नवीन लेखन...

पुनर्बालपण

मी ७१ , बहीण ८६ वर्षे. ती अजूनही छान खुटखुटीत . भावंडांच्यात शेंडेफळ असलेला मी , हीच्या लग्नात शाळेत जाण्याच्या वयाचाही नव्हतो. लहानपणी माझं सगळं तीच करायची असं आई म्हणत असे. ती तर म्हणतेच.आईची जरा जास्त लाडकी . आईचं कोणाच्याही गोरेपणाचं वर्णन हीच्या गोरेपणाशी तुलनात्मक असे. दीड वर्षापूर्वी यजमान स्वर्गवासी झाल्या पासून ती एकटीच राहते.

मध्यंतरी आठ दहा दिवस माझ्याकडे रहायला आली होती. मी बाजारात निघालो तर म्हणाली , ” मी येते ” . म्हटलं, चल. कोथिंबिरीच्या एका चांगल्या जुडीसाठी तिन ठिकाणी मला फिरवत आणि तागडीतील प्रत्येक लहान वांगसुद्धा दाबून , गोल फिरवत पाहून तपासून घेणाऱ्या तिने बाजाराला दीडपट वेळ लावला . वर , घरी आल्यावर बायकोला ” अजितला अजूनही बाजारहाट काडीचा जमत नाही “, हेही सांगून टाकलं. मात्र ही आली की माझी खाण्याची चंगळ असते . अगदी नाचणीच्या सत्वा पासून आम्हा कायस्थांच्या घरी ” दाट्याला ” ( हरीतालीका दिनाच्या आधल्या दिवशी ) करण्यात येणाऱ्या ” निनावं ” या बेसनाच्या केक सदृश्य गोड प्रकारा पर्यंत आणि तिची speciality असलेल्या बेसनाच्या , रव्याच्या लाडवांपर्यंत. हे करू की ते करून खायला घालू ! असं सतत चालू असतं. बरं , स्वयंपाकघरात असताना तिला कोणाचीही लुडबुड चालत नाही . ” तिकडे जा , माझा पदार्थ बिघडवाल ” , असं सरळ सांगते. तीळाचे लाडू करावे तर तिनेच. तिच्या घराच्या आसपासच्या मार्गाने मी जाणार आहे इतकं तिला कळण्याची खोटी , एक दोन पदार्थांचे डबे भरून तयार करून ठेवते आणि सारखे फोन चालू . बरं , घ्यायला घरात जावं आणि घाईत आहे असं सांगितलं की , ” नेहेमी कसला रे घोड्यावरून येतोस ? तुझी गाडी वाजली आणि हे अमुक गरम करत ठेवलय . दोन मिंट टेक. खाऊनच जा गरम गरम “. असं डबे भरता भरता सांगेल. माझ्याकडे आली की मला अजूनही सांभाळून रहायला लागतं. जेवल्यावर काही गोड तोंडात टाकावसं वाटलं आणि फ्रीज उघडला की ही तिकडून ” अरे आत्ता नाही हातावर पाणी पडलं तर लगेच तोंड कसलं चाळवतोस ? यानेच तू सुटत चालला आहेस हल्ली ” अशी ओरडेल . काय हिम्मत आहे माझी लगेच काही खाण्याची ! लांबून ड्राईव्ह करून संध्याकाळी घरी आल्यावर जरा अंग टाकावं तर , ” तिन्हीसांजेचा लोळत पडू नको . उठ बघू ! ” असा दम मिळतो. माझी मुलं मस्त हसतात. फटकळ असली तरी माहेरच्या सासरच्या सगळ्या भाचे कंपनीचं पहिल्यापासून मायेने करणारी म्हणून सगळ्यांची अतिशय लाडकी. आमच्याकडील कोणत्याही कौटुंबिक समारंभाला जाताना तिला तिच्या घरून कोण पिक अप करणार , कोण परत घरी सोडणार याबद्दल त्यांच्यात तिच्या अपरोक्ष आधीच फोनाफोनी झालेली असते. स्मरणशक्ती तल्लख असल्याने पूर्वी कधी बोललेल्या आणि आपण विसरूनही गेलेल्या संदर्भाविषयी हीच्याकडून पटकन काय पृच्छा होईल , नेम नसतो. अगदी परवाच्याच एका समारंभात तिने अचानक असाच एक प्रश्न विचारला . मला संदर्भ पटकन आठवला नाही. त्यावरून तिने ” अजित खरोखरच म्हातारा झाला ” असे प्रमाणपत्र जाहीरपणे देऊन टाकले. अशा ताया बऱ्याच घरी असतात . त्यांच्या वडिलकीच्या हक्कानेच आपलं बालपण परत येतं हे मात्र खरं.

अजित देशमुख (नि)
अप्पर पोलीस उपायुक्त.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..