“कसला विचार करतेयस संयोया? ” संयोगिता कागदपत्रे बघत विचार करण्यात गुंग झाली होती ते बघून विक्रमजीत थट्टेत म्हणाला.
“मागच्यावेळी बघितलं, ३५ वर्षाच्या व्यक्तीला २५ वर्षे मुदतीच्या ४० लाख सम अॅशुअर्डच्या एन्डावमेंट प्लॅनसाठी एका कंपनीचा वार्षिक प्रिमियम होतो १,५१,२४० रुपये आणि त्याच कंपनीच्या त्याच मुदतीच्या, ४० लाखाच्याच टर्म प्लॅनसाठी वार्षिक हप्ता होतो ९,८८४ रुपये. एन्डावमेंट प्लॅनमधून मॅचुअरिटी बेनेफिट म्हणून साधारण ७५ लाख ते अगदी १ कोटी मिळतील धरु. टर्म प्लॅनला मॅचुअरिटी बेनेफिट नसतो, पण एन्डावमेंट प्लॅनऐवजी टर्म प्लॅन घेतला आणि बाकीची १,४१,३५६ रुपये ही रक्कम इक्विटी म्युचुअल फंडात गुंतवली आणि त्यावर फक्त १२ टक्केने रिटर्न मिळाले तरी एन्डावमेंटपेक्षा १ कोटी जास्त मिळतात. प्रत्यक्षात मागील सोळा वर्षात काही म्युचुअल फंडांनी सरासरी २० टक्के वार्षिक या हिशेबाने रिटर्न दिलेले आहे. त्यानुसार तर चक्क ५ कोटी जास्त मिळू शकतात.”
“बापरे, खूपच जास्त तफावत आहे. पण म्युचुअल फंडाचा वैधानिक इशारा असतो, मागील कामगिरीप्रमाणेच पुढेही कामगिरी राहील याची हमी नाही आणि या गुंतवणूकीत जोखीम असते. हे समजून गुंतवणूक करत असाल तरच चांगलं, ” विक्रमजीतने सावध पवित्रा घेतला.
“जोखीम असते खरं, म्हणून १,४१,३५६ पैकी काही पीपीएफ या सुरक्षित साधनामध्ये आणि काही इक्विटी म्युचुअल फंडात गुंतवावे. प्रमाण किती असावं ते प्रत्येकाने आपल्या जोखीम घेण्याच्या प्रवृत्तीनुसार ठरवावं, तरीही जास्तच लाभ मिळेल. ”
“तू बराच अभ्यास केलेला दिसतोय. आधी इक्विटी म्युचुअल फंड म्हणजे काय याची उजळणी करु आणि सरासरी २० टक्के वार्षिक रिटर्न म्हणजे कम्पाऊंडेड ॲन्युअलाईज्ड ग्रोथ रिटर्न अर्थात सीएजीआर म्हणजे काय याचाही खुलासा करुन घेऊ. ”
“ठीक, इक्विटी म्युचुअल फंड हा गुंतवणूकदारांचे पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवतो, म्हणजे या रकमेतून अनेक कंपन्यांचे अनेक शेअर्स विकत घेतो. या शेअर्सचे भाव जसे कमी-जास्त होतात तसे त्या फंडाच्या गुंतवणूकीचे मूल्यही रोजच्या रोज कमी-जास्त होते. फंडाच्या गुंतवणूकीचे हे मूल्य भागिले त्या फंडाने इश्यू केलेले युनिट म्हणजे त्याचे प्रति युनिट नक्त मालमत्ता मूल्य म्हणजेच नेट ॲसेट व्हॅल्यू किंवा संक्षेपाने एनएव्ही. म्युचुअल फंडाची नवी योजना लॉंच होते तेव्हा युनिटचे मूल्य १० रुपये असते, नंतर फंडाच्या कामगिरीनुसार या युनिटचे मूल्य म्हणजेच एनएव्ही किती ते ठरते. समजा फंडाच्या लॉंचनंतर त्याच्या एकूण गुंतवणूकीचे मूल्य काही वर्षांनी बरोबर दुप्पट झाले तर त्याचा एनएव्ही १० रुपयावरुन २० रुपये होईल. आपण जेव्हा म्युचुअल फंडात गुंतवणूक करतो, तेव्हा त्या बदल्यात आपल्याला त्या फंडाचे युनिट ह्या एनएव्हीप्रमाणे मिळतात. समजा एका फंडाचा एनएव्ही २० रुपये आहे आणि आपण त्यात ४०,००० रुपये गुंतवले तर आपल्याला त्या फंडाचे ४००००/२० बरोबर २००० युनिट मिळतील. हे युनिट आपण त्या म्युचुअल फंडाकडून विकत घेतो आणि विमोचन म्हणजे रिडम्पशन करतानाही युनिट म्युचुअल फंडाला परत करतो आणि त्यावेळेस जो एनएव्ही असेल त्यानुसार पैसे मिळतात. म्युचुअल फंडातून दोन प्रकारे लाभ मिळतात. एक लाभांश किंवा डिव्हिडंड पर्याय, यात वेळोवेळी लाभांश मिळतो, मात्र लाभांश मिळेलच याची हमी नसते. दुसरा पर्याय म्हणजे वृध्दी किंवा ग्रोथ ऑप्शन. यात फंडाच्या एनएव्हीत वाढ होते आणि युनिट्सचे विमोचन करताना या वाढलेल्या भावामुळे फायदा मिळतो. अर्थात शेअरमार्केट कोसळले तर एनएव्ही कमीसुध्दा होतो. एक उदाहरण म्हणून एचडिएफसीसी इक्विटी फंड ही म्युचुअल फंड योजना बघू. जानेवारी १९९५मध्ये हा फंड लॉंच करण्यात आला. त्यावेळेस १ लाख रुपये याच्या ग्रोथ ऑप्शनमध्ये गुंतवले असते तर १० रुपये प्रति युनिट या किमतीने फंडाचे १०,००० युनिट्स मिळाले असते. २ जूलै २०१५ला या फंडाचा एनएव्ही होता ४७० रुपये म्हणजे त्याच १०,००० युनिटचे जर त्या दिवशी विमोचन केले असते तर १०,००० युनिट्स गुणिले ४७० बरोबर ४७ लाख रुपये मिळाले असते. १९९५ साली फक्त एकदाच केलेल्या १ लाख रुपयाच्या गुंतवणूकीतून ही ४७ लाख इतकी रक्कम मिळाली असती. ”
“बरोबर, १ लाखावर ४६ लाखांचा फायदा दिसतो, पण तो सुमारे २० वर्षात मिळाला आहे लक्षात घेतले तर वार्षिक साधारण २० टक्के सीएजीआर हा दर होतो. म्युचुअल फंडाच्या एनएव्हीमध्ये एखाद्या वर्षी १० टक्के वाढ होते, कधी २० टक्के तर कधी उणे २०, ३० टक्के म्हणजे घटसुध्दा. संपूर्ण कालावधीसाठी सरासरीने वाढीचा एकच दर काय होता ते सीएजीआरने कळते. मूळ भांडवल, विमोचन करताना मिळालेली रक्कम आणि गुंतवणूकीचा कालावधी यांचा हिशेब करुन हा सीएजीआर काढला जातो. ”
“काही महत्वाच्या बाबी. २० टक्के इतका सीएजीआर देणारा एचडिएफसीसी इक्विटी हा एकच फंड नाही तर इतरही काही फंडांनी चांगले लाभ दिलेले आहेत. बिर्ला सनलाईफ इक्विटी फंड, आयसीआयसीआय टॅक्स प्लॅन, फ्रॅन्कलीन इंडिया ब्ल्यूचीप आणि इतरही काही फंडांच्या वृध्दी पर्यायामध्ये दीर्घ कालावधीत उत्तम लाभ मिळालेला आहे. सर्व फंड एकसमान रिटर्न देत नाहीत. त्यांची तुलनात्मक कामगिरी, ते किती जोखीम घेतात इत्यादी काही निकषांनुसार कोणत्या म्युचुअल फंडात गुंतवणूक करायची ते ठरवता येते. तेव्हा गुंतवणूक सल्लागाराच्या मदतीने फंडाची निवड करावी. शेवटी पुन्हा म्युचुअल फंडातील गुंतवणूकतून पुढेही असा लाभ मिळेल याची हमी नाही आणि त्यात जोखीम असते.”
(सर्व आकडे ढोबळमानाने व केवळ माहितीसाठी)
मी मराठी Live मध्ये दि. ४ ऑगस्ट २०१५ रोजी प्रकाशित झालेला लेख.
उदय कुलकर्णी
Leave a Reply