांना तू हवा असतो तुझ्या वाढदिवसाला. गेल्या वर्षी पर्यंत माझही जरास असंच होत. नाही का? पण तुझ्या गेल्या वर्षीच्या वाढदिवसामध्ये आणि या वर्षीच्या वाढदिवसामध्ये खूप फरक आहे. हो ना? अगदी गेल्या वर्षापर्यंत आपण एकमेकांचे अगदी जवळचे मैत्र होतो. यावर्षी आपण एकमेकांचे कुणीही नाही. आपण एकमेकांसाठी कुणीही नाही. अगदी अनभिज्ञ आहोत आता एकमेकांसाठी.
मागच्या वर्षापर्यंत तुझ्या वाढदिवशी तुला भेट पाठवण्यासाठी मेंदूचा भुगा आणि हृदयाची कालवाकालव असायची. आता सगळ कसं अगदी शांत झाल आहे. तुला खूप काही द्यायचं होत, जे तुला हव होत. त्यावेळी पैसे नव्हते म्हणून नाही देता आल. आता आज पैसे आहेत, स्वतःचे आहेत पण आता आयुष्यात तू नाहीस. तुझ्या नसण्याची ही पोकळी कशी भरून काढावी, हे अजूनही मला उमगलेलं नाही. मी तुला कायम म्हणायचे ना की, तू माझ्यासाठी त्या आभाळासारखा आहेस. माझ्या सोबत शरीराने जरी नसला तरी कायम सोबत आहेस. प्रिय, पण आभाळाला कवेत नाही ना रे घेता येत. आभाळ सोबत असलं तरी ते दूरच ना, निर्वात पोकळीच ना ती.
हसू येत मला माझचं. तू जेव्हा सांगायचा की, आयुष्यात तडजोडही करावीच लागते तेव्हा मी किती आत्मविश्वासाने सांगायचे तुला की, काहीही झाल तरी ‘तुझ्या’ बाबतीत मी तडजोड करणार नाही. आयुष्याने तेही शिकवलं. तुझ्याबाबत तडजोड करायला शिकवलं, तुझ्याविना जगायला शिकवलं.
असो. खूप बोलले का रे मी? तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा इथेच देते आता. Happy Birthday Dear!! कारण; काहीही आणि कितीही वाटल तरी तुला शुभेच्छा देण्याचा हक्क गमावला आहे मी. हो ना?
तुझीच,
मीरा…
Leave a Reply