काही माणसं उपजतच कलेचं लेणं घेऊन आलेली असतात. ती इतकी मोठी असतात पण तरीही प्रसिद्धिपराङमुख असतात.
`राष्टपतीपदक’ विजेते.. चित्रकार प्राध्यापक गजानन शेपाळ हे अशांपैकीच एक. सर्व शासकीय कार्यालयांमध्ये दिसणारे महात्मा ज्योतिबा फुले यांचे चित्र म्हणजे प्रा. शेपाळ यांचीच देणगी…. याच चित्रासाठी त्यांना राष्टपतीपदकाने गौरवण्यात आले.
प्रा. गजानन शेपाळ हे गेली २३ वर्षे विश्वविख्यात सर ज जी उपयोजित कला महाविद्यालयात (J J School of Applied Arts) कलाविषयक अध्यापन करत आहेत. हस्ताक्षर, अंकशास्त्र , रंगशास्त्र आणि रंग चिकित्सा या विषयांवर सखोल जाऊन, डेटाबेस तयार करून, अनेक निरीक्षणांद्वारे प्रायोगिक परिश्रमातून स्वतःची ठोस मध्ये बनवून उपकारक अशा परिणामांजवळ पोहोचण्याचा त्यांचा प्रवास थक्क करायला लावणारा आहे.
सुख पचवणे जितकं सोपं असतं तितकंच दुःख पचवणं अवघड.. असं साधं सरळ विधान…! खरंतर दुःख पचवणं अवघड जरी असलं, तरी ते सर्वांनाच पचवावं लागतं. त्यासाठी या जगात कुठलाच अभ्यासक्रम नाही. आजपर्यंत आवश्यकताही भासली नाही कुणाला. मात्र सुख पचवणे सर्वांनाच शक्य होतं हे सांगणं कठीण असतं, कारण ज्यांना `सुख’ मिळायला लागतं ते समाजापासून मित्रपरिवारापासून फार काय अगदी रक्ताच्या नात्यांपासून देखील दुर दुर जाऊ लागतात या `सुखा’च्या प्राप्तीनंतर..
प्राध्यापक गजानन सिताराम शेपाळ यांनी या “सुखा” च्या गुरुत्वाकर्षणात आलेल्यांना आणि येऊ पाहणाऱ्यांना कसं तटस्थ राहायला पाहिजे… यासाठी `रंग चिकित्सा’, `रंगशास्त्र आधारित पेंटिंग्ज’, `साईन्स ऍंड सिम्बॉल्स’ – अर्थात भारतीय प्रतिकशास्त्र याआधारे सुखी आनंदी होणं अन ते `पचवता’ येणं यावर काम केलं आहे.
अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी रंग उपचार करून `प्राकृतिक वैगुण्ये’ नष्ट करण्यास मार्गदर्शन केले आहे. `वास्तुशास्त्र पेंटिंग’ हा त्यांनी शोधलेला विषय…!! अनेक विद्याविभूषित, अनेक पुरस्कारांनी सन्मानित, तरीही प्रसिद्धीच्या झोतात नसलेले गजानन सिताराम शेपाळ म्हणूनच कलाविश्वातील `वास्तुशास्त्र पेंटिंग’ बनवणारे जागतिक स्तरावरील सध्यातरी एकमेव चित्रकार आहेत असं म्हणायला हरकत नाही.
त्यांनी त्यांची कलासाधना लोकोपयोगी, समाजोपयोगी कशी होईल यावर पाव शतकांहून अधिक काळ संशोधन केले आहे त्यांच्या रंगज्ञानाविषयीचं लिखाण वाचता वाचता त्यांच्या क्षमतांचा अंदाज वाचकांना येईलच…!!
सध्यातरी त्यांच्याविषयी एवढे…!!
प्राध्यापक गजानन शेपाळ यांच्या लेखणीतून उतरलेल्या दोन लेखमालिका `मराठीसृष्टी’च्या वाचकांसाठी सुरु होत आहेत. पहिली म्हणजे `रंगांच्या रेसिपीज’ आणि दुसरी `रंगचिकित्सा’. मराठीसृष्टीचे वाचक या दोन्ही लेखमालांचे स्वागत करतील याची खात्री आहे.
Leave a Reply