नवीन लेखन...

प्रोजेक्ट – ‘मय्यत’ !

बुटका वामन्या उदास चेहऱ्याने पारावर बसला होता.
“वामन्या,काय झाल लई उदास दिसतुयास ?”उंचेला अन काटकुळ्या मोह्न्याने त्याच्या शेजारी बसत विचारले.
मोहन्या दिसायला जरी ताडमाड आणि बेंगरूळ असला तरी त्याच्या जवळ जगातल्या सगळ्या समास्यांचे उत्तर आहे अशी किमान,वामन्याची धारणा होती.
“आता आमच्या रडकथा कवर तुला सांगायची?माजी बेकारी तुला ठाव हायेच.वर आनी ‘उदास का?’मनून इचारतोस”
“मग तुज काय इचार हाय?म्या मैतर मनून काय कराव अस तुला वाटत?”मोह्न्याने विचारले.
“वळकि पाळ्कीन एखान्द्या दुकानी नौकरी धरावी म्हनतुया. हाय का तुजी कुट वळक?”
“हितच त तुमच चुकत बग!”मोह्न्या भडकला.
“मंजी?”
“दुसऱ्याची ताबेदारी कश्यापाई करायची?”
“मग?”
“आपुनच मालक व्हाव!”
“इत रातच्या खाल्ली तर  सकाळच्या तंबाखूला पैसा नाई,अन मन ‘मालक’व्हाव!”
“माज ऐकतूस ?”
“हा,बोल.”
“एखांदा धंदा टाक!”मोह्न्यान वामान्याच्या डोक्यात किडा सोडला.
“तेला भांडवल?”
“बँकची फाईल करू!”मोहन्या कडे सगळ्यां प्रश्नांची उत्तरे होती.
“नग बाबा,बँकेच झेंगट.”
“का?काय झाल ?”
“म्हादू सांगत होता कर्जा मंजूर होई पत्तोर निम्मी रक्कम उडाली मन!”
“मग बिगर भाडवली धंदा कर.”
“कंचा?”वामन्याने मोठ्या आशेने विचारले.
“भिक मागायचा!”मोह्न्या चिडून म्हणाला.
“तस नव्ह मर्दा.पर  कमी भाडवलाचा आणि बख्खळ नफा देणारा एखांदा धंदा आसन त तूच सांग!”
मग मात्र मोहन्याच विचारात पडला. विचार करण्याचे काम मोहन्याच्या खांद्यावर असल्याने वामन्या गुढग्यात मुडके खुपसून निवांत झाला.

बराच वेळ मोहन्याचे डोके मधून मधून हालात होते.तो विचारात असताना असेच व्हायचे. शेवटी खूप खूप विचाराअंती मोह्न्याने ‘धंदा’ पक्का केला.
“वामन्या अपुन स्मन्द्या पेक्षा येगळा धंदा टाकायचा.”
“कंचा?”
“मढ्याच सामाईन इकायचा!”
वामान्या तोंड ‘आ’ करून मोहन्याकडे  पाहतच राहिला.
“जरा बैजवार सांग.”भानावर येत वामान्याने विचारले.
“हे बग वामन्या, आपल्या पिंपळवाडीत असला धंदा कुठच नाही.समद सामाईन भेटत पर वायल्या वायल्या जागी.समंद एक जागी ठुल त बेस्ट ‘धंदा’ चलन.कस?”
“हा, अन समद्या धंद्यात गिराक भावात लई घासाघीस करत.पर यात फकस्त फाईनल टोटल इचारत!”वामान्याला पण यातले फायद्याची कलम दिसू लागली.
“मंजी ,वामन्या फायदाच फायदा!”
“मग,मोहन्या करायचा का ह्यो धंदा, दोगात मिळून?”
“वामन्या,मर्दा राग नग मानुस.मी हजार लफड्याचा मानुस! तुझ्या संग दोस्तीत भागी नाय जमायची! पर तू हो म्होर बिनघोर!”
“ते तर झालच. पर मला काय तुज्या इतका अनुभव नाय! तुला मज्या संग ऱ्हाव लागंच!” वामान्याने आपल्या अज्ञानाची कबुली दिली.
“हा,पर एव्हारात मानसान चोख असाव! मी तुज्या मदतीला आसनच. पर जवा जवा मदतीला येईल तवा तवा मज कमिशन धा टक्क ऱ्हायील! बग जमत असन त!”  मोहन्याने आपली बाजू स्पष्ट केली.
“मले मंजूर हाय.”वामान्याने कबुली दिली.

नंतर मग दोघेजण बराच वेळ नव्या ‘प्रोजेक्ट’च्या संभाव्य गुंतवणुकीच्या हिशोबात गुंतून गेले. मोहन्याच्या मताप्रमाणे दोन/तीन मढ्याच्या साहित्याची तयारीअसावी. लाकूडफाटा,गोवऱ्या,गाडगी,कडबा,बांबू,अशी यादी होत होती.
“मोह्न्या,हळद -कुकू ,हिरव पातळ पण ठीवाच बरका.”
“का?”
“हल्ली लई पोरी हुंड्या पाई मरत्यात.त्यायच्चा सठी. पर त्याच पैस अपुन नाय घेणार! तसच देणार.”
“वामन्या,लैच बारकाइन इचार चाललाय. धंद्यात बरकत येनार बग.”
सगळ्या वस्तूंच्या किमतीची बरीज, दोनदा वामन्यान अन दोनदा मोह्न्यान घेतली. चार वेगवेगळ्या बेरजा आल्या! त्यातल्या त्यात ज्यास्त असलेला आकडा गृहित धरण्यात आला. कारण पैसा कमी पडू नये!
“बोंबला, सात हजार रुपये! कह्याच कमी भांडवल?” आकडा बघून वामन्या पुन्हा उदास झाला.
“मायला,अस उदास हु नगस! धंद्यात हातपाय गळून जमत नसत. उंद्या बँकेत जावून कर्जा कादूत.”
“पर मौन्या ,बँकवाल्या सायबान काय ‘दक्षिना’मागितली त ?” वामान्याने शंका काढलीच.
“आता फाटे नग फोडुस. एक त कोन काय मागणार नाय. अन मागितल तर अपुन शाप सांगून टाकायचं!”
“काय?”
“अपुन शाप सांगून टाकायचा कि सद्या कडकी हाय! तवा तुमच्या घरी कुनाची मयात झाली त आपल्या-  कून सामैन फुकट!”

दुसऱ्या दिवशी ठरल्या प्रमाणे वामान्य आणि मोह्न्या बँकेत गेले. मोहन्याने गरीब भाबडा चेहरा करून मॅनेजरला ‘पटवायला’सुरवात केली. पण वामान्याने गरज नसताना ‘मोफत मयत’ऑफर केल्याने तिथले वातावरण चिते सारखे भडकले! पण अनुभवी(असल्या बाबतीत मोह्न्या अफलातून आहे)मोह्न्याने कसे बसे ‘लाकडाच्या वखारी’साठी कर्ज मंजूर करून घेतलेच.

कर्ज मंजूर झाल्यावर सर्व सामान वामान्याच्या पडक्या खोपटा पुढे जमवण्यात आले.सामान सात हजाराचे.बँकेला दहा हजाराच्या पावत्या दिल्या.अश्या प्रकारे वामान्याला ‘धंद्याला’लावून, मोहन्या आपले हजार रुपये कमिशन घेवून निघून गेला.

Avatar
About सुरेश कुलकर्णी 176 Articles
मी सुरेश कुलकर्णी. . साधारण कथा , लेख ,जुन्या सिनेमाच्या (हिंदी )गण्यावर माझे लिखाण असते . एखादे छानसे पुस्तक वाचण्यात आले तर त्यावर हि लिहतो . माझ्या वाचकास एक नम्र विनंती माझे लिखाण आवडले तरी ,आणि नाही आवडले तरी जरूर कळवा माझ्या लिखाणाचा पोत त्या शिवाय सुधारणार नाही .माझे सर्व लिखाण काल्पनिक असते .. mb.6361255994. किवा srk101252@gmail --संपर्का साठी

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..