संघर्षाची बिजें जळतील, जाणतां तत्व पुनर्जन्माचे ।
आपसांमधील हेवे-दावे, मिटून जातील कायमचे ।। १
फिरत असते चक्र भोवती, स्वार्थीपणाचे भाव आणिते ।
त्यांनाच मिळावे सारे काही, जाणता स्वरक्ताचे नाते ।।२
उगम झाला जाती धर्माचा, स्वार्थीपणाच्या याच कल्पनी ।
वाटीत सुटतो प्रेम तयांना, केवळ सारे आपले समजूनी ।।३
कन्या जेव्हां सासरीं जाते, नाती-गोती नवीन बनती ।
वाटत होते परकीय जे, आज आपले होवून जाती ।।४
आपलेपणाच्या भावामध्ये, दडले असते प्रेम सारे ।
शत्रू देखील तुमचे होतील, समजूनी येता नाते खरे ।।५
भाऊ बहीण, मामा, चुलते, दूरवरची आप्त मंडळी ।
बंधन ते पडून प्रेमाचे, बांधली जाती एकत्र सगळी ।।६
कुणास कळले याचक्षणी, परका कुणीतरी दुरीचा ।
नात्यामध्ये नजीक असूनी, ऋणानूबंध तो पूर्वीचा ।।७
ओढला जाईल आत्मीयतेने, अज्ञानाचा पडदा उठता ।
पूर्वजन्मीचे ज्ञान शिकविल, आपापसातील मानवता ।।८
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply