जेव्हा संध्याकाळी सवड मिळेल तेव्हा मी येथे येवून बसतो . आमच्या गावा पासून साधारण दीड -दोन किलोमीटर वर हे एक रेल्वे स्टेशन आहे . पूर्व -पश्चिम पसरलेला ‘फलाट ‘ संध्याकाळच्या सोनेरी प्रकाशात नाव्हून निघतो ते दृष्य रोजचेच असले तरी, ते रोजच मला विलोभनीय वाटते . काय म्हणता वर्दळ ? अहो खेड्याचे ‘ठेसन ‘ आहे . कसली आलीय वर्दळ ? औषधा सारखी सकाळ -दुपार -संध्याकाळ एक एक रेल्वे शिट्टी मारून जाते . त्या सुमारास चार दोन रेल्वे कर्मचारी ,एक स्टेशनमास्तर ,एखाद-दुसरं पासिंजर इतकंच . बाकी इतर वेळेला निवांत कारभार !सायडिंगची एखादी मालगाडी , चार गांजलेल्या वागिनी , दूरवर स्लिपरच्या वर्षानुवर्ष पडलेली फळकुट , दगडाच्या गिट्टया (मेटल ),बाजूलाच दगडी चिरे ,काही न घडवलेले मोठाले दगड . हे कुठल्याही स्टेशनवर दिसणार नेहमीच दृश्य आमच्या पण स्टेशनवर आहे. पण हे सार सुस्त ,पेंगत असल्या सारखं पडलंय ! नाही म्हणायला संध्याकाळच्या साडे सातच्या गाडीला चार दोन भिकारी मात्र रात्री मोकळ्या फलाटावर पथारी ठोकायला येतात , रात्री बेवारशी कुत्र्यांना तेव्हडीच सोबत !
स्टेशनच्या मावळतीच्या टोकाकडल्या शेवटच्या सिमेंटच्या बाकड्या वरली धूळ मी हातातल्या पेपर ने झटकली आणि बूड टेकवले . मी नेहमीच येथे बसतो . समोरचे चकाकणारे दोन रूळ क्षितिजावर एकमेकांना मिळतात ते इथून स्पष्ट दिसत . त्यांच्या मिलन बिंदूवर मावळणारे ‘इंदू बिंब ‘! भिवया सारखे दोन निळसर डोंगराच्या रेषा ! नजर हटत नाही . ‘ती’ला खूप आवडायचे येथे बसणे !माझा हात आपल्या हातात घट्ट धरून ती मावळणाऱ्या सूर्या कडे पहात बसायची .!
“ते पाहिलंस का ? लाल आणि पिवळा रंग कसा छान सुटा -सुटा दिसतोय . तू न याच एक पेंटिंग कर आपण फ्रेम करून आपल्या बैठकीत लावूत . ”
” हु ”
“बघ तो लाल रंग पिवळ्यात मिसळून केशरी होतोय ,मघाचे चमकदार निळे आकाश आता काळवंडू लागलाय !”
असेच बरेच बोलायची . माझे लक्ष तिच्या बोलण्याकडे नसायचेच . मी तिच्या ओठाच्या लयबद्ध हालचाली कडे पाहत राहायचो ! तीच माझ्यासाठी अमुल्य गोष्ट होती .!
आत्ताही तशीच संध्याकाळ आहे . तसेच चमकदार निरभ्र निळसर आकाश आहे , आज हि हवेत तोच आलाप आहे , मंद झुळकेची लयबद्ध आवर्तन तीच आहेत , तसाच नभातला तो केशरी रंग काळवंडलेल्या निळाईत मिसळणार आहे , मग ना उजेड ना अंधार अशी स्थिती येईल , हळू हळू अंधाराचे घट फुटू लागतील , किर्र अंधार दाटत जाईल . सगळं तसाच आहे फक्त ‘ती ‘ सोबत नाही .! जाऊ द्या . नाही आपल्या नशिबी दुसरं काय ?
मी बाकड्यावर मांडी घालून बसलो . पायाची घडी घातली आणि पेपरची घडी उघडली . त्याच त्या बातम्या , बलात्कार , जाळपोळ , खून ,दरोडे . नेहमीचेच . पण गेल्या काही महिन्या पासून आमच्या गावाचं नाव या पेपरात झळकतंय ! चार मुडदे पडलेत . ! हो या रेल्वेस्टेशनच्या परिसरात . ! कोणी तरी एकट्या दुकट्याला गाठून डोक्यात दगड घालून खून करतोय ! का ?माहित नाही . पोलीस पण चक्रावलेत . पैशा साठी म्हणाव तर , मरणारे फकाट , भिकारी होते ! दुश्मनी ? पण भिकाऱ्याशी कोण दुश्मनी आणि का करणार ? सायको ? एक गोष्ट चमत्कारिक आहे , रुपयाच नाणं मात्र प्रत्येक मुडद्या जवळ सापडलंय ! अर्थात तो एक योगायोग असेल ,कारण भिकाऱ्या जवळ नाणं असणारच कि . जाऊ द्या आपल्याला काय करायचंय ? ज्या गावाला आपल्याला जायच नाही त्या गावचा रस्ता कशाला विचारायचा ?
तेव्हड्यात गाडीची कर्कश्य शिट्टी वाजली . मी दचकलोच . काय भयानक आवाज आहे हो ! नेहमीच असून हि मी दचकलो . चला हि गाडी गेली की घरी जावे झालं . आज साडेसातची गाडी तास भर लेट झालीय , आजच्या दिवसातली शेवटची गाडी . आता सकाळपर्यंत निवांत . समोरच्या लेडीज कंपार्टमेंट मधून दोघे भिकारी उतरले तर ,मागच्या डब्ब्यातून एकजण उतरतोय . आता काय ? स्टेशन बाहेरच्या ‘देशी ‘ मधून बाटल्या आणतील आणि सगळे मिळून ‘पार्टी ‘ करतील ,मोबाईलवर चावट क्लिप पहात !हो, त्यातल्या दोघांकडे आहेत मोबाईल ! मी एकदा पाहिलंय त्यांच्या कडे . जाऊ द्या . हे त्यांचं नेहमीचंच आहे . आपल्याला काय करायचंय ? काही का करेनात . आपण आपलं निघावं झालं .
मी स्टेशनला वळसा घालून त्या झाडा खाली आलो .’ तो’ मागल्या डब्ब्यातून उतरून या झाड खाली बसलेला मी डोळ्याच्या कोपऱ्यातून पहिले होते , आणि त्याच बरोबर जवळच पडलेले ते ‘मेटल ‘ करण्यासाठी आणलेले दगड पण ! झाड मागच्या खांबावरील दिव्यात तो परिसर बऱ्या पैकी उजळला होतो . मी त्याच्या जवळ गेलो . खिशातला रुपयाचा बंदा त्याचा पुढ्यात टाकला ! नमागता मिळालेला त्याचा आयुष्यातला हा पहिलाच रुपया असावा !
” याच पैश्या तू त्या दिवशी …” मी काय बोलतोय या कडे दुर्लक्ष करून तो ,पुढ्यातला रुपया खरा आहे का नाही हे ते नाणं डोळ्या जवळ घेऊन तो पहात होता . तो रुपया न्याहाळत असताना मी तो शेजारचा दगडी चिरा दोन्ही हातानी उचलला , चांगला माझ्या डोक्या पर्यंत आणि !!! उद्याच्या वृत्तपत्रासाठी ठळक हेडलाईन तयार झाली होती ! ” आणखी एक खून ! पोलीस काय करत आहेत ?”
०००
पण का ?
सांगतो .
त्यादिवशी अशीच गाडी लेट होती , दोन तास . ऑफिसाची काम उरकून मी परतलो होतो . खरे तर दुपारीच येणार होतो ,पण बायकोच्या सिझरिंग साठी आमच्या सोसायटी तुन (शिक्षक सोसायटी हो )कर्ज काढले होते, त्याचा चेक मिळायला उशीर झाला होता . म्हणून हि शेवटची गाडी धरली . मोट्ठे काम झाले होते . उशीर झाल्याची रुखरुख होतीच पण काम झाल्याचे समाधान पण होते . दिवस भाराची दगदग झाली होती , अंग अम्बल होत म्हणून ,स्टेशन बाहेरच्या टपरीवाल्या कडे चहा घेतला , एक सिगारेट पण घेतली . तशी मी ओढत नाही पण आज जरा मुड आला होता . मला चहा देऊन तो टपरीवाला टपरी बंद करून निघून गेला . मी हातातला तो चहाचा कागदी कप फेकून दिला आणि सिगारेट पेटवली . पैशाचे काम तर झाले . चारदोन दिवसात चेक वठला कि दवाखान्यात पैसे भरून टाकावेत म्हणजे काळजी नाही . अशा काहीश्या विचारात होतो ,तोच कोणी तरी अचानक समोर आले .
“साहेब गरिबाला काय तर द्या !” लाचार तोंडाचा हा भिकारी मी अनेकदा या प्लॅटफॉर्मवर पहिला होता . अनेकदा त्याला रुपया -दोन रुपये दिलेही होते .
“अरे या वेळी ? आज काही नाही बाबा ”
” असं कस ? नाही म्हणू नका !”
काय लोचट आहे . मी मनात म्हणालो .
” काय य द्या जी, लै भुका लागल्यात बाग !”
काही तरी दिल्या वाचून आपली सुटका नाही हे माझ्या लक्षात आले होते . मी खिशातून पाकीट काढले . काय होतय हे कळायच्या आत त्याने पाकिटावर झडप घातली ! मी सटपटलो . असे काही होईल अपेक्षितच नव्हते ! मुख्य म्हणजे त्या पाकिटात तो चेक पण होता ! मी त्याला भिडणार तोच , दोघा चौघांनी मला मागून धरले ! तेही भिकारीच होते ! स्वतःच्या असाह्यतेची चीड अली .
“अरे सगळे पैसे घ्या पण तो चेक —-“माझ्या तोंडात घाणेरड्या कपड्याचा बोळा कोणी तरी कोंबला . पाठीत जोराचा दणका बसला . बहुदा लाकडी दंडुका असावा . तेव्हड्यात डोक्यात काहीतरी लागले . लाथा , बुक्क्या आणि काय काय , सहनशक्ती संपली तशी माझी शुद्ध हरवली !
चार दिवसांनी शुद्ध अली . आठवडयांनी हॉस्पिटल मधून सुटका झाली . तोवर माझे विश्व् उद्धस्त झाले होते ! मी वेळेवर आलो नाही . बायको बेचैन झाली . बी पी वाढला . चक्कर येऊन पलंगाच्या कोपऱ्यावर पडली ! सोबत ? कोठून आणणार सोबत ? मी हिच्याशी लग्न केले तेव्हा ‘तू आम्हाला मेलास ‘ म्हणून माझ्या घरच्यांनी माझ्याशी सम्बन्ध तोडून टाकले होते !आणि हिच्या घरचे —- कोणीच नाही . हि अनाथ पोर ! लग्न झाल्या पासून मीच हिचा बाप ,माय , भाऊ ,बहिण , नवरा —-सगळच होतो! दवाखान्यात नेई पर्यंत उशीर झाला होता म्हणे . काय करणार ? खेड्यात रहाणाऱ्यालोकांना दवाखाने पाच पाच किलोमीटर लांब असतात . शिवाय वाहनाची सोय नसते . गेली ,पोटातल्या बाळा सगट ! या जगान हिला खूप छळून काढलं. हि जगायला पण भीत होती ! आत्महत्या करायला निघाली होती ! मी तिला वाचवली . जगण्याची उम्मेद आणि हेतू दिला !पण जायची ती गेलीच ! आमचे लग्न झालावर सुद्धा , झोपताना माझा हात हातात घट्ट धरून झोपायची ! इतकी भित्री ! कशी गेली असेल मरणाला सामोरी ! तेव्हाच मी प्रतिज्ञा केलीय मिळेल तो भिकारी मी नष्ट करीन ! याला तुम्ही ‘बदला ‘ म्हणा ,नाही तर मला ‘सायको ‘ म्हणा !
— सु र कुलकर्णी
–आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय . पुन्हा भेटूच Bye