प्रा. हरी जीवन अर्णीकर (१९१२- २०००) यांचा जन्म आंध्र प्रदेशात झाला. बनारस हिंदू विद्यापीठातून एम.एस्सी. करून त्यांनी तेथेच ‘कोरोना इफेक्ट ॲन गॅसेस अंडर डिस्चार्ज’ या विषयावर पीएच.डी. केली. १९५५ मध्ये पॅरिस येथील प्रा. फ्रेडरिक जुलिएट क्यूरी आणि प्रा. इरेन क्यूरी या नोबेल पुरस्कार विजेत्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ‘सेपरेशन ऑफ आयसोटोप बाय इलेक्ट्रोमायग्रेशन इन फ्युज्ड सॉल्टस’ हा प्रबंध लिहिला. त्यासाठी त्यांना डॉक्टरेट ही पदवी मिळाली.
१९५८ ते १९६२ या काळात ते बनारस हिंदू विद्यापीठात अध्यापन करीत होते. या काळात त्यांनी. तेथे अणुरसायनशास्त्र विभागाची उभारणी केली आणि वैद्यकशास्त्रात किरणोत्सर्गी समस्थानिकांचा यशस्वीपणे उपयोग करून दाखवला. १९६२ पासून पुढची १५ वर्षे ते पुणे विद्यापीठात रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख होते. येथेही त्यांनी मुंबईच्या भाभा अणुशक्ती केंद्राच्या साहाय्याने FONSE अणुरसायनशास्त्राची प्रयोगशाळा, संशोधन केंद्र व अध्यापन सुरू केले. निवृत्तीनंतरही ते विद्यापीठात संशोधन करीत असत. त्यांनी हॉट ॲटम केमिस्ट्री, अॅक्वाल्युमिनेसंस, फ्युज्ड इलेक्ट्रोड्स, जोशी इफेक्ट या विषयांमध्ये संशोधन केले. युनिव्हर्सिटी केमिकल सोसायटीच्या वतीने त्यांनी काही उपक्रम राबवून विज्ञान प्रसारासाठी फिरत्या प्रयोगशाळेचाही उपयोग केला.
१९६२ साली फुलब्राइट शिष्यवृत्ती मिळवून त्यांनी विस्कॉन्सिन मेडिसिन विद्यापीठात मॅनहॅटन प्रकल्पातील शास्त्रज्ञ प्रा. जॉन विलार्ड यांच्या प्रयोगशाळेत संशोधन केले. रसायनशास्त्राच्या अध्यापनात मौलिक सुधारणा करण्यासाठी युनेस्कोच्या त्यांनी पायलट प्रॉजेक्ट ऑन टिचिंग केमिस्ट्री या प्रकल्पात आंतरराष्ट्रीय सल्लागार म्हणून काम केले. हा प्रकल्प आशियातील संस्थांसाठी होता. लंडनच्या रॉयल सोसायटी ऑफ ने केमिस्ट्रीने त्यांना फेलोशिप दिली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ३३ विद्यार्थ्यांनी पीएच.डी. केली. ‘इसेन्शियल ऑफ न्यूक्लियर केमिस्ट्री अॅण्ड आयसोटोप्स अॅन द ॲटॉमिक एज’ या त्यांच्या पुस्तकाचे युरोपातील सहा भाषांत भाषांतर झाले. भारतातील विद्यापीठ अनुदान मंडळाच्या अनेक प्रकल्पात आणि उपक्रमात त्यांनी सातत्याने भाग घेतला.
Leave a Reply