काळ बदलला, तशी माणसंही बदलली. स्पर्धेच्या जगात पाश्चात्त्य संस्कृतीचे वारे वाहू लागले. माणसं इंग्रजाळलेली झाली. अमेरिकन संस्कृती झपाट्यानं रुजू लागली. गणेशोत्सवाचा मूळ उद्देश दूर झाला आणि उत्सवाचं एकंदर स्वरुपच पालटलं.
गणपतीच्या मिरवणुकीत चालणारे रोंबा, सोंबा, डिस्को नाच पाहून आणि प्रदुषणात भर घालणारी गाणी ऐकून ‘ पुलं ‘ गंभीर झाले. यावरची आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना ते एकदा गंमतीनं म्हणाले,’ आजकाल मला आपला गणपतीबाप्पा ‘ गणपतीपप्पा ‘ झाल्यासारखा वाटत आणीबाणीनंतरच्या निवडणुकांच्या प्रचारधुमाळीत तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी इंदिरा गांधींच्या वीस कलमी कार्यक्रमाची भगवद्गीतेशी तुलना केली होती. परंतु गीतेचे अध्याय अठरा असताना अशी तुलना मुख्यमंत्र्यांनी का केली असावी, असा प्रश्न पडल्याचं सांगून पु.ल. म्हणाले, ‘मी पुन्हा गीता उघडली. सुरुवातीलाच ‘ संजय उवाच ‘ असे शब्द आढळले आणि मग मला सगळा उलगडा झाला !’ पुलंनी जनता पक्षाच्या प्रचारसभेतून भाषण सुरू करताच ‘ त्यांना आत कंठ फुटला आहे ‘ असे उद्गार यशवंतराव चव्हाणांनी काढले होते.
त्याचा समाचार घेताना पु.ल. म्हणाले, ‘ गळा यांनीच दाबला आणि बोलू दिलं नाही, आणि आता म्हणतात, कंठ फुटला. ते असो, पण निदान मी गळ्यात पट्टा तरी घातलेला नाही !
एक गाजलेल्या संगीत नाटकात एक सुप्रसिद्ध गायक नट कित्येक वर्षं श्रीकृष्णाची भूमिका करत होता. खरं तर, उतारवयामुळं ती भूमिका त्याला शोभत नव्हती, तरीही त्याचं आपलं श्रीकृष्णाची भूमिका करणं सुरूच होतं.
प्रश्न होता, त्याला हे सांगायचं कुणी ?
एका रात्री त्या नाटकाचा प्रयोग होता. प्रयोगापूर्वीची नेहमीची गडबड सुरू होती. तो नट पीतांबर नेसून, रत्नजडित अलंकार लेवून आणि डोक्यावर मुकूट चढवून, श्रीकृष्णाच्या संपूर्ण पेहरावात हातावरचा शेला आणि सुटलेलं पोट सावरत रंगपटात उभा होता. तेवढ्यात पु.लं. आपल्या काही मित्रांबरोबर रंगपटांत आले. क्षणभर त्या सजलेल्या श्रीकृष्णाकडे पाहतच राहिले. कदाचित त्या नटाचं त्याच्या तारुण्यातील देखणं रुप त्यांच्या डोळ्यासमोर क्षणभर तरळलं असावं. पु.लं.च्या मित्रांना त्यांचं हे त्याला न ओळखण्यासारखं पाहणं थोडं नवलाईचं वाटलं. न राहवून त्यांनी विचारलं, ‘ हे काय, भाई, ह्यांना ओळखलं नाही का ? अहो, हे आपले… ‘पुलं त्यांना मध्येच थांबवत म्हणाले, ‘ अरे व्वा ! ओळखलं नाही, कसं म्हणता ? ह्यांना पाहूनच तर आज देवाला ‘ अवतार ‘ ध्यान का म्हणतात, ते समजल.
एकदा पुल कुटुंब आणि वसंतराव कुठल्याशा अभयारण्यात गेले होते बहुधा राधानगरी. तिथे त्यांच्या कारसमोर एक महाकाय आणि मस्तवाल रानरेडा आला आणि त्यांच्याकडे खुनशीपणे बघू लागला. तेव्हा वसंतराव म्हणाले भाई, आय थिकं ही इस गोइंग टु चार्ज. पुल त्यांना म्हणाले, रेड्याला कळू नये म्हणून इंग्लिशमधे बोलतोयस वाटतं? हे ऐकल्यावर त्या भीतीदायक प्रसंगातही जोरदार हशा पिकला.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
Leave a Reply