वर्षानुवर्षे आम्ही संघर्षच करतोय
पुढाऱ्याच्या शब्दावर विश्वास ठेवतोय —-
उद्योग धंद्यावर मंदीचे सावट
आहे त्याच रोजगारात घट
हाताला काम नाही
बेकारांचा आकडा फुगतोय
वास्तवाचं भान हरवलेला तरुण
आजही उद्याच्या आश्वासनांना भूलतोय
दोन कोटी रोजगाराचा शब्द
मेघा भरतीवर टळतोय ——–
दुनियेचा पोशिंदा
मुठीने पेरून रास उभारतो
विस्कटता पुन्हा सावरतो
भाव मिळेल औन्दा
सोन्याचं पीक कवडीमोल विकतोय
आजही उद्याच्या आश्वासनांना भूलतोय
हमीभावाचा शब्द
कर्जमाफीवर टळतोय ——-
जातीधर्माचा नामानिराळा
सारेच एकीने वसती
इतिहास आहे साक्षी
सारेच इमान मातीशी राखती
सर्व धर्म समभावाचा मानस
आजही उद्याच्या आश्वासनांना भूलतोय
साऱ्यांच्या विकासाचा शब्द
आरक्षणावर टळतोय ——-
लिंक रोड समृद्धी महामार्ग
मेट्रोचा गवगवा
डोईवर घागर घशाला कोरड
भर पावसाळ्यातही तहानलेला
थेंबा थेंबा साठी आरड
टँकरची वाट पाहणारा
आजही उद्याच्या आश्वासनांना भूलतोय
जलयुक्त शिवाराचा शब्द
दुष्काळावर टळतोय ——–
कर्ज बुडव्यांना पळवाट
जगाच्या पाठीवर कुठेही वहिवाट
गरिबास आट
नुसत्या जाहिरातीचा घाट
भांडवलासाठी कौशल्य झिजवतोय
आजही उद्याच्या आश्वासनांना भूलतोय
पंधरा लाखाचा शब्द
चुनावी जुमला म्हणून टळतोय ——
वासनांध भर दिवसा
देहाची लक्तरे ओरबाडतो
फाशीची शिक्षा होणाराही
दिरंगाईमुळे सुटतो
न्याया पुढे नथमस्तक देह
आजही उद्याच्या आश्वासनांना भूलतोय
सुरक्षतेचा शब्द
चौकीदारावर टळतोय ——–
सळसळत्या रक्ताला
शिवरायांचे वरदान
जन्म महाराष्ट्राच्या मातीतला
जगण्याचा अभिमान
सागरी तटही आसलावूनी
आजही उद्याच्या आश्वासनांना भूलतोय
शिव स्मारकाचा शब्द
आराखड्यावर टळतोय ———
— असलम अंबर शेख
Leave a Reply