मला तर नेहमी वाटत आले आहे, जगावे ते पु. ल. कडून व्यक्तिचित्र लिहून घेण्यासाठी व मरावे ते अत्रेंकडून मृत्युलेख लिहून घेण्यासाठी. पु. ल. नी अनेक व्यक्तिचित्र लिहिली. काही खरी, तर काही अर्धकाल्पनिक. पु. ल. संपर्कातल्या लोकांकडे अतिशय डोळसपणे पाहत असत. आणि त्या व्यक्तीला टीपकागदासारखे टिपत असत.
गणगोत म्हणजे विविध व्यक्तिमत्वाची मांदियाळी. त्यातील सगळ्यांचा परामर्श घेणे शक्य नाही. आजोबा म्हणजेच “ऋग्वेदी” हे पु. ल. चे लौकिकअर्थाने गुरु, त्यांचा उत्कृष्ठ वक्तृत्वचा गुण पु. ल. नी नकळत आत्मसात केला. चिंतामणराव कोल्हटकरांकडे नाटक कंपनीत दाखल झाल्यावर कोल्हटकरांनी त्यांना मुलाचे प्रेम दिले. त्यांच्याकडून शब्दफेक शिकले. पु. ल.म्हणतात “कोल्हटकरांनी अपार सुखदुखाचे हिंदोळे पाहिले आप्तस्वकीयापसून परागंदा व्हावे लागले पण कोणापुढे मान तुकवली नाही.” बाबासाहेब पुरंदऱ्यांच्या प्रथम दर्शनात लेंगा सदरा घातलेला पाहून ते इतिहासकार वाटणे काहीसे जड गेले. त्यांचे इतिहासात रमणे पाहून पु. ल. नी “हरीतात्या” रंगवला.
संगीत हे पु. ल.चे पहिले प्रेम, विनोद,लेखन हे नंतर, हे खुद्द पु. ल. नी मान्य केले आहे , त्यामुळे हिराबाई बडोदेकर हे सोज्वळ व्यक्तिमत्व त्यांच्या लेखणीतून सुटणे शक्य नव्हते. बायकांच्या मैफिलीला मानाचे स्थान सर्वप्रथम दिले ते हिराबाईनी. हिराबाईंच्या गाण्यासाठी पु. ल. हिंडले. आपल्या श्रुती हिराबाईंच्या गाण्याने तृप्त केल्या. नारायण चे वर्णन तर इतके अचूक आहे की आपल्याला सुद्धा बऱ्याच लग्नात तो भेटतो. अंतु बर्वा तर रत्नागिरीच्या इरसाल चित्पावनाचा उत्तम नमूना आहे. भास्करबुवा बखले यांना नाटकासाठी चिजा मिळवताना कीती कष्ट घ्यावे लागले असतील याचे वर्णन त्यानी गुण गाईन आवडी या व्यक्ति चित्र लेखात केले आहे. गोव्याबाहेर राहूनही गोवा व कोंकणी भाषेवर निरामय प्रेम करणारे आणि दिल्लीत पंडित नेहरूंच्या भेटीत नेहरूनी “Poet quiet please” म्हटल्यावर संतापणारे बोरकर हे सुद्धा पु. ल. ना भावले. इरावती कर्वे यांच्यावर लिहिलेल्या व्यक्ति चित्रणात ते लिहितात अण्णा कर्वे यांना काय विरोधाला तोंड द्यावे लागले हे पाहता त्यांचे मूळचे आडनाव “कडवे” असावे पण ब्रिटीशांना ड चा उच्चार करता येत नसावा म्हणून त्यानी त्यांचे आडनाव कर्वे केले असावे.इरावती बाई त्या काळात नवऱ्याला एकेरी नावाने हाक मारत असत. पुण्यामध्ये त्याकाळी भरधाव वेगाने स्कूटर चलवणाऱ्या त्या बहुदा पहिल्या विदुषी असाव्यात.
स्वत:ला संगीत येत नसले तरी संगीताची उत्तम जाण व उत्तम कान असलेला अवलिया पु.ल. ना भेटला ते म्हणजे रामुभैय्या दाते.त्यांच उमदे व्यक्तिमत्व, मोठ्या सरकारी हुद्दयावर असलेले,तरीही बड्या गायकांच्या मैफिली रंगवणे, इन्दोरी मराठीत त्यांची तारीफ करणे,जमलेल्या संगळ्याना खिलाऊपिलाऊ घालणे आणि आपल्यात पु. ल. ना शरीक करून घेणे याने पु. ल. भारावले. त्यांच्या व्यक्तिमत्वाला समोर ठेऊन “ तुज आहे तुज पाशी” मधील “ काकाजी” रंगवला. बाय हि पु. ल यांची आजी. पु. ल. चे आजोळ कारवारी, त्यामुळे बायच्या बोलण्यात कारवारी असे. मराठी बोलल्या तरी कारवारी लहेजात बोलणे असे. यावरूनच त्यानी वाऱ्यावरची वरात मधील कडवेकर मामीना लहेजा दिला आहे. चित्रपटक्षेत्रात काम करताना अचानक भेटलेले दिलखुलास “ रावसाहेब” निर्मळ मनाचे, त्यांच्या शिव्या सकट ते पु. ल. ना भावले. त्यांची रिट्झ थिएटर मधील मैफिल, त्यांच भाऊक मन ,व पु. ल. बेळगाव सोडताना ओक्साबोक्शी लहान मुलासारखे रडणे,या सगळ्यानी पु. ल. ना भावुक केले.गणगोत ही खऱ्या अर्थाने पु. ल. ना भेटलेल्या व्यक्तिमत्वाचा आरसा आहे. तो पु. ल. नी वाचका समोर ठेवला.जो वाचकांना मनापासून इतका भावला की प्रत्येक वाचकाला वाटे हि माणसे आपल्याला भेटली तर काय बहार येईल.
आपल्या उपजत विनोदी बुद्धीच्या जोरावर पु. ल. नी इतके विनोदी लेखन केले आहे की ,माझे तर मत आहे की , या माणसाने लोकांच्या आयुष्यात किती आनंदाचे मळे फुलवले आहेत हे वाचकांना कळतेच पण दुखा:चे डोंगर कोसळलेल्या लोकाना जास्त कळते.
– रवीद्र वाळिंबे
Leave a Reply