संगीतभूषण पं. राम मराठे यांचा जन्म २३ ऑक्टोबर १९२४ पुणे येथे झाला.
पं. राम मराठे यांचा जन्म पुरुषोत्तम व मथुराबाई या दांपत्यापोटी झाला. ते यांचे दुसरे अपत्य. माधव, अनंत वसंत हे 3 भाऊ आणि गोदावरी कमला ह्या २ भगिनी. त्यांच्या वडिलांची पुणे येथे खानावळ होती. लहानपणीच त्यांची संगीताची ओढ वडिलांनी लक्षात घेतली. वडील व काका गजानन यांच्याकडून रामभाऊंवर गाण्याचे व अभिनयाचे संस्कार झाले. त्यांचे शालेय शिक्षण भावे स्कूलमध्ये झाले. सुरुवातीस त्यांनी मुळे यांच्याकडे गाण्याचे व अंबीटकर यांच्याकडे तबल्याचे शिक्षण घेतले. त्यांची मोठी बहीण गोदावरी ही गोपाळ गायन समाज येथे शास्त्रीय संगीत शिकायला असे. तिच्याबरोबर ठेका धरण्यास ते जात. त्या काळातील गाजलेल्या ध्वनिमुद्रिकांचे श्रवण करून त्यांचे हुबेहूब अनुकरण ते करत व लहानमोठ्या कार्यक्रमात आपली कला सादर करत.
मराठे यांना ‘सागर फिल्म’ या संस्थेच्या धरम की देवी (१९३५) या चित्रपटात बालकलाकाराची भूमिका मिळाली. येथून त्यांचे चित्रपटातील अभिनय क्षेत्रात पदार्पण झाले. त्यानंतर १९४० पर्यंत ‘मेहबूब फिल्म’ या चित्रपटनिर्मिती संस्थेच्या मनमोहन (१९३६), जागीरदार (१९३७) आणि वतन (१९३८) या चित्रपटांत त्यांनी काम केले. तसेच न्यू थिएटरच्या लाईफ इज अ स्टेज या इंग्रजी चित्रपटातही त्यांनी काम केले. याशिवाय जयंत पिक्चर्स, इम्पिरिअल फिल्म आदी चित्रपटसंस्थाच्या चित्रपटातही त्यांनी विविध भूमिका केल्या. प्रभात फिल्मच्या माणूस, गोपाळकृष्ण या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका गाजल्या; पण त्यांची ओढ अभिजात शास्त्रीय संगीताकडे होती. त्यामुळे त्यांनी मास्तर कृष्णराव यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे धडे घेण्यास प्रारंभ केला (१९४१). पुढे त्यांना विष्णुपंत पागनिस पं. वामनराव सडोलीकर जयपूर गायनशैली व आवाज कमावण्यासाठी योग्य संस्कारसाठी घेऊन गेले (१९३९ ते ४3), पं. मनोहर बर्वे, पं. यशवंतराव मिराशीबुवा (१९४७-५०) ग्वाल्हेर गायकी व जगन्नाथबुवा पुरोहित (१९५२-६८) उ. विलायत हुसेनखाँ आग्रा गायकी तसेच बी. आर. देवधर यांची तालीम व मार्गदर्शन मिळाले.
शास्त्रीय संगीत आत्मसात केल्यानंतर रामभाऊंनी ग्वाल्हेर, जलंदर, पाटणा, कोलकाता, दिल्ली व अमृतसर येथील शास्त्रीय संगीत संमेलनामध्ये भाग घेतला. नटवर्य गणपतराव बोडस यांच्या आग्रहास्तव त्यांनी संगीत सौभद्र या नाटकातील कृष्णाच्या भूमिकेद्वारे संगीत रंगभूमीवर पदार्पण केले (१९५०). बालगंधर्व, हिराबाई बडोदेकर, केशवराव दाते, विनायकबुवा पटवर्धन, जयमाला शिलेदार, नानासाहेब फाटक इत्यादींबरोबर त्यांनी एकच प्याला, संशयकल्लोळ, स्वयंवर, मंदारमाला, सौभद्र, जय जय गौरीशंकर (१९६६) इत्यादी नाटकांत भूमिका केल्या. तसेच काही नाटकांचे संगीत दिग्दर्शन केले आणि अहिरभैरव, बैरागी, जोगकंस, अभोगी, बागेश्री कंस, बसंतबहार इ. रागांचा कौशल्यपूर्ण प्रयोग त्यांत केला.
रामभाऊंच्या गाण्याची पट्टी चढी पांढरी चार अशी होती. प्रथम नोम्-तोम् आलापांनी सुरुवात करून बंदिशीच्या अंगानी हुकमी सूर लावून ते रागाची बढत करत. बंदिशीतील बुद्धिनिष्ठ व शिस्तबद्ध मांडणीत गायकीतील विविध अलंकारांचा वापर ते करीत. त्यांना शेकडो बंदिशी मुखोद्गत होत्या. राग बढतीत मूर्च्छनेचा वापर हे त्यांचे वैशिष्ट्य होते. मुबारक अली कराची ,लाहोर येथे यांच्याकडून त्यांना मूर्च्छना या प्रकाराची उकल व दिशा मिळाली. ते स्वत: उत्तम तबलावादक असल्यामुळे त्यांचे लयतालावर प्रभुत्व होते. विलंबित एकताल, तीनताल, तिलवाडा, झूमरा, आडाचौताल, मध्यलयीतील रूपक, झपताल अशा विविध तालातील चिजा त्यांना अवगत होत्या. तसेच विविध तनकारीच्या प्रकारांचा संग्रह त्यांच्याकडे होता. गळ्याची उत्तम फिरत, खुला दमदार आवाज, तानेतील स्पष्टता, दाणेदारपणा, रागशुद्धता राग सहज उलगडून दाखवण्याची किमया व स्पष्ट विचार व समेवर हमखास येण्याचे कौशल्य ही त्यांच्या गायनाची वैशिष्ट्ये. अनवट व जोड रागांवर त्यांचे प्रभुत्व होते. बसंत बहार, नट केदार, बसंती केदार, जौनकली, भैरव बहार, हिंडोलबहार भैरव भटियार, जौन भैरव आदी अनेक जोड व अनवट राग गाण्यात त्यांचा हातखंडा होता. पं. राम मराठे यांचा संगीतातील संचार बहुमुखी होता. ख्यालगायक, बालपणी चित्रपटातील नट, गायक, संगीत रंगभूमीवरील यशस्वी नट, संगीत नाटकांचे संगीत-दिग्दर्शक याशिवाय उमेदीच्या काळात मराठी भावगीते देखील रामभाऊंनी गायली होती.
रामभाऊंच्या गायनाच्या अनेक ध्वनिमुद्रिका प्रसिद्ध आहेत. एच.एम.व्ही. (हीज मास्टर्स व्हॉईस) कंपनीने त्यांनी गायलेल्या देस, अडाणा, भीमपलास आणि सूरमल्हार या रागांच्या गायनाच्या ध्वनिमुद्रिका प्रकाशित केल्या आहेत. संगीतकार स्नेहल भाटकर यांचे संगीत असलेली त्यांच्या भावगीत गायनाची ध्वनीमुद्रिका काढण्यात आली (१९५३). बालगंधर्व गायकीचे यथार्थ दर्शन घडविणाऱ्या त्यांच्या काही ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाल्या आहेत (१९५५). त्यांत देवा धरिले चरण, नुरले मानस उदास ही गीते आहेत. याशिवाय विविध रागांत त्यांनी सुमारे पन्नास बंदिशी बांधल्या होत्या. त्यांनी आकाशवाणीवर सातत्याने शास्त्रीय व नाट्यसंगीताचे विविध कार्यक्रम केले (१९५५ ते १९८०). ते आकाशवाणीवरील ‘अ’उच्च श्रेणीचे (A TOP+) कलाकार होते. त्यांची नवी दिल्ली, आकाशवाणीवर हिंदुस्थानी संगीताच्या ऑडिशन बोर्ड समितीवर (श्रुतिमंडळावर) नियुक्ती करण्यात आली होती. याशिवाय ते नागपूर व अन्य काही विद्यापीठांच्या संगीतविषय सल्लागार मंडळावरही होते.
रामभाऊंना अनेक मानसन्मान लाभले. त्यांमध्ये संगीत भूषण पुरस्कार (१९५१), बालगंधर्व सुवर्णपदक (१९७४), संगीत चुडामणी – जगद्गुरु शंकराचार्य (संकेश्वर करवीर यांच्या हस्ते – १९८०), रामकृष्ण बुवा वझे पुरस्कार (१९८६), संगीत नाटक अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार (१९८७), नाट्याचार्य विष्णुदास भावे पुरस्कार (१९८७), ठाणे भूषण पुरस्कार (१९८७) इत्यादींचा समावेश आहे.
रामभाऊंनी त्यांच्या संगीत कारकीर्दीत अनेक विद्यार्थ्यांना विनामूल्य विद्यादानाचे कार्य केले (१९६५-८९). त्यांच्या शिष्यवर्गात उल्हास कशाळकर, विश्वनाथ बागुल, योगिनी जोगळेकर, मधुवंती दांडेकर रामप्रथम, राम नेने, सुधीर देवधर, निवृत्ती चौधरी, योगिनी जोगळेकर, शशी ओक, सुरेश डेग्वेकर, प्रदीप नाटेकर, सुधीर दातार, राजेंद्र मणेरीकर इत्यादींचा समावेश होतो. त्यांच्या संगीताचा वारसा त्यांचे दोन सुपुत्र संजय व मुकुंद हे आणि सुशीला मराठे-ओक व वीणा मराठे-नाटेकर या दोन कन्या व नातवंडे पुढे चालवीत आहेत. ठाणे मनपा माजी खासदार कै प्रकाश परांजपे ह्यांच्या पुढाकाराने १९९२ पासून पंडितजी स्मरणार्थ ४ ते ५ दिवसांचा संगीत महोत्सव आयोजित करते. शिवाय नादब्रह्म – मुकुंद मराठे ह्यांच्या वतीने अनेक शास्त्रीय, नाट्य संगीत इ संशोधनपर सांगीतिक कार्यक्रमाचे सातत्याने आयोजन केले जाते २०१७ मध्ये पं. राम मराठे यांचं ‘नादब्रह्म स्वरयोगी’ हे ६०० पानी समग्र चरित्र २ DVD सह प्रसिद्ध झाले आहे. वाचकांचा ह्याला उदंड प्रतिसाद आहे.
राम मराठे यांचे निधन ४ ऑक्टोबर १९८९ रोजी झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply