पवनचा बाप महसूल खात्यात क्लास वन अधिकारी होता. नोकरीला असताना केलेली कमाई आणि रिटायर्ड झाल्यावर एकदम मिळालेले प्रॉव्हिडेंट फंडाचे पैसे यातून फॉर्च्युनर गाडी घेतली गावातले जुने घर पाडून तिथं आलिशान बंगला बांधला. रिटायर्ड होण्या पूर्वी स्वतःच्या शेत जमिनी असलेल्या भागात गोडाऊन आणि रस्ते झाल्याने पवन च्या बापाने सुद्धा स्वतःच शेत जमीन डेव्हलोप केली. महसूल खात्यात असल्याने एन ए आणि इतर सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडून केलेले बांधकाम असल्याने महिन्याला जवळपास दोन लाख रुपये भाडे येत होते. पवन ला दोन मोठ्या बहिणी होत्या आणि दोघींची पण लग्न होऊन सासरी गेल्या होत्या. दोघींची घरची परिस्थिती चांगली होती तरीही पवनचा बाप त्यांना दर महिन्याला पंचवीस पंचवीस हजार रुपये पाठवत होता.
पवनचे लग्नाचे वय झाले होते, बापाने त्याच्या ओळखीच्या जिल्हा बँक संचालकाला वीस लाख रुपये देऊन बँकेत चिटकवले होते. बी कॉम, बँकेत कामाला, गोडाऊनचे भाडे, आलिशान घर आणि गाडी बघून त्याला कुठल्याच पोरीचा बाप नकार देऊ शकला नसता.
बऱ्यापैकी पण साधारण घरातील एक देखणी मुलगी पसंत पडली आणि पवनचे लग्न जमले. पोरीचे नाव सोनू होते, तिने आर्टस् मध्ये ग्रॅज्युएशन केले होते. तिच्या घरची परिस्थिती साधारण असली तरीही बाहेरच्या जगाशी आणि व्यवहाराशी तिचा फारसा संबंध नव्हता. घरातली कामं आणि आपण भले असा तिचा स्वभाव होता. लग्नाची तारीख वगैरे काढली, मुलीला फक्त आम्ही ठरवू त्या लग्न ठिकाणी घेऊन या एवढी एकच मागणी सोनूच्या बापाकडे केली. साखरपुडा सुद्धा ऐपती प्रमाणे करावा आणि तुम्ही सांगाल त्याच्यापेक्षा एकही पाहुणा जास्त येणार नाही असे आश्वासन पवन च्या बापाने सोनूच्या बापाला दिले.
सोनूचा साखरपुडा तिच्या बापाने थाटात केला. सासरकडून साखरपुड्यात तिला सोन्याच्या बांगड्या आणि पाच तोळ्याचा नेकलेस दिला. त्याचसोबत पवन ने अंगठी घातल्यावर तिच्या हातात एक गिफ्ट पॅक दिले. पवन ने तिला स्टेजवरच ते उघडायला लावले. पन्नास हजाराचा आय फोन बघून सोनूला त्यात एवढं नवल वाटले नाही. तिला स्मार्ट फोन नवीन नव्हते पण एवढे पन्नास हजार पर्यंतचे फोन वरून बोलणार, फोटो काढणार आणि चौकशी करणार एवढंच तिला कळत होत.
फेसबुक, इन्स्टा ग्राम बद्दल तिला माहिती होत पण अजून पर्यंत तिने स्वतःचे अकाउंट उघडले नव्हते. आय फोन वर बोलता बोलता पवन ने तिला फेसबुक आणि इन्स्टा बद्दल काहीतरी विचारले तिने त्याला मला त्यातल काही कळतं नाही आणि गरज नाही असं सांगितलं. लग्नाला अजून एक महिना होता, पवन ने स्वतःच सोनू चे फेसबुक आणि इन्स्टावर अकाउंट ओपन करून दिले आणि फोटो वगैरे कसे अपडेट करायचे ते दाखवले.
सोनूचे प्रोफाइल पिक्चर बघून तिला धडा धड फ्रेंड रिक्वेस्ट येत गेल्या. काही ओळखीचे आणि कॉलेजला असणाऱ्या मित्र मैत्रिणी तिच्या फ्रेंड लिस्ट मध्ये ऍड होऊ लागल्या. सुरवातीला काही कळत नाही आणि गरज नाही असं बोलणारी सोनू जसजशी फेसबुक आणि इन्स्टा वापरायला लागली तसं तसं ती त्यामध्ये जास्त रमायला लागली. मग स्वतःचे फोटो किंवा काही पोस्ट केल्यावर त्यांना मिळणारे लाईक्स आणि कमेंट्स बघून हुरळून जायला लागली.
एका दिवशी सकाळी सकाळी पवन च्या सगळ्यात मोठ्या बहिणीचा पवन ला फोन आला आणि तिने पवनला तिच्या होणाऱ्या बायकोचे प्रोफाइल आणि कालचे स्टेटस बघायला सांगितले. पवन ने सोनूच्या स्टेटस ला एका मुलाने दिलेल्या कमेंट्स वाचल्या. त्याच्या कमेंट्स वर सोनू ने दिलेले थँक्स किंवा लाईक्स बघून पवनचे डोकं सटकले. त्याने लगेचच सोनूला फोन केला आणि कमेंट करणारा मुलगा कोण आहे, तुमची ओळख कशी झाली अशा प्रश्नांचा भडीमार केला. सुरवातीला सोनूला काही कळलं नाही पण जेव्हा पवन ने पुढला प्रश्न केला की तुम्ही दोघे एकमेकांना भेटला पण असाल ना तेव्हा मात्र सोनूचा संयम सुटला आणि तिने फोनच बंद करून टाकला.
पवन ने तिच्या आठ दिवसापूर्वीच्या सगळ्या पोस्ट बघितल्या आणि त्याच्या मनातल्या संशयाच्या भूताने, आता मला ह्या मुलीशी लग्नच करायचे नाही असा निर्णय घेऊन टाकला. पवनच्या दोन नंबर बहिणीला जेव्हा हे सगळं समजलं तेव्हा सगळ्यात पहिले तिने मोठ्या बहिणीला फोन करून बोलावले आणि पवन समोरच तिला धारेवर धरले. पवनची होणारी बायको तुझी होणारी भावजयच आहे ना. पहिले तिला चार समजुतीच्या गोष्टी सांगून, तिला नीट विचारून खात्री झाल्यावर मगच भावाच्या डोक्यात का नाही हा संशयाचा किडा घुसवला. त्यानंतर पवनला तिने फैलावर घेतले, सोनूला एकतर या फेसबुक आणि इन्स्टा बद्दल माहिती नव्हतं त्यात तूच तिला शिकवलं. तुम्हा पोरांचं बरं असतं कोणी मुलीने लाईक केली कमेंट केली तर त्या मुलीवरच संशय घेतला जातो, आणि कोणाच्या मुलीच्या पोस्ट वर एखाद्या मुलाने कमेंट केली तरीपण मुलीवरच संशय घेतला जातो.
मुलीने कोणाच्या कमेंटला रिप्लाय दिला किंवा एखाद्या पोस्ट ला लाईक केलं तर तिच लफडं असाच तुम्ही पोरं विचार करणार. मला जेव्हा हा सगळा प्रकार समजला तेव्हा मी सोनूच्या घरी जाऊन तिला भेटून आले. तू दिलेला आय फोन तिने तेव्हापासून बंद करून ठेवला आहे जेव्हा तू तिच्यावर आळ घेतलास तेव्हापासून. तिच्या भावाने तिलाच ऐकवलं की चूक तुझीच आहे, कशाला फेसबुक वर फोटो टाकतेस भोग आता कर्माची फळं. तिच्या बापाने लग्न मोडणार या भीतीने तर नुसती हाय खाल्ली आहे मला सांगत होता माझी पोरगी कधी घराबाहेर पडली नाही, चारचौघात फिरली नाही आणि तरी तिच्यावर अशी वेळ का यावी. मी सोनूला सगळं समजावले आहे ती तेवढी समजूतदार नक्कीच आहे. तिची चूक एवढीच आहे की तिला प्रोफाइल लॉक करणे किंवा कोण कुठल्या हेतूने कमेंट किंवा लाईक करतो याबद्दल कल्पना नव्हती. पण ताई आणि पवन तुम्हाला दोघांनाही असून तुम्ही तिच्यावर संशय न घेता समजावून सांगायला पाहिजे होते. ती सुंदर आहे तर ब्युटीफुल आणि नाईस अशा कमेंट्स आल्यावर कोणाचे आभार मानले तर त्यात एवढं गैर काय आहे.
खरं म्हणजे पवनच्या बापाला साखरपुड्यात पवन ने गिफ्ट दिलेला मोबाईल आणि त्यानंतर पवन ने लग्न मोडण्या पर्यंत घेतलेला निर्णय यामध्ये पवनचीच काहीतरी चूक असावी असं वाटत होत. आयुष्यभर महसूल खात्यात सातबारे नाचवणाऱ्या खऱ्या आणि खोट्या गरजू शेतकरी दलाल आणि जागा जमीन वाल्या माणसांचे चेहरे वाचणाऱ्याला होणाऱ्या सुनेचा चेहरा वाचता येणं काही मोठी गोष्ट नव्हती.
पण फेसबुक आणि इन्स्टा या टेक्नोलॉजी बद्दल त्याला माहिती नव्हती, त्याने त्याच्या दोन नंबर मुलीला यामध्ये माहिती विचारली आणि सगळं ऐकून घेतल्यावर तिलाच हा गुंता सोडवायला सांगितला.
वरवर साधा वाटणारा गुंता समजूतदारपणा नाही दाखवला तर एवढा गुंततो की मग सोडवताच येत नाही. फेसबुक आणि इन्स्टा वर फक्त कमेंट आणि लाईक्स मुळे जमलेलीच काय पण झालेली लग्न सुद्धा मोडली जातायत.
चूक नक्की कोणाची असते तिची का त्याची की एकमेकांना समजावून न घेणाऱ्या दोघांची.
© प्रथम रामदास म्हात्रे.
मरीन इंजिनियर,
B. E. (Mech), DIM.
कोन, भिवंडी, ठाणे.
Leave a Reply