महाराष्ट्रात पपईची लागवड प्रामुख्याने पुणे, अहमदनगर, धुळे, नाशिक या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर केली जाते. जास्तीत जास्त क्षेत्र तैवान, हवाई, वॉशिंग्टन, को- १ व को-७ या जातींच्या लागवडीखाली आहे. पिकलेल्या पपईच्या फळामध्ये ‘ अ’ जीवनसत्त्व असते. म्हणून त्याचा उपयोग डोळ्यांच्या विकारांमध्ये केला जातो. दंतरोग, अस्थिरोग व उच्च रक्तदाब इत्यादी रोगावरही ते गुणकारी आहे.
कच्च्या परंतु पूर्ण वाढ झालेल्या फळापासून पेपेन तयार केले जाते. पेपेन काढल्यानंतर पिकलेल्या पपईला बाजारात चांगला दर मिळत नाही. अशी फळे जॅम तयार करण्यासाठीसुद्धा वापरली जातात. पूर्ण वाढ झालेल्या कच्च्या पपईला उभ्या चिरा देऊन काढलेल्या ओल्या किंवा वाळवलेल्या चिकास ‘पेपेन’ म्हणतात.
पपईची फळे ७०-७५ दिवसांची झाल्यापासून ते १००-११० दिवसांपर्यंत चीक काढला जातो. केएमएसचा ( पोटॅशियम मेटाबायसल्फेट) वापर करून चिकाची प्रत टिकवता येते. चीक व्हॅक्यूम ड्रायरमध्ये वाळवून त्याची पावडरही करता येते.
पेपेनला व्यापारीदृष्ट्या फार महत्त्व आहे. प्रामुख्याने मटण मऊ करण्यासाठी ते वापरतात. त्यामुळे मटण लवकर शिजते, पचनास हलके बनते व चवीस रुचकर लागते.
कातडी कमावण्याच्या कामात, बेकरी उद्योगात, कापड गिरण्यांमध्ये कपड्यांना चकाकी आणण्यासाठी, बीयर स्वच्छ करण्यासाठी, लॉंड्रीमध्ये कपड्यांवरील डाग घालवण्यासाठी, पाचक औषधे तयार करण्यासाठी, कागद कारखान्यांमध्ये, फोटोग्राफीमध्ये तसेच टूथपेस्ट, टूथ पावडर व चुइंगगम तयार करण्यासाठी पेपेनचा उपयोग होतो.
पेपेन काढण्यासाठी पपईच्या को- २, को-५, को-७ या जातींची लागवड केली जाते. या जाती तामिळनाडू कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या आहेत. पपईची वॉशिंग्टन ही जात खाण्यासाठी तसेच पेपेन काढण्यासाठी योग्य समजली जाते. पूर्ण वाढ झालेल्या मोठ्या आकाराची कच्ची पपई, चुन्याचे द्रावण आणि साखरेचा पाक यांपासून टुटीफ्रूटी बनवता येते. प्लास्टिकच्या हवाबंद डब्यांमध्ये ती साठवता येते. पपईचा लगदा करून त्यापासून बनवलेल्या रसापासून जेली बनवता येते. निर्जंतुक केलेल्या काचेच्या बाटल्यांमध्ये ती साठवता येते.
— डॉ. विष्णू गरंडे ( कोल्हापूर)
मराठी विज्ञान परिषद, मुंबई
Leave a Reply