नरहर अंबादास कुरुंदकर यांचा जन्म १५ जुलै १९३२ रोजी परभणी जिल्ह्यात नांदापूर येथे झाला . ब्रिटिश कालखंडात हा विभाग हैदराबाद राज्यात येत होता. करुंदकरांच्या शालेय शिक्षणानंतर त्यांनी हैद्राबाद मधील सिटी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. कॉलेजच्या पहिल्या दोन वर्षात त्यांनी अनेकवेळा कॉलेजला दांडी मारून आपला वेळ हैदराबादमधील स्टेट लायब्ररीमध्ये घालवू लागले . त्यांनी तेथे इतिहास , संस्कृती , धर्म , तत्वज्ञान , साहित्य, राजकारण , आणि अर्थशास्त्र ह्या विषयाचे प्रचंड वाचन केले.
कुरुंदकर स्वतःच्या वाचनबद्दल म्हणतात , ” लहानपणापासून माझा वाचनाचा नाद वाढविणारे माझे वडील अंबादासराव कुरुंदकर, मामा डॉ.ना.गो. नांदापूरकर, गुरुवर्य कहाळेकर, नांदेडला एस.आर.गुरुजी इ.ची माया माझ्या जमेची बाजू म्हटली पाहिजे. आणि ‘तुला हवे ते पुस्तक नेऊन वाच व नंतर कॉलेजात दाखल कर’, असे सांगणारे पू.स्वामीजी, कै.जीवनराव बोधनकर, माझे प्राचार्य के.रं.शिरवाडकर हीही जमेचीच बाजू म्हटली पाहिजे. या सर्व महाभागांच्यामुळे मी अधाशी वाचक झालो हे तर खरेच, पण या मंडळींच्या माझ्यावरील प्रेमाचा परिणाम असा झाला की आपला ग्रंथसंग्रह असावा, असे मला कधी तीव्रपणे वाटलेच नाही. ” ह्या अफाट वाचनाचा परिणाम असा झाला की ते दुसऱ्या वर्षात नापास झाले , अनेक वेळा परिक्षेला बसले परंतु यश आले नाही . परीक्षेबद्दल त्याचे मत असे होते , ” परीक्षा आणि परीक्षेचे पुस्तक वाचण्याचा मला प्रचंड कंटाळा व नावड आहे. परीक्षेच्या निमित्ताने वाचन होते, अभ्यास होतो असे माझे अनेक मित्र म्हणतात. त्या सर्वाचे कल्याण असो. मी परीक्षा टाळत आलो आहे. नाइलाजाने मला एम.ए. व्हावे लागले. माझा एम.ए.चा निकाल लागला त्या वेळी मोठय़ा उल्हासाने मी डोक्याचा तुळतुळीत गोटा केला आणि विहिरीवर बसून थंड पाण्याने स्नान केले. मित्रांनी विचारले, ‘‘ अरे हा काय नवा प्रकार ? ’’ मी म्हटले, ‘‘ सुटलो. आजपासून परीक्षा माझ्या जीवनात मेली ’’ परीक्षेचे पुस्तक मी वाचू लागलो की जांभया येतात. झोप येऊ लागते. परीक्षेचे पुस्तक वाचणे मला फार कष्टाचे जाते. मग मी त्यावरही उपाय शोधले होते. बी.ए.च्या परीक्षेच्या वेळी मी देवीप्रसाद चटोपाध्यायांचे ‘ लोकायत ’ हे प्रसिद्ध पुस्तक जवळ ठेवले होते. सुमारे तासभर क्रमिक पुस्तक वाचले की झोप दाटून येई .” पुढे ते कॉलेजमधून बाहेर पडले आणि काही वर्षांनी त्यांनी परत कॉलेज सुरु करून डिग्री मिळवली. हळूहळू त्याच्या मनाला समाजवादी विचार येऊ लागले आणि त्यामुळे ते काही काळ स्थानिक रिक्षा चालकांचे नेतेही बनले. परंतु उर्वरित आयुष्य त्यांनी सेवा दलासाठी दिले. १९५५ मध्ये त्यांनी नांदेडच्या प्रतिभा निकेतन च्या हायस्कुल मध्ये शिक्षक म्ह्णून शिकवयाला सुरवात केली. शिक्षकाची नोकरी करता करता त्यांनी मराठवाडा विद्यापीठाची मास्टर्सची डिग्री मिळवली आणि ते नांदेडच्याच पीपल्स कॉलेजमध्ये मराठीचे प्राध्यापक म्ह्णून शिकवू लागले आणि पुढे ते त्याच कॉलेजचे प्राचार्य झाले. प्रा. कुरुंदकरांच्या लिखाणाची औपचारिक सुरवात १९५३ साली प्रतिष्ठान या मराठवाडा साहित्य परिषदेच्या मुखपत्रात समीक्षणात्मक लेख प्रसिद्ध होऊन झाली. त्यावेळी ते केवळ २१ वर्षाचे होते. त्यानंतर मराठवाडा दिवाळी अंकात शरदचंद्र चटर्जी यांच्या शेषप्रश्न या पुस्तकावर त्यांनी एक लेख लिहिला. पुढे नवभारत, सत्यकथा अशा प्रस्थापित मासिकांमध्ये विविध विषयावर लेख प्रकशित होऊ लागले.
कुरुंदकरांचे लेखन नेहमी तर्कशास्त्राला धरून होते. त्यांच्यावर बर्ट्रॉड रसेलच्या प्रभाव होता. रसेल त्याचा आयकॉन होता असे म्हटले तरी चालेल. मला आठवतंय मी कॉलेजमध्ये असताना रसेलचे ‘मॅरेज आणि मॉरल्स ‘वाचले होते त्यानंतर त्यांच्या मुलीने कॅथरीन टेंट हिने ‘माय फादर ‘असे पुस्तक लिहिले तेव्हा खरा रसेल मला कळला. अर्थात रसेल प्रत्यक्षात आणणे , पचणे तसे कठीणच होते. तेच कुरुंदकरांच्या लिखणायच्या बाबतीत झाले. त्यांचे विचार , त्याची वाक्ये नुसती आता वर्तमानपत्रात वाचली तर अनेकांच्या ‘कचकड्याच्या भावना ‘दुखावतील आणि गदारोळ होईल इतके आम्ही ‘हलके ‘झालो आहोत. तसे पाहिले तर कुरुंदकरांची मते सर्वाना पटत होती , परंतु पचत मात्र नव्हती म्ह्णून आमच्या विचारवंतानी , राजकरण्यानी , बुद्धीवंतांनी त्यांना खड्यासारखे बाजूला काढून ठेवले होते. अर्थात मी हे विधान जरा स्पष्टच करत आहे. कारण मी लहानपणी त्यांची व्याख्याने ऐकली आहेत. आज ती पटतात हे विशेष म्हणावे लागेल. त्यावेळी आपण समाजात जे पेरले तेच आज उगवत आहे. नरहर कुरुंदकर ह्यांनी त्यानंतर जयप्रकाश नारायण आणि विनोबा भावे ह्यांच्याबरोबर मराठवाड्याच्या शेतीविषयक सुधारण्याच्या मोहिमेत आणि विनोबा भावे यांच्या ‘आचार्य कुल ‘च्या योजनेत समाविष्ट झाले. त्याचप्रमाणे १९७५ च्या आणीबाणी विरोधात ‘फिअर नॉट मुव्हमेंट ‘मध्ये सामील झाले.
कुरुंदकरांचे प्रत्येक समस्येचे मूळ तपासून पहाण्याची आणि परंपरेने दिलेल्या उत्तरापेक्षा वेगळ्या , नव्या आणि सामान्य माणसाला सहजपणे पटण्याऱ्या निष्कर्षावर येण्याची त्यांची ताकद जबरदस्त होती. आपण ज्यांना देवत्व दिले , मोठेपण ती सर्व आपल्यासारखी माणसेच होती. ती येताना आपल्यापेक्षा जास्त काही घेऊन आलेली नव्हती माणूस अध्ययनाने , प्रयत्नाने त्यांच्याएवढी समज वाढवून घेऊ शकतो.
कधी कधी कुरुंदकर अशी विधाने करत की आत्तापर्यंतच्या अनके कल्पना, वास्तवाला तडा जात असे. एकदा ते म्हणाले होते , ‘कॉग्रेस ही हिंदूंची देशातील मोठी संघटना आहे.’हे विधान उघडपणे काँग्रेसकट कोणालाही उघडपणे मान्य करता येणे कठीण असले तरी खरे आहे .’जर आपण तार्कीकपणे नीट विचार केला तर त्यांच्या अनेक विधानात तथ्य सापडेल .
नरहर कुरुंदकरांनी महाराष्ट्रभर शेकडो भाषणे दिली , ते स्वतःला समाजवादी समजत . त्यांचे म्हणणे होते इतिहासपुरुषांची जातवार वाटणी करण्याचा प्रकार थाबवणायची गरज आहे. ‘हे विधान त्यांनी अनेक वर्षांपूर्वी केले होते , त्याचा आज आपल्याला प्रत्यय येत आहे. कुरुंदकरांच्या लिखाणामुळे मराठी साहित्याला एक वेगळी दिशा मिळाली मुख्यत्वेकरुन ‘टीका ‘कशी असावी आणि कशी करावी . कारण त्यांनी केलेली टीका ही नुसती टीका नव्हती तर त्या टीकेचे समर्थनही वॆचारिक पद्धतीने करत , मीमांसा करत. त्यांनी स्वतः कधी जातीभेद मानला नाही . हमीद दलवाई यांच्या मुस्लिम सत्यशोधक चळवळीला त्यांचा पाठिंबा होता. कुरुंदकर विचाराने खऱ्या अर्थाने समाजवादी होते. कुरुंदकरांचा अभ्यास हा सर्वच क्षेत्रात होता . ते शिक्षक होते , प्राचार्य होते , तत्वज्ञ होते , संशोधक होते , टीकाकार होते , वक्ते होते , लेखक आणि मार्गदर्शक होते. युदनाथ थत्ते म्हणत ‘नरहर कुरुंदकरांचा ‘राष्ट्र सेवा दल’मोठे करण्यात सिंहाचा वाटा होता.
नरहर कुरुंदकरांनी विपुल लेखन केले. त्यांनी रिचर्ड्सची कलामीमांसा , रूपवेध, मागोवा , जागर , धार आणि काठ , पायवाट, प्रकाश , छायाप्रकाश , भजन, आकलन , मनुस्मृती, थेंब अत्तराचे , यात्रा , ओळख , छत्रपती महाराज जेवण रहस्य , वाटचाल , रंगशाळा, निवडक पत्रे, त्रिवेणी , अभयारण्य , वारसा , अभिवादन अशी अनेक पुस्तके आहेत जी त्यांच्या मृत्यूनंतर संकलित केलेली आहेत.
नरहर कुरुंदकर औरंगाबाद येथे भाषण करत असतानाच दिनांक १० फेब्रुवारी १९८२ रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले. आजही त्याची मते , त्यांचे विचार किती महत्वाचे आहेत ते पटते.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply