भालबा केळकरांनी १९ ऑक्टोबर १९५१ रोजी केवळ सहा रुपयांच्या भांडवलावर प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन (पी.डी.ए)ची स्थापना केली. संस्थेसाठी व्यक्ती आणि व्यक्तींसाठी संस्था नाही, असे मानणारी नाट्यक्षेत्रातील एक संस्थारूपी व्यक्ती होती. भालबांनी नाटक कंपनी न म्हणता, तिला नेहमी नाट्यकुटुंब असे संबोधले. नाटकात काम करणाऱ्या मुलांचे पालक आढेवेढे घेत असत, तर मुलींना परवानगीच नसायची; अशा काळात भालबांनी पालकांमध्ये विश्वास निर्माण केला. पीडीए ही संस्था म्हणजे आधुनिक मराठी रंगभूमीची गंगोत्री. या रंगमंचावर भालबा द्रोणाचार्यासारखे वावरले. त्यांनी वसंतराव कानेटकरांसारखे स्वतःचे दालन निर्माण करणारे नाटककार, डॉक्टर श्रीराम लागूंसारखे नटसम्राट आणि जब्बार पटेलांसारखे कुशल दिग्दर्शक निर्माण केले. पीडीए हे आधुनिक मराठी रंगभूमीचे महाविद्यालय ठरले आणि त्यांनी अशा ताऱ्यांना जन्म दिला, की भालबांचे कर्तृत्व शिष्यांच्या कार्यकौशल्याने सतत चमकत राहिले.
१९७८ च्या डिसेंबरमध्ये सावंतवाडी येथे भरलेल्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी भालबांची निवड झाली, तेव्हा या नव्या नाट्यपिढीचा जनक सिंहासनाधिष्ठ झाला अशी भावना प्रकट झाली होती. पीडीए म्हणजे नैतिक मूल्यांचे कठोरपणे जतन करणारी संस्था होती. १९५७ मध्ये गो. नी. दांडेकर यांचे ‘जगन्नाथाचा रथ’ हे नवे नाटक नव्या धाटणीने रंगमंचावर आणले. पुढे वसंतराव कानेटकर यांच्या ‘वेड्याचे घर उन्हात’ या नाटकाने मराठी रंगभूमीला तीन श्रद्धास्थाने मिळाली. डॉक्टर श्रीराम लागू या नटवर्याचा सूर्य उगवला, वसंतराव कानेटकर यांचा प्रतिभाशाली नाटककार म्हणून जन्म झाला; तर भालबांना स्पर्धांच्या पातळीवर आणि नव्या कलावंताच्या वर्तुळात एक द्रष्टा दिग्दर्शक म्हणून मान्यता मिळाली.
वसंतराव कानेटकरांचे ‘प्रेमा तुझा रंग कसा’ हे नाटक आणि त्यामधील भालबांची प्रा. बल्लाळ ही भूमिका अजरामर ठरली. १९५१ ते १९७२ हा पीडीएचा गौरवशाली कालखंड ठरला आणि अनेक नवी नाटके सादर झाली. पुढे पी.डी.एचा रौप्यमहोत्सव साजरा झाला आणि भालबा नाट्यशिक्षणाच्या कार्यात गढून गेले.
भालबांनी श्रीराम खरे, सेवाताई चौहान, दिलीप वेंगुर्लेकर असे अनेक उत्तम कलाकार तयार केले. व्यक्तिमत्त्व विकासासाठी नाट्यशिक्षण असा नवा झेंडा घेऊन भालबा तरुणांबरोबर रमलेले दिसत. ‘प्रतिभासंपन्न दिग्दर्शक, नाटकासाठी विलक्षण मेहनत घेण्याची ताकद असलेला निर्माता,’ अशा शब्दात वसंतराव कानेटकरांनी सावंतवाडी येथे भरलेल्या नाट्यसंमेलनात भालबांचे कौशल्य प्रकट केले.
पीडीएने सुमारे ४० हून अधिक नाटके, १५ जुनी पण नव्या पद्धतीने नाटके सादर केली. १९५२ पासून त्यांनी ‘प्रेमा तुझा रंग कसा?’, ‘घराबाहेर’, ‘वेडय़ाचं घर उन्हात’, ‘देवांचे मनोराज्य’, ‘सती’, ‘तू वेडा कुंभार’ अशी गाजलेली नाटकं सादर केली.
— कौस्तुभ केळकर.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply