विद्या सकाळी उठली. श्वेताला उठवलं.श्वेता ९ वर्षांची तिची गोड मुलगी.श्वेता ब्रश करुन आंघोळीला गेली आणी विद्या किचनमधे आली तिचा डबा करायला.ओट्यावर पोळ्यांचा डबा दिसला आणी तिला आठवलं ,काल रात्री पोळ्या उरल्या आहेत. ती मनाशीच पुटपुटली “श्वेताला नको डब्यात शिळ्या पोळ्या.तिच्या शाळेतली ती मैत्रीण शिवानी सिंग .रोज काहीतरी छान डब्यात आणते.कधी छोले भटूरे कधी गाजर हलवा आणी काय अन् काय.”श्वेताचं हसं नको व्हायला पण दुसर्याच क्षणी तिने तो विचार झटकून टाकला.
विद्या एक मध्यमवर्गीय कुटुंबातील गृहिणी.नवर्याच्या पगारात काटकसरीने घर चालवायचे तर तिने असा विचार करुन चालणार नव्हते.
तिने लगेच थोडी पोळी कुस्करली.कढईत थोडे तूप टाकले आणी पोळीचा कुस्करा टाकला.जरासा भाजून थोडी साखर घालून परत भाजला छान आणी डब्यात भरला.मग लगेच मुलीचे आवरून दिले.श्वेता शाळेत गेली तशी ती तिची इतर कामात व्यग्र झाली.
दुपारी श्वेता घरी आली आणी बूट काढता काढता म्हणाली “आई आज काय गंमत झाली सांगू ?अगं आज शिवानी ने माझ्या डब्यातले दोन घास जास्तच खाल्ले.मला म्हणाली कि पुडिंग किती छान झालयं !मस्त.”श्वेताने आईच्या गळ्यात हात टाकले आणी तिला बिलगली.विद्याने तिचा पापा घेतला.मुलीचे बोलणे ऐकून व तिच्या चेहर्यावरचा आनंद पाहून विद्याचे तोंड गोड झाले होते.
सौ. गौरी चिंतामणी काळे
Leave a Reply