मानवाने निसर्गावर सातत्याने केलेल्या कुरघोडीने ऋतुमानात बदल होत आहेत. कुठे जास्त पाऊस पडून ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होते तर काही ठिकाणी पाऊस कमी पडून कोरडया दुष्काळाचा सामना करावा लागतो आहे. पाण्यासाठी गावकऱ्यांना दाहीदिशा भटकंती करावी लागते. याचे दुरगामी परिणाम अन्न व पाणी टंचाईत होते आणि देशातील गरिबांना अन्न न मिळाल्याने उपासमारीची पाळी येते. जे अन्न मिळतं ते सकस मिळेल याची खात्री नसते. पाणी आणि अन्न यांची जगात सर्वत्र टंचाई आहे. काही ठिकाणी मुबलक आहे तर काही ठिकाणी पोटाच्या खळगी भरण्याचा प्रश्न आहे. भारतचं आर्थिक दारिद्रय अन् प्रथिनयुक्त अन्नाचा दुष्काळ दूर होण्यासाठी “स्पायरुलीना” शेवाळ कसे उपयोगात आणता येते ते पाहू.
विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील लोणार या ठिकाणी, पंचाप्सर म्हणजे एक अद्वितीय निसर्गवैशिष्टपूर्ण असलेलं अती खारट नी क्षारयुक्त पाण्याचं सरोवर आहे. विदर्भातील सुपीक संपन्न सपाट भूमीत आकाशातून अती वेगाने पडलेल्या उल्का पातातून ५० ते ६० हजार वर्षापूर्वी हे सरोवर उल्केच्या आघातानं तयार झालं. पावणेदोन कि.मी. व्यासाचं अन् १२ ते १५ कि.मी. परिघाचं वैशिष्टपूर्ण भूरचनेमुळे या विवरात अतिखारट नी क्षारयुक्त पाण्याचं सरोवर तयार झालं. काही सूक्ष्म सजीव जलचर त्या पाण्यात वाढू लागले तसे शेवाळीही वाढू लागली आणि त्यापैकीच “स्पायरुलीना” हे एक शेवाळ.
वर्ध्याच्या, डॉ.तारक काटे या वनस्पती शास्त्रज्ञानी या शेवाळ्याचं महत्व ओळखलं. खारट क्षारयुक्त पाण्याच्या हौदात या स्पायरुलीनीची लागवड केली. वेगाने वाढणाऱ्या स्पायरुलीनीनं हौद भरून गेला. शेवाळ वेगळ करून उन्हात वाळवलं. अनेक प्रयोगांती त्यात भरपूर प्रमाणात प्रथिन असल्याच आढळलं. तसेच माणसाच्या खाण्यात ते आलं तरी काही अपाय होत नाही असं लक्षात आलं. तेव्हा या स्पायरुलीनीच्या भुकटीचा प्रथिनसमृद्ध अन्नघटक म्हणून त्यांनी सुखडी या पूरक अन्नात समावेश केला. आता डाळी किंवा मांस न खाताही प्रथिनयुक्त अन्न तयार करून वापरता येत हेच स्पायरुलीनीनं सिद्ध केलं. खाद्यानात असणारा प्रथिनांचा तुडवडा स्पायरुलीनाचा आहारात समावेश करून दूर होतो हे आपल्या दृष्टीने सुचिन्हच आहे.
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply