साधारण चार सहा महिन्यांनी आपली चार-दोन लफडी मिटवून मोह्न्या पिंपळवाडीत दाखल झाला.पाहतो तर काय?वामन्या नेहमी प्रमाणे गुढग्यात डोक खुपसून पारावर निवांत बसला(कि झोपला)होता.
“ओ ,वामूनशेट!”जवळ येत मोहन्याने आवाज दिला.
“बाबुराव, तुमी कर्जा देल्या पसन एक बी मढ आल नाय! कस हप्ते भरू?”
डोक वर न करता वामन्या वैतागून म्हणाला.
“मायला,वामन्या मी मौन्या हाय! मुंडक वर कर.”
“तू व्हय.मला वाटल बाबूच हाय.”
“कोन बाबू?”
“बँकेचा शिपाई.चार रोजा पसन हप्त भरा म्हनून माग लागलाय.”
“मग,भर कि.”
“कस भरू धंदा खोलल्या पसन एक बी मढ आल नाई!”
“एक बी नै? अस कस ‘धंदा’खोलला अन गिराइकच नाय?”मोह्न्या स्वागत बोलला.
मग त्यान पुन्हा विचार केला कि अस का व्हाव? अन त्याची ट्यूब पेटली.
“इच्या मारी! वामन्या आपल चुकलच बग मर्दा! तरी मंतू गिराइक का नाय?”
” काय?काय चुकलय?”
“एडवरटाइज कराया पाजेल होती!”
“मंजी?”
“माजी झाइरात ! वामन्या बोमबलनाऱ्याची माती बी इकली जातीया! ह्यो झाइरातीचा जमाना हाय. बाकी धंद्या सरक याला बी झाइरात कराया लागन अस मला वाटतया!” मोह्न्या उल्हासाने म्हणाला.
वामन्या मोठा ‘आ’वासून मोह्न्याकडे पहातच राहिला. मयताच्या सामानाची जाहिरात! विचित्र कल्पना!
“मायला,तूच कर.”
“हा,करतो कि! पर पैस दे!”
“किती?”
“हजार पाशे तरी लागतील. ”
वामान्याने कनवटीची हजारची नोट मोहन्याच्या हवाली केली.
रात्री दहा वाजता वामन्याने खोपटाचे दार उघडले तेव्हा मोहन्याच्या एका हातात रंगीत कागदी पाम्प्लेटचा गठ्ठा,बगलेत नुकत्याच रंगवलेल्या कापडी बँनरची गुंडाळी आणि राहिलेल्या हातात अर्धा भरलेला खंबा! गडी एकदम टाईट होता!
“मौन्या, हे काय हाय ?”
मोह्न्या काहीच बोलू शकत नव्हता. त्याने सर्व प्रथम हातातला खंबा सेफ साईड ठेवला. मग जो लुंडकला तो सकाळीच उठला!
वामन्याने एक नजर हँडबिल आणि बँनरवर टाकली. या गोष्टी काही पळून जाणार नव्हत्या. पण बाटलीचे तसे नव्हते. मोह्न्याला जाग आली तर.—-म्हणून वामान्याने बाटली तोंडाला लावली. थोड्याच वेळात तो हि मोहन्या शेजारी लुंडकला !
वामन्याच्या स्वप्नात एका मागून एक कैक प्रेत यात्रा निघाल्या होत्या. प्रत्यक ताटीवर वामान्याचेच प्रेत होते! सर्व ताट्यानचे साहित्या वामान्याच्याच दुकानातले होते! अग्रभागी ‘जिंदगी एक सफर है सुहाना’हे गाणे म्हणत उघडाबंब मोहन्या होता!
धडपडून वामन्या जागा झाला. त्याने डोळे चोळून पहिले. सर्वत्र तोरणे, फरारे बांधली होती. लाउड स्पीकरवर ‘जिंदगी इक सफर है सुहाना’गाणे वाजत होते. मोह्न्या हॅन्डबिलाचे गठ्ठे गावातल्या टुकार पोरांना गावभर वाटण्यासाठी देत होता. वामन्याच्या खोपटावर काल आणलेले ‘न्यू वामन उत्तरक्रिया सेंटर (विक्री व सेवा)’ हे कापडी बॅनर झेंडूच्या फुलांनी सजवून लावले होते.
“मौन्या ,मायला हे काय हाय ?”वामन्या जोरात ओरडला. त्याच्या हातात एक हॅन्डबिलाचा रंगीत कागद होता!
“हा ,हे व्हाय? एडवरटाइज ! काल ठरल्या प्रमान झायराती करतुया!” मोह्न्या निरागस पणे म्हणाला.
“पर हि पामप्लेट !”
“काय,बेस्ट हैत नव्ह?”
“जरा वाचून तर दाव!”
“तर मग ऐक मर्दा.” मोह्न्याने ते ‘पामप्लेट’ वाचायला घेतले.
“—खुशखबर!, खुशखबर!!, खुशखबर!!! आम्ही आज रोजी आपल्या सेवेसाठी –‘ न्यू वामन उत्तरक्रिया सेंटर (सेवा आणि विक्री)सहर्ष सुरु करत आहोत. आता मयताच्या सामाना साठी दहा जागी फिरणे नको!फक्त आपले प्रेत (मढ)घेवून या! पणती पासून खांदेकरी पर्यंत, ताटी पासून तिरडी पर्यंत , सर्व सोय केली जाईल! हवी असल्यास व्हिडीओ शुटींग आणि लाउड स्पीकर सुद्धा सोय करता येते !(अटी लागू!)
उद्घाटन प्रसंगी खालील सवलती जाहीर करताना आम्हास हर्ष होत आहे!
१.साथीच्या रोगात विशेष सूट दहा टक्के !
२.दोन मयताच्या सामानावर ,एक मयताचे सामान मोफत !(स्टोक असे पर्यंत–मयताचा नव्हे,सामानाचा! )
३.ग्रुप बुकिंग करणाऱ्यास घसघशीत सुट !
४.वर्षाभरातील विक्रीवर खास कुपन देण्यात येइल. त्याची भव्य सोडत पुढील वर्षी सर्वपित्री आमावस्येस!विजेत्यास त्याचा मयतीचे सर्व साहित्य (चंदनाच्या लकडासह)आमच्या केंद्रातर्फे मुफ्त!!
एक वेळ आवश्य भेट द्या आणि खात्री करून घ्या! गिऱ्हाईकाचे किवा त्याच्या प्रेताचे समाधान हाच आमचा संतोष!!
आमचे ब्रीद वाक्य ——‘तुमची माती,आमची माणस. ‘ !!!
प्रो.वामनराव मसणवटेकर –मयत स्पेशालीस्ट !—–”
मोहन्याने वाचन संपवले.वामन्या फेस गाळतत्याचा पायाजवळ फेफर येवून पडला होता!