नवीन लेखन...

पुलंचे मानसपुत्र

पुलंच्या नंतर काही वर्षांतच त्यांचे सगळे मानसपुत्रही इहलोक सोडून परलोकवासी झाले.
परवाच पुलंच्या एकशे तिनव्या जयंतीनिमित्त त्यांचे सगळ्यांचे नातू शिल्लक मुलं पणतू सगळ्यांनी एकत्र गेट टुगेदर केलं होतं. त्याला जीटूजी का कायसे नांव दिले होते.
आचार्य बाबा बर्वेंच्या नातवाने सुरेंद्रकुमारने सगळी व्यवस्था केली होती, बाबा त्याला सत्यकाम जाबाल नांवाने हाक मारायचे, त्याचा आता पूज्य श्रीश्री सुरेंद्रजबाल महाराज झाला आहे.
साधन सूचितेचा आणि साधेपणाचा मार्ग त्याने बाबांच्या पश्चात सोडूनच दिला होता, आता तो फार मोठा मॅनेजमेंट गुरू झाला आहे.
पँटीचे हँगर्स आणि फेल्ट हॅट त्रिलोकेकरांच्या बरोबरच कॅफिन मध्ये गाडलं गेलं, त्यांच्या मुलाने बजाज इन्स्टिट्यूट मधून चांगलं एमबीए करून तो मोठ्या कंपनीत चांगल्या हुद्द्यावरून रिटायर झाला, त्याचा मुलगा संतोष अमेरिकेत शिकून आता तिकडेच स्थायिक झाला आहे.
सोमण मास्तर आणि बाबूकाका खऱ्यांच्या मुलींना त्यांनी भ्रमण मंडळाच्या पुणे ट्रिप नंतर लगेचच उजवले.
खऱ्यांची शांता पुण्यात दिली तर सोमणांची यमी डोंबिवलीत दिली.
यमीचे शुद्धलेखन जरी चुकले तरी तिने संसार मात्र अगदी सात्विकपणे केला, तिची मुलं चांगली इंजिनियर होऊन दिल्लीला नोकरीला होती, त्यांची मुलं आता आयआयटीच्या वर्गात शिकत आहेत.
खऱ्यांची शांता तिचं झालेलं प्रेम विसरून गेली, आता तिची नातवंडं चांगली गव्हर्नमेंट मध्ये ऑफिसर झाली आहेत.
म्हशीला धडकलेल्या एसटीतला मधु मलुष्टे सुद्धा आला होता, त्याच्या नशिबात डोळ्यांची पिटपिट करणारी सुबक ठेंगणी मात्र नव्हती.
रत्नांगिरीच्या राजीवड्या वरचा उस्मानशेठ कधीच वारला, त्याची मुलं आता त्याचा धंदा पुढे चालवतात, तेही सगळे कौतुकाने बटाट्याच्या चाळीतल्या नवीन बिल्डिंगमध्ये पुलोत्सव साजरा करायला आले होते.
दादासाहेब भोसलेंना तीन मुलं, एकाला सहकार दिला, एकाला मतदारसंघ दिला आणि एकाला शेती दिली.
तिघांचेही उत्तम चालले आहे, त्यांनी आता खादी सोडून रेशमी वस्त्रे परिधान केली आहेत. एकाने कमळाचे उपरणे घातले आहे तर एकाने धनुष्याचे आणि एकाने घड्याळाचे घेतले आहे, कुणाचेही राज्य आले आणि कुठेही आले तरी यांच्या घरातली सत्ता मावळत नाही.
बटाट्याच्या चाळीच्या जागी कधीच मोठी इमारत उभी राहिली, जुन्या ओळखींपैकी सगळेजण ओळखतात असे फक्त पुलंच आहेत.
दादा सांडगेंचे वंशज सुद्धा आठवणीने आले होते, आता रेराच्या नियमानुसार निम्मी गच्ची सगळ्यांसाठी कॉमन ठेवली आहे, असे ते आवर्जून सांगत होते.
सगळ्यांच्या स्वागताचा आणि ओळखीचा कार्यक्रम आटोपतच आला होता, एवढ्यात शंकऱ्या आणि शरी त्यांचा त्यांचा कुटुंबकबिला घेऊन आले, शंकऱ्याची चांगली मर्सिडीज होती तर शरीची लँड रोव्हर होती, पोरांनी जीपीएस लावल्याने त्यांना पत्ता सापडायला फारसं जड गेलं नाही.
बेंबट्या रिटायर झाल्या झाल्या त्यांनी गिरगावातली चाळ सोडली, त्याचे पैसे आले ते आणि बेंबट्याचे रिटायरमेंटचे पैसे घेऊन डोंबिलीत फ्लॅट घेतला.
शंकऱ्या पहिल्यापासूनच फार उपद्व्यापी होता, त्याने घरावर कर्ज काढून धंदा उभा केला, त्यात त्याने चांगलाच प्रॉफिट कमावला, पुढे शरीच्या नवऱ्याला पण पार्टनर करून घेतलं, आता दोघे मिळून मस्त चाललं आहे.
बेंबट्या गेला, त्याचे विधी त्याच्या इच्छेनुसार कोकणात केले, सगळं गांव बोलावलं होतं शंकऱ्याने जेवायला, बापाला आवडतात म्हणून पुरणपोळी केली होती. सगळ्या गावाने खास अनुनासिक स्वरात म्हटले होते, बेंबट्याचे पोर एवढे कर्तृत्ववान निपजेल असे वाटले नव्हते हो!!
बेंबट्याची बायको गेली, गोठोस्कर दादा गेले, रघुवीर कुमार गेले.
तिकडच्या कोपऱ्यात सदू आणि दादू हातात काठी घेऊन बसले होते.
काकाजी आचार्य उषा गीता श्याम आणि डॉक्टर मात्र अगदी पहिल्या रांगेत होते.
मला खरेतर आश्चर्याचा धक्काच बसला होता. कार्यक्रमात नाट्यमयता हवी म्हणून श्रीश्री सुरेंद्र जाबालांनी त्यांच्या वेषात कलावंत बसवले होते.
गीता आणि श्यामची आणि उषा आणि रमेशची आता वयस्कर झालेली मुलं कार्यक्रमाला आवर्जून आली होती.
त्यांच्याच शेजारी प्रोफेसर आणि फुलराणीची नातवंडं बसली होती.
साक्षात सरस्वतीने आणि रंगशारदेने त्यांच्या सगळ्यांवर अमृत वर्षाव केला.
आमच्या पूर्वजांना आम्ही खुशाल असल्याचा निरोप देण्याची विनंती त्यांनी सर्वांनी पुलंकडे केली.
एका डोळ्यात हसू आणि एका डोळ्यात अश्रू घेऊन सर्वजण आपल्या घरी उच्चतम स्मृती घेऊन गेली.
— विनय भालेराव
आम्ही साहित्यिक फेसबुक ग्रुपचे सभासद

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..