मोह्न्या ,वामन्या आणि कंपनी पेडगावच्या मार्गाला लागले.वाटेत फक्त दहा मिनिट दत्या ‘देशी’खोपटात जावून आला.ताज्या आंबट वासाने सारे आसमंत बरबटून निघाले, हे द्त्याच्या गावी पण नव्हते. तो आपला ‘कशी गुपचूप घेतली’याच भ्रमात होता.
समोर डेरेदार लिंबाच्या झाडा जवळ यदा पाटलाचा वाडा दिसत होता. दोन कोस पायपीट केल्याने सगळ्यांच्या पायात गोळे आले होते. सर्वत्र विचित्र शांतता होती. तेव्हड्यात वाड्यातून घाईत डिगा पाटील बाहेर पडला अन लुनावर बसून निघून गेला. अश्या प्रसंगी खूप कामे असतात तेव्हा मोह्न्याला त्याचे काही विशेष वाटले नाही.
मोहन्याने हातातला बांबूचा भारा,वामान्याने कापडाचे गाठोडे,तर बाळूने कडबा उभ्यानेच त्या लिंबाच्या झाडाखाली फेकल्याचे पाहून,द्त्याने पण हातातली गाडगी फेकून दिली, अन आपण पण त्या मागोमाग धडपडला.
“मायला,दत्या,भाड्या,सारी गाडगी फोडून टाकलीस! आता इस्तू कह्यात न्यायचा? तुह्या कवटीत? जा नवी गाडगी अन लाकडाबी बग.” वामान्याने शंभराची नोट दत्याला देत सांगितले. दत्या भेलकांडत निघून गेला.
पाटलाच्या वाड्या समोरचे भक्कम दार लोटलेले होते. अदमास घेत मोह्न्याने हलक्या आवाजात हाक दिली.
“कुनी हाय का?”
“कोण हाय ?”‘बुलेट’च्या फायरिंग सारखा काळजावर ढोल बडवणाऱ्या आवाजात प्रती प्रश्न आला. आणि—- आणि त्या पाठोपाठ त्या आवाजाचा मालक,साडे सहा फुटी देह बाहेर आला. तो यदा पाटील होता!
बोंबला,म्हणजे ज्याच्या मातीची साग्र -संगीत तयारी करून आलोत तोच यदा पाटील बाहेर आला होता.तो बी जिंदा!
“मी , मौन्या !” हे वाक्य तोंडून निघे पर्यंत मोह्न्याच्या डोळ्या पुढे अंधारी आली. आता खैर नाही, याची खात्री द्यायला ज्योतिष्याची गरज नव्हती.
यदा पाटील आता खेटरान बडवणार यात तिळमात्र शंका नसलेला वामन्या, फुटक्या गाडग्याचा काठ हातात घट्ट पकडून लिंबा खाली दोन पायावर लटलट कापत बसला होता. बाळू अन गंग्या मात्र ‘कुत्ता जाने ,चमडा जाने’ या भावनेने लांबून बिड्या पीत खेळ पहात होते.
यदा पाटलाचे लक्ष झाडा खालच्या ‘साहित्या’कडे गेले.
“आर ,भाड्यानो तुमी त स्मन्द्या तयारीनच आलाव कि!” पाटील खवळला.
“तेच काय झाल पाटील, दिगांबररावनीच समदी तजवीज कराया सांगितली व्हती!” भीत भीत मोह्न्या बोलला. कुठल्याही क्षणी पळ काढण्याची त्याने मानसिक आणि शारीरिक तयारी ठेवली होती. इकडे झाडाखाली वामान्याची अवस्था मोठी गंभीर होती. हाता पायाला गोळे येत होते. डोळ्या समोर अंधारी घिरट्या घालत होती. त्याने मनातल्या मनात देवाचा धावा सुरु केला होता.
‘हे देवाधी देवा! यम देवा! आता तूच वाचीव रे बाबा ह्या समद्या लफड्यातून! ह्या उभ्या यदा पाटलाला ‘अडवा’कर! म्हंजे आमच्या भवनीच्या पारी नाट लागायचा नाही! तुला खडा खडी पाच आण्याची खडी साखर वाटीन!’
“पाजी,हलकट,कुत्र! डिग्या अधिकप्रसंगी हाय! कडू बेन!”पाटील गडगडाटी हसत म्हणाला.
पाटलाच्या हसण्याने मोह्न्याला धीर आला.म्हणजे आता किमान मार तर बसणार नाही याची त्याला खात्री पटली.
“पर तेनी तर वैभूराजाचा कागुद दावला व्हता!”
“तेच काय झाल मौन्या,सकाळा सकाळा या लिंबावरला एक कावळा आमच्या टाळक्यावर टोच्या मारून गेला. आमच्या पाटलीनबाईनी नेमक ते पाहिलं. झाल. बाई साहेबांनी वैभूच्या हातच्या चिठ्या समदी कड रवाना केल्या कि आमच ‘डिंग डॉंग’झाल!”
“मंजी?
“कावळा ज्या माणसाला शिवल त्याचा मरणाची वावडी उठवली का कि तेच आयुष्य वाढत. आस पाटलीन बाईच म्हणन हाय! अन म्हणून त समदी कड सांगावा गेलाय.” सर्व उलगडा करून पाटील हसत सुटला. मोह्न्या आणि वामन्या सैलावले.
तेव्हड्यात डुलत डुलत दत्या जवळ आला. गाडगी अन लाकडाच्या पैशाची ताजी कोरी त्याने ढोसली होती.
“कूट हाय मढं ?”
भेलकांडत पाटलाच्या डूबऱ्या ढेरील धडकत त्याने आंबट आवाजात विचारले.
तीन शब्दांनी सहा फुटी पाटील पेटला अन आंबट वासाने भडकला! त्याने जोर खाऊन फाडकन दत्याचा थूतरित हाणली! तेंडुलकरच्या चौकारा प्रमाणे दत्या लांब फेकला गेला.
“मगा डिग्यान असच टकूर फिरीवल! आला त आला ,माग म्होरं न बगता ,लागला बोंबलातला,’पानी तापवा,मड्याला तेल लावा,आगूळ घाला, आत्ता खांदेकरी येतीन !’तेल पण अशीच व्हटकाळीत हाणली, तवा गेला कावळ्या गत उडून!”
मघाशी डिगा पाटील का ‘गुल ‘ झाला ते मोहन्याला कळले.
“पर ह्या सामनाच काय करायचं?” वामन्याने भीत भीत विचारलेच. कारण त्याचे पैसे त्यात अडकले होते!
“-‘सामाइन ‘! असलं अभद्र सामान परत नेत असत्यात! तवा मी सांगतु तस करा!”
यंदा पाटलाने स्वतःच्या देखरेखीत सगळ्या सामानाला काडी लावायला लावली! राख पांढऱ्या कोऱ्या कपड्यात बांधून जाताना ओढ्यात टाकायला बजावले.
राख सावडून सर्वजण परत निघाले. बाळू ,गंग्यानी हातात लिबांच्या डहाळ्या पण घेतल्या!
वामन्या थोडा रेंगाळलाच .
“पाटील पैसे !”
“पैसे? कशाचे?”
“मयतीच्या सामानाचे!”
“ह्या आगूचर पना कोन सांगितला होता?”
“दिगांबररावांनी !”
“मंग ,पैसे तेंच्याकूनच घ्या! आता निगा!” पाटील वाड्यात घुसत म्हणाला.
वामन्या उदास झाला. सारे खांदेकरी दोन्ही हात हलवत तर दत्या एक हलवत परतले. कारण त्याचा एक हात गालावर होता! गालफडात आवळा धरल्या सारखा त्याचा गाल सुजला होता. दत्याला मारा पेक्षाहि खाड्कन उतरल्याचे दुःख होते. शिवाय का मारले हे हि त्याच्या आकलना बाहेरचंच होते.