आणि काय चमत्कार. दुसरे दिवशी सक्काळी.
“कोन हाय का घरात?” अति उर्मट सुरात पूछा झाली.
“कोन,डिगा पाटील का? या कि घरात.”मोह्न्याने दार उघडत पाटलाचे स्वागत केले.
उभ्या पट्ट्याच्या नेहरू शर्टात डिगा पाटलाची ढेरी मावत नव्हती.त्याने नुकतीच कटिंग केल्याने डोके मात्र जून कोबीच्या गड्ड्याची सडकी पान काढून टाकल्यावर जसा निबरट तरी टवटवीत दिसतो तस दिसत होत. काही झाल तरी डिगा पाटील शेजारच्या शेपेवाडीतल एक बड प्रस्त(म्हणजे श्रीमंत)होत.
“काय पाटील,सकाळा सकाळा काय काम काढल?मोह्न्याने हळूच विचारल.
काही न बोलता डिगा पाटलान बोटभर चिठी मोह्न्याला दिली.
‘डिगामामा ,सकाळा बा वारला!—वैभव ‘
“कोन वैभव ?” मोह्न्याने विचारले.
“कोन म्हंजी? आमचा भाश्या हाय. पेडगावच्या भनीच पोर. दूरची हाय पर भनच हाय.”
“मंजी, कोण मयात झाल म्हणव?”
“वैभोचा बा ,मंजी यदा पाटील गचकलाय!”
“मन्जे तुमच मेव्हनच मना कि! पर यदा पाटील तर दोन रोजा खाली बजारात दिसले. भक्कम होता गडी!”
“आता मानसाचा काय भरुसा ! सकाळीच तेचा गोंद्या गडी हि चिठी हाती देवून माघारी फिरला. ”
“काय बोलला नाही? कवा गेले ? काह्यान गेले?”
“काय बी बोलल नाही बेन! म्याच तेला मन्लो तुमी काय गडबडी करू नगा ,म्या समदी म्होरली सोय करतो! अन काय घाबरू बी नका!”
“यदा पाटील चांगला उच्चा -पुरा गडी! अस तडकाफडकी कस काय मेल आसन बर ?”बाजारात पाहिलेला यदा पाटील मोह्न्याच्या डोळ्या समोरून हालत नव्हता.
“वरन बेन मजबूत दिसत व्हत! तुला ठाव नाय तेला साकरची बेमारी व्हती, बी.पी. व्हत , पानथरीचा तरास व्हता, पर त्या कह्यांन मेला आसन मला ठाव हाय!” डिगा पाटलान बॉम्ब टाकला.
“ऑ !मंजी?”
“तेच जान येन त्या तारीकड व्हत! एक त आमच्या इरोधात निवडणूकित उभ ऱ्हायला. आमच्या पसन तारीला बी तोडली! आमचा तळतळाट अन तारीचा रोग तेल सोडणार व्हय? त्यो नक्की एड्सनच मेला आसन !”
“बर मंग म्होरं काय?” वामन्यान हळूच विचारलं.
“म्होरं काय? समद मयतीचं नंबरी सामाइन काडा!” डिगा पाटील गरजला.
“मंजी?”
“भाड्या,दुकान कह्याला खोलल!”
“हा,हा,बोला काय काय देऊ?”वामन्या बावळटा सारखा बरळला.
“आता मला काय ठाव काय काय लागतया ? मी काय रोज मढे जाळतुया काय? तुमचा धंदा हाय तवा समदं सामाईन काडा!” पाटील पेटला.
वामन्या अन मोहन्या कामाला लागले. लाकडं,पांढरा कपडा,दणकट बांबू,तिरडीचे इतर साहित्य, लाह्या, बत्ताशे, गाडगे ,पणती,उदबत्ती सर्व आठवून आठवून अंगणात जमा केले.
“हे समदं घेऊन या!” डिगा पाटील जागेवरून उठत गुरगुरला.
“म्हंजी?हे तुमि नेत न्हाई?” वामन्याने विचित्र आवाजात विचारले.
“कह्याला झक माराया धंदे करताव ? अन वर झायीराती बी! काय त मन ‘तुमची माती आमची मानस !’ समद सामाइन अन खांदेकरी मानस घून पेडगावला यदा पाटलाच्या वाड्या म्होरं या!”
“काय,मानसबी ?” मोहन्या पण आश्चर्यचकित झाला.
“आर,एड्सच मढ हाय! गावात कोन हात लावणार? तवा मानस तुमचीच असू द्या!” डिगा खाजगी सुरात म्हणाला.
“पर ,येन -जान ,अन खांदेकरी– शेपरेट चार्ज लागन !” वामन्याने अर्थी बाबीवर भर दिला.
“समन्दा हिसाब कवटी फुटल्याच्या बाद !” लवकर पोहंचण्याची तंबी देऊन डिगा पाटील, गणपती उंदरावर बसल्यावानी , लुनावर बसून निघून गेला.
“मायला,मौन्य तेला मानसबी पायज्यात ! मढ तरी त्याच हाय का ? ते बी आपूनच न्यायचं! समदा घोळ तुज्या झायीरातीन झालाय!” वामन्या वैतागला.
“वामन्या असे वैतागू नगस मर्दा. यापाराच्या नव्या नियमापरमान ,व्यापाऱ्यांन गिऱ्हाईकाकड जायचं असत बाबा! गिऱ्हाईक लै एैदि झाल्यात! अन मनुनच धंदा चालतोय! वामन्या आपलं पैल गिऱ्हाईक हाय तवा जरा धीरानं घे. अन हो ,तुह्या नाहीतर मह्या उंचच तीन खांदेकरी बग. ”
“तीन कह्याला?आपुन दोगं हैत. दोनच बगु!”
“बेकूफ, तू बुटका अन मी उच ,मढ राहील का ठिकानावर ?”
मोहन्याला खांदेकरी म्हणून घेता येणारच नव्हते. कारण सारा भार वामन्याच्या खांद्यावर येणार होता. शिवाय मोहन्याच्या उंचीचा पंचक्रोशित फक्त एकच गडी होता. यदा पाटीलच!. अन त्याच्याच मयतीची सोय करायची होती.
वामान्याने आपल्या उंचीचे दत्या,बाळू अन गंग्याला घेतले. बाळू आणि गंग्या रोजंदारीवर आले.पण दत्त्या मात्र फक्त दोन ‘पावशेरी’ वर तयार झाला! लाकडाचे ओझे वागवण्या पेक्षा लाकूड फाटा पेडगावातच घेण्याचे ठरले. सर्वांनी थोड थोड सामान घेतले आणि ते टोळके घरा बाहेर पडले. तोच समोरून सदा भट आडवा आला.
“कुठ?”सदा ने हटकले. कालच्या पेक्षा त्याचा फाटक्या धोतराला दोन गाठी ज्यास्त होत्या! मारुतीला अभिषेक करून तो परतत होता.
“बोंबला,मायला सद्यान हटकल!” वामन्या उदासवाणी ओरडून मटकन खाली बसला. त्याला तसेच कारण होते. गावात नंबर एकचा ‘अपेशी ‘म्हणून सदा बदनाम होता. त्याने हटकलं कि हाती घेतलेले काम होत नाही, असा गावात प्रवाद होता.
“वामन्या चिडू नगस! सदा अपेशी हाय,अन आपल काम बी असुबच हाय. तवा दोन असूब एक सुब होत!तवा याच हटकन आपल्या हिताचच व्हइल बग!” मोह्न्याने वामान्याची समज काढली.
“तुमाला वाईट वाटत आसन त ऱ्हायील बा!”आपण विचारून चूक केल्याची जाणीव झाल्याने सदा वरमला.
“तस नव्ह सदा! तुला त ठाव हाय वामान्याचा धंदा काय हाय तो ? आज पैल गिराइक आलाय. ते बी गब्बर! म्हणुन वामन्या बावचळा हाय!”
“कोन हाय?”सदाने विचारले.
“पेडगावचा यदा पाटील!”
“कवा गेले ?”
“सकाळा! पर आता वेळ नाही बोलाया ,आमास्नी उशीर व्ह्तुया अमी निगतो.”
काही विचार करत सदा आपल्या वाटेने निघाला आणि मोह्न्याचे टोळके पेडगावच्या रस्त्याला लागले.