प्रा. जतकर हे पुणे विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाचे पहिले प्रमुख होते. ते नोबेल पुरस्कारविजेते डॉ. चंद्रशेखर वेंकट रमण यांचे सहकारी. त्यांचे संपूर्ण नाव शंकर खंडो कुलकर्णी जतकर.
ते मुळातले सांगली जिल्ह्यातल्या जत गावचे. त्यांनी बंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून एम. एस्सी. केले. प्रथम ते हैदराबादच्या निजाम महाविद्यालयात अध्यापनासाठी गेले, पण संशोधनाची तीव्र इच्छा असल्याने तेबंगलोरच्या परत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये गेले व रामन परिणामाशी संबंधित संशोधन त्यांनी सुरू केले. त्यात खासकरून इन्स्ट्रूमेंटल अॅनॅलिसिस आणि विविध पायलट प्लँट प्रॉजेक्टविषयक संशोधन होते. त्यावर आधारित त्यांनी लिहिलेले शोधनिबंध आंतरराष्ट्रीय मासिकातून प्रसिद्ध झाले. त्यांच्या या शोधनिबंधाचे परीक्षण करून त्यांना डी.एस्सी. ही पदवी मिळाली.
१९४९ साली पुणे विद्यापीठाची स्थापना झाल्यावर त्या विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅ. जयकर यांनी त्यांना खास बोलावून घेऊन रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख केले. त्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन १९५० ते ६२ या काळात विद्यापीठाचा हा विभाग नावारूपाला आणला. त्यांचे १५० शोधनिबंध आघाडीच्या विज्ञान नियतकालिकात प्रसिद्ध झाले. त्यांच्या हाताखाली २५ विद्यार्थ्यांनी संशोधन करून पीएच.डी. प्राप्त केली.
शिक्षण संस्था आणि औद्योगिक उत्पादन संस्था यांची सांगड घालायचा प्रयत्न केला. शर्करा उत्पादन तंत्रज्ञान, स्फोटकांचे रसायनशास्त्र, काचेचे उत्पादन अशा वेगवेगळ्या विषयांच्या अध्ययनाची सोय त्यांनी पुणे विद्यापीठात केली. प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी केवळ शिक्षणासाठीच एकत्र न येता सामाजिकदृष्ट्या उपयुक्त विषयांचाही विचार करण्यासाठी एकत्र यावे यासाठी विद्यापीठात त्यांनी ‘युनिव्हर्सिटी केमिकल सोसायटी’ ची स्थापना केली. त्यातून चर्चासत्रे, स्पर्धा, वक्तृत्व प्रात्यक्षिके, खेड्यात विज्ञान प्रसार करण्यासाठी फिरती प्रयोगशाळा असे उपक्रम सुरू झाले. प्रा. जतकर यांनी विद्यार्थ्यांना स्पेक्ट्रोस्कोपी, शास्त्रीय उपकरणशास्त्र, केमिस्ट्री ऑफ इलेक्ट्रोलाइटस, डायपोल मोमेंट अॅण्ड मोलेक्यूलर स्ट्रक्चर, रेण्विय रचनाशास्त्र हे विषय शिकवले. या संबंधातील जतकर इक्वेशन प्रसिद्ध आहे.
Leave a Reply