चिकूच्या झाडास वर्षभर फळे येतात. चिकूमध्ये पिष्टमय पदार्थाचे तसेच पोटाच्या विकारांसाठी उपयुक्त असलेल्या तंतुमय पदार्थाचे प्रमाण चांगले असते. फळ झाडावरून काढल्यानंतर पिकत असल्याने त्यांच्यात जैवरासायनिक क्रिया अतिशय जलद घडून येतात व फळ लगेच पक्व होऊन अल्पायुषी बनते. चिकूच्या पिकलेल्या फळापासून उत्तम प्रकारची पेये व पदार्थ तयार करता येतात.
चिकूच्या फोडीचा लगदा करून, पेक्टीनेज एन्झाइम टाकून, दोन तास ठेवून लगदा मलमलच्या कापडातून गाळून तयार झालेला रस चिकूची पेये बनवण्यासाठी वापरावा.
चिकूच्या या रसात साखर, सायट्रिक आम्ल व पाणी मिसळून सरबत तयार करता येते. १५ मिनिटे गरम करून, सोडियम बेन्झोएट मिसळून, निर्जंतुक केलेल्या बाटल्यात भरून, हवाबंद करून साठवता येतो. याच प्रकारे घटकांचे प्रमाण बदलून चिकूचे स्क्वॅश व सिरप तयार करता येते. चिकूच्या गरात साखर, सायट्रिक आम्ल मिसळून सतत ढवळत राहात मंद शिजवून घेतल्यास जॅम तयार होतो. जॅम गरम असतानाच निर्जंतुक केलेल्या बाटल्यांत भरून साठवता येतो.
चिकूचा रस काढून झाल्यावर राहिलेल्या चोथ्यामध्ये मक्याचे पीठ व दूध पावडर मिसळून ते शिजवावे. यात साखर, तूप, सायट्रिक आम्ल व मीठ टाकून पुन्हा शिजवावे. गरम असतानाच पसरट ताटात ओतून थंड झाल्यावर तुकडे पाडावेत. स्वादिष्ट बर्फी तयार होते. प्तॅस्टिकच्या कागदात गुंडाळून बरणीत साठवावी.
थोड्या पिकलेल्या चिकूची साल काढून फोडी पाकात काही काही ठेवून व मग बाहेर काढून वाळवल्यास कॅन्डी तयार होते. ड्रायफ्रूट म्हणून त्याचा वापर करता येतो.
परिपक्व चिकूची साल काढून फोडीना गंधकाची धुरी देऊन, त्याला वाळवून, दळून त्याची पावडर तयार करता येते. पावडरीपासून मिल्कशेक तसेच आईस्क्रीम तयार करता येते.
चिकूचा गर, मीठ, साखर, लाल मिरची, कांदा, लसूण, आले, वेलची पावडर, दालचिनी पावडर, व्हिनेगर हे घटक वापरून चिकूची चटणी तयार करता येते.
— डॉ. विष्णू गरंडे ( कोल्हापूर)
मराठी विज्ञान परिषद, मुंबई
Leave a Reply