नवीन लेखन...

पुनर्प्राप्त सभ्यता (संक्षिप्त रूपांतरीत कथा २८)

जिवा कापरे तुरूंगाच्या बुट बनवण्याच्या भागांत काम करण्यांत गुंग होता.
एवढ्यांत तुरूंगाचा एक अधिकारी त्याच्याकडे आला व त्याने त्याला एक महत्त्वाचा कागद दिला.
जिवाची तुरूंगातून सुटका झाल्याचा हुकुम होता तो.
जिवाने तो कागद फार उत्सुकता किंवा आनंद न दाखवतां घेतला.
त्याला चार वर्षांची सजा झाली होती.
तो आतापर्यंत दहा महिने राहीला होता.
आपण तीन महिन्यातच सुटू अशी त्याची अपेक्षा होती.
त्याचे बाहेर अनेक मित्र होते.
इतके मित्र असणारा तुरूंगात जास्त काळ रहात नाही.
मुख्य तुरूंगाधिकारी जिवाला म्हणाला, “जिवा, तू उद्या बाहेर जाशील.
ही तुला सुधारण्याची संधी आहे.
तू तसा मनाने वाईट माणूस नाहीस.
सांभाळ स्वत:ला !
तिजोऱ्या फोडणे थांबव.”
जिवा आश्चर्य दाखवत म्हणाला,
“मी ? मी आयुष्यात कधी तिजोरीला हात नाही लावलेला.”
मुख्य तुरूंगाधिकारी हंसला आणि म्हणाला, “कधीच नाही !
आपण पाहूया तुला इथे कां पाठवलं ते !
तू नाशिकला तिजोरी फोडल्याबद्दल तुला इथे पाठवण्यात आलंय !
तो तू नव्हतास कां ?
की तू त्यावेळी खरोखरी कुठे होतास हे पोलिसांना सांगायचं नव्हतं तुला ?
कदाचित त्यावेळी तू एखाद्या स्त्रीबरोबर होतास आणि तिचं नाव सांगायचं नव्हतं तुला ?
की न्यायमूर्तींना तू आवडला नाहीस ?
तुझ्याकडे खरं कारण असेलच !
तू कांही तिजोरी फोडण्याच्या गुन्ह्यामुळे इथे आलेला नाहीस ना !”
“मी ?” जिवा पुन्हा आश्चर्य व्यक्त करत म्हणाला,
“मी नाशिकला कधी गेलेलोच नाही.”
मुख्य तुरूंगाधिकारी वैतागत म्हणाला, “ह्याला घेऊन जा रे !
त्याला बाहेर गेल्यावर घालायचे कपडे द्या आणि सकाळी परत आणा.
जिवा कापरे, मी सांगितलं त्यावर विचार कर.
सकाळी सव्वासातला पुन्हा त्याला तिथे आणला, तेव्हां त्याने नवे कपडे घातले होते.
ते त्याला खूप आंखूड होते आणि पायांत घालायला दिलेल्या चपला चावत होत्या.
नंतर त्याला जवळच्या स्टेशनपर्यंत जायचा खर्च आणि शंभर रूपये वर देण्यात आले.
शंभर रूपये ही त्याला सुधारायला मदत होती.
मुख्य तुरूंगाधिकाऱ्यांनी त्याला हात जोडून निरोप दिला.
अशा प्रकारे जिवा कापरे कैदी क्रमांक ७६२चे अस्तित्व संपले.
तो स्वच्छ सूर्यप्रकाशात फिरायला मोकळा झाला.
तो पक्ष्यांची गाणी ऐकत बसला नाही की झाडे, फुले पहात बसला नाही.
तो सरळ एका हॉटेलात गेला.
तिथे त्याने स्वातंत्र्याचा आनंद प्रथम उपभोगला.
मस्त जेवण केलं.
मग तो स्टेशनवर गेला.
तिथे भीक मागणाऱ्या आंधळ्याला दहाची एक नोट दिली.
मग तो एका पॅसेंजर ट्रेनमधे बसला.
तीन तासांनी तो एका लहान गांवात उतरला.
तिथल्या शंकरच्या हॉटेलात गेला.
शंकर तिथे एकटाच होता.
त्याने जिवाचं स्वागत केलं.
तो म्हणाला, “जिवा, माफ कर.
आम्ही तुला लौकर सोडवू शकलो नाही.
पण त्या नाशिकच्या तिजोरीचा प्रश्न होताच.
काम सोपं नव्हतं.
तू ठीक आहेस ना ?”
जिवा म्हणाला, “मी ठीक आहे.
माझी खोली तयार असेल ना !”
हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर मागे असलेल्या खोलीच दार जिवाने उघडलं.
सर्व जसंच्या तसं होतं.
तुरूंगात जाण्याआधी ह्याच खोलीत त्याला अटक झाली होती.
दरवाजाला पोलिसाच्या गणवेशाचा तुकडा अजूनही अडकलेला होता.
जिवाने पळायचा प्रयत्न केला, तेव्हा झालेल्या झटापटीत पोलिसाच्या बाहीचा तुकडा निघाला होता.
भिंतीशी एक पलंग होता.
जिवाने तो अलिकडे सरकवला.
ती भिंत सर्वसाधारण भिंतीसारखीच दिसत होती.
पण जिवाने हाताने चाचपून त्या भिंतीतला एक छोटा दरवाजा उघडला.
त्यांतून त्याने धुळीने भरलेली एक बॅग काढली.
त्याने बॅग उघडली व मायेने आतील तिजोरी फोडण्याच्या हत्त्यारांवरून नजर फिरवली.
ह्यापेक्षा नीटस साधने तयार करणेच शक्य नव्हतं.
त्यात सर्व काही होतं.
जगातली कुठलीही तिजोरी तो त्यांच्या सहाय्याने फोडू शकत होता.
त्याने स्वतः ती वेगवेगळ्या आकाराची साधने डिझाईन केली होती.
त्याला त्याचा अभिमान होता.
त्याने तिजोरी फोडण्याची साधने जिथे बनवली जात त्याच्याकडून ती खास बनवून घेतली होती.
अर्ध्या तासाने छानसे कपडे घातलेला जिवा बॅग हातात घेऊन खाली आला.
शंकरने विचारलं, “तू कांही बेत केलायसं काय?”
जिवा आश्चर्य व्यक्त करत म्हणाला, “मी ? मला कळत नाही.
मी तर मुंबईच्या ब्रेड आणि केक बनवणाऱ्या कंपनीचा प्रतिनिधी आहे.”
शंकरला हा विनोद फारच आवडला व त्याने एक वाईन ग्लास घेऊन तो साजरा केला.
जिवा मद्य पीत नसे.
त्याने अर्धा ग्लास दूध घेतले.
जिवा ७६२ तुरूंगातून सुटल्यावर दहिसर येथे एक तिजोरी फोडली गेली.
८०,००० रूपयांची चोरी झाली.
कोणी हे काम केलं त्याचा ठाव लागला नाही.
त्यानंतर दोन आठवड्यांनी ठाण्याला एक तिजोरी उघडली गेली.
ती नवीन बनवलेली तिजोरी होती आणि ती तयार करणाऱ्या कंपनीने दावा केला होता की ही तिजोरी कोणीही उघडू शकणार नाही.
पण ती कुणीतरी उघडली होती आणि एक लाख पन्नास हजार रूपये चोरून नेले होते.
त्यानंतर तर पुण्यांत एक तिजोरी फोडण्यात आली व त्यातून पांच लाख रूपये नेले गेले.
हे नुकसान फारच मोठं होतं.
क्राईम ब्रँचचे इन्सपेक्टर बर्वे अशी महत्त्वाची कामे बघत.
उंच, धिप्पाड, वयस्क बर्वे नेहमी साध्या पोशाखात असत.
अनुभवी म्हणून हे कामही त्यांच्याकडे आलं.
इन्सपेक्टर बर्वेनी दहिसर, ठाणे आणि पुणे इथे फोडलेल्या तिन्ही तिजोऱ्या पाहिल्या.
अतिशय नीटनेटकं काम होतं.
कुठे कांही पडलेले नव्हतं.
तिजोऱ्यांवर जबरदस्ती झालीय असंही वाटत नव्हतं.
त्या सहजतेने उघडलेल्या दिसत होत्या.
ते बरोबरच्या माणसाला म्हणाले, “हे असं काम फक्त आणि फक्त जिवा कापरे करू शकतो.
तिजोरी सहज उघडतां येणारी साधने इतरांकडे नाहीत.
बहुदा तुरूंगातून सुटल्यावर तो परत कामाला लागलाय.
मला जिवा कापरे हवाय.
आता परत तो तुरूंगात जाईल तो आजन्म कारावासासाठीच.”
इन्सपेक्टर बर्वेंना जिवाची काम करण्याची पध्दत माहिती होती.
तो एके ठिकाणी तिजोरी फोडली की दुसरी लांबच्या गावी जाऊन फोडत असे.
तिथेच थांबत नसे.
तो नेहमी एकटाच काम करत असे.
तो काम झाले की तिथे व त्या शहरातही थांबत नसे.
तो जाईल तिथे चांगल्या लोकांत मिसळून जाई.
ह्या त्याच्या संवयीमुळे त्याला पकडणे कठीण होते.
ज्या श्रीमंतांकडे पैशांनी भरलेल्या तिजोऱ्या होत्या, त्यांना ही केस इन्सपेक्टर बर्वेंकडे देण्यात आली, हे ऐकून आनंद झाला.
एका दुपारी जिवा कापरे आपली बॅग घेऊन मोरबेवाडी नावाच्या एका लहान गावात आला.
एखाद्या महाविद्यालयीन तरूणासारखा वाटणारा जिवा मोठ्या रस्त्यावरून थेट तिथल्या हाॅटेलात गेला.
तो जात असतांना एक तरूणी त्याच्या समोर रस्ता ओलांडून एका छोट्या इमारतीतील समोरच्या दरवाजांतून आत गेली.
जिवाने त्या दरवाजावरील पाटी वाचली ‘मोरबेवाडी बँक’.
ती समोर असतांना जिवाने तिच्या नजरेला नजर भिडवली आणि त्याक्षणी तो दुसराच माणूस झाला.
त्या तरूणीने चटकन् नजर फिरवली पण तिचा चेहरा लज्जेने लाल झाला.
जिवासारखे तरूण त्या गांवात क्वचितच दिसत.
जिवाला बँकेच्या दाराजवळ एक मुलगा दिसला.
तो त्या मुलाला गांवाबद्दल माहिती विचारू लागला.
थोड्या वेळाने ती तरूणी बँकेतून बाहेर आली आणि आपल्या वाटेने निघून गेली.
जाताना तिने बहुदा जिवाला पाहिले नाही.
जिवाने मुलाला विचारले, “ही मुलगी सुमन कारेकर कां ?”
मुलगा म्हणाला, “नाही, ती मुलगी अवनी मयेकर.
तिचे वडिल ह्या बँकेचे मालक आहेत.”
जिवा एका हॉटेलात आला व तिथे अविनाश काटकर हे नाव नोंदवून त्याने खोली घेतली.
त्याने हॉटेल मॅनेजरला सांगितले की त्याला त्या गांवात कांही व्यवसाय करायची इच्छा आहे.
त्याने हेही विचारले की इथे बुटांचा धंदा चालेल कां ?
बुटाची आधीच किती दुकानं आहेत ?
हॉटेल मॅनेजरने जिवाचे कपडे पाहिले, त्याची बोलण्या-वागण्याची रीत पाहिली व त्याची खात्री पटली की हा माणूस सज्जन आणि लायक आहे.
तो त्याच्याशी मनमोकळेपणाने बोलू लागला.
तो म्हणाला, “खरंच ! ह्या गांवाला बुटांच्या चांगल्या दुकानाची गरज आहे.
फक्त बूटांचं असं दुकान तिथे नाही.
मोठ्या दुकानांतच थोडेसे बूट ठेवलेले असतात.”
त्याने इच्छा व्यक्त केली की अविनाश काटकर (जिवा) याने त्या गांवात राहावं.
हे गांव छान होतं आणि लोकही मिळून मिसळून रहाणारे होते.
अविनाश म्हणाला की तो कांही दिवस गांवात राहून गांवाविषयी थोडी अधिक माहिती करून घेणार आहे.
तो म्हणाला, “माझी बॅग मीच नेईन खोलींत.
मुलगा पाठवायची जरूरी नाही.
बॅग खूप जड आहे.”
अविनाश काटकर उर्फ जिवा मोरबेवाडीतच राहिला.
त्याने बुटांच दुकान सुरू केलं.
त्याचा धंदा चांगला चालला होता.
त्याने खूप मित्रही केले.
आणि त्याच्या मनांतली इच्छाही पूर्ण झाली.
अवनीची व त्याची ओळख झाली आणि ती वाढत गेली.
दिवसागणिक ती त्याला अधिक आवडू लागली.
एक वर्ष झालं तेव्हां मोरबेवाडीमधील प्रत्येक व्यक्ती अविनाशला ओळखत होती.
त्याचा बुटांचा व्यवसाय जोरात चालत होता.
त्याचा आणि अवनीचा विवाह केवळ दोन आठवड्यांवर आला होता.
गांवातील बँकेचे अध्यक्ष मयेकर यांना अविनाश खूप प्रिय होता.
अवनीला त्याचा अभिमान वाटत होता.
तो जणू मयेकर कुटुंबातलाच झाला होता.
एक दिवस आपल्या खोलीत बसून अविनाश उर्फ जिवाने आपल्या एका जुन्या मित्राला पत्र लिहिले.
मजकूर असा होता :
प्रिय मित्रा,
पुढच्या दहा तारखेला संध्याकाळी मला सुळेंच्या दुकानावर भेट.
मला माझी ? वापरातली साधने तुला द्यायची आहेत.
मला ठाऊक आहे की तू आनंदाने ती घेशील.
तुला अशी साधने कुठेही विकत मिळणार नाहीत.
तू जरी दहा हजार रूपये दिलेस तरी मिळणार नाहीत.
मी माझा पूर्वीचा धंदा गेल्या वर्षापासून बंद केला आहे.
माझं एक छान दुकान आहे.
माझं आयुष्यही पूर्वीपेक्षा चांगलं आहे.
दोन आठवड्यानी मी जगातल्या सर्वात चांगल्या मुलीबरोबर लग्न करणार आहे.
हेच खरं जीवन आहे.
मी पुन्हां कधी दुसऱ्याच्या पैशांना हातही लावणार नाही.
माझा विवाह झाला की मी आणखी आणखी पूर्वेकडे जाणार आहे, जिथे माझ्या पूर्वायुष्यांत मला ओळखणारा कुणीही भेटणार नाही.
खरं सांगू ती फार फार चांगली मुलगी आहे.
तिचा माझ्यावर विश्वास आहे.
तुझा जुना मित्र,
जिवा कापरे
अविनाश उर्फ जिवाने हे पत्र पाठवल्यानंतरच्या सोमवारी साध्या वेशांतले इन्स्पेक्टर बर्वे मोरबेवाडीत येऊन दाखल झाले.
त्यांच्या पध्दतीप्रमाणे ते शांतपणे गांवात फिरले आणि त्यांना हवी ती माहिती त्यांनी गोळा केली.
एका दुकानाबाहेर उभं राहून इन्सपेक्टर बर्वे रस्त्यावरून जाणाऱ्या अविनाशकडे पहात होते.
ते मनाशी म्हणाले, “तू बँकेच्या अध्यक्षांच्या मुलीशी लग्न करणार आहेस !
तू नक्कीच जिवा कापरे आहेस.
तुझ्या लग्नाची मला खात्री नाही वाटत.”
दुसऱ्या दिवशी सकाळी अविनाश अध्यक्षांच्या घरी गेला होता.
तो वर्षानंतर प्रथमच मोरबेवाडीच्या बाहेर जाणार होता.
त्याला जवळच्या शहरांतून लग्नासाठी नवे कपडे खरेदी करायचे होते.
तो अवनीसाठी भेटवस्तूही खरेदी करणार होता.
त्याने एखादी तिजोरी फोडल्याला एक वर्षाहून अधिक वेळ गेला होता.
अध्यक्ष मयेकरांचे सर्व कुटुंबच त्या दिवशी बँकेत जायला निघाले.
अध्यक्ष, अवनी, तिची लग्न झालेली मोठी बहीण व बहिणीच्या पांच व नऊ वर्षांच्या दोन मुली आणि अविनाश.
बँकेतूनच पुढे अविनाश शहरांत जाणार होता, म्हणून वाटेत तो आपल्या खोलीवर गेला व ती बॅग घेऊन आला.
मग ते सर्व बँकेकडे निघाले.
सगळेच बँकेत आत गेले, अविनाशसुध्दा.
तो आता कुटुंबाचाच भाग होता ना !
बँकेच्या स्टाफला अविनाशला पाहून आनंद झाला.
अध्यक्ष मयेकरांना किती छान जांवई मिळालाय, असं त्यांच आपसांत बोलणंही झालं.
अविनाशने आत आल्यावर आपली बॅग खाली ठेवली.
अवनीने ती बॅग उचलली पण परत खाली ठेवली.
ती म्हणाली, “अवि, किती जड बॅग आहे ही. आंत सोनं भरलंय की काय ?” असं म्हणत ती हंसली.
अविनाश म्हणाला, “दुकानांतल्या आता मला न लागणाऱ्या कांही वस्तू आहेत त्यांत.
मी त्या शहरांत नेऊन ज्याच्याकडून आणल्या त्याला परत देणार आहे.
स्वतःच घेऊन जाऊन पैसे वाचवतोय.
त्या पाठवायचा खर्च मी वाचवतोय.
आता माझा विवाह होणार आहे ना !
मी बचत केलीच पाहिजे.”
बँकेने नुकतीच नवी तिजोरी आणली होती.
अध्यक्षांना त्याबद्दल फार अभिमान होता.
त्यांना ती सर्वांना दाखवायची होती.
एखाद्या छोट्या खोलीसारखी ती मोठी होती.
तिला एक खास वेगळ्या प्रकारे बनवलेला दरवाजा होता.
त्या दारावर बसवलेल्या घड्याळाने तिजोरीच्या दाराचे नियंत्रण करता येत असे.
तिजोरी पुन्हां किती वाजता उघडायची हे त्या घड्याळाने आधी ठरवता येत असे.
मधल्या काळांत ती कोणालाही उघडतां येत नसे.
अगदी स्वतः अध्यक्ष सुध्दा मधेच उघडू शकत नसत.
त्यांनी हे सगळं अविनाशला समजावून सांगितलं.
अविनाशने त्यांच बोलणं लक्ष देऊन ऐकलं पण त्याला त्यांतल कांही समजत होतं, असं दिसलं नाही.
बहिणीची मुलं मात्र ती तिजोरी, ते दार, घड्याळ, इ. पाहून हरखून गेली होती.
ते असे गुंतलेले असतांना इन्सपेक्टर बर्वे बँकेमधे आले व त्यांनी सभोवार पाहिले.
त्यांच्या नजरेतून कांही सुटत नसे.
बँकेतल्या तरूण क्लार्कला ते म्हणाले, “मी कामासाठी नाही आलो.
इथे एक तरूण येणार आहे त्याला भेटायला आलोय.”
एवढ्यांत आतून अचानक बाईच्या किंचाळण्याचा आवाज आला.
मुलांकडे कोणाचच लक्ष नव्हतं.
पाच वर्षांची लहान मुलगी बेबी तिजोरीत शिरली होती आणि नऊ वर्षांच्या ताईने तिजोरीचे दार बाहेरून बंद केले होते.
अध्यक्षांनी दार ओढून पाहिलं पण ते घट्ट बंद झालं होतं.
थोडा वेळ दार ओढून पाहिल्यावर ते म्हणाले, “दार उघडत नाही.
मी तर दार उघडण्याची वेळही घड्याळावर लावलेली नाही.”
मुलींच्या आईने पुन्हा हंबरडा फोडला.
अध्यक्ष म्हणाले, “जरा शांत हो. मग त्यांनी आत अडकलेल्या बेबीला मोठ्या आवाजात हाक मारली.
“बेबी, मी सांगतो ते ऐक. घाबरू नकोस.”
बेबीचा अगदी पुसटसा आवाज उत्तरादाखल ऐकू आला.
अगदी अस्पष्ट.
आंतल्या काळोखात ती मुलगी घाबरली नसती तरच नवल.
बेबीची आई म्हणाली, “माझी बेबी भीतीनेच मरून जाईल.
कांही तरी करा.
तें दार फोडा.
तुम्ही पुरूष कांहीच करू शकत नाही ?”
अध्यक्ष म्हणाले, “ही तिजोरी उघडू शकेल असा माणूस जवळच्या शहरांतही नाही.
अरे देवा !
अविनाश, आंत पुरेशी हवा नाही.
बेबी हवे अभावी आणि भीतीनेच मरून जाईल.”
बेबीची आई, अवनीची मोठी बहीण, आता आपले हात दारावर आपटून रडू लागली.
अवनीने अविनाशकडे पाहिलं.
तिचे मोठे मोठे डोळे पाण्याने भरून आले होते.
त्या डोळ्यांत दुःख तर होतंच पण आपला प्रियकर कांहीतरी करेल अशी आशाही होती.
प्रेम करणाऱ्या मुलीला आपला प्रियकर खूप सामर्थ्यवान वाटत असतो.
ती म्हणाली, “अवि, तू कांही प्रयत्न करून बघ ना !”
अविनाशने तिच्याकडे कोमल नजरेने पाहिलं आणि त्याच्या डोळ्यात एक वेगळचं हास्य तरळलं.
तो अवनीला म्हणाला, “अवनी, तू माळलेलं गुलाबाचं फूल मला दे.”
अवनीला कळेना की खरंच त्याने अशी मागणी केली कीं नाही ?
परंतु तिने फूल काढून त्याच्या हातांत दिले.
अविनाशने ते आपल्याजवळ जपून ठेवले.
मग त्याने आपला कोट काढून ठेवला.
त्याच क्षणी तो परत जिवा कापरे झाला होता.
अविनाश संपला होता.
“सर्वांनी दारापासून दूर रहा.”
तो म्हणाला.
त्याने आपली बॅग उचलली आणि टेबलावर ठेवली.
ती उघडली व त्यांतली कांही साधने बाहेर काढली.
आपल्या अवतीभवती कोणी आहेत, हे तो विसरून गेला.
ती साधने त्याने टेबलावर ठेवली.
सर्व लोक दीङमूढ होऊन लांब उभे राहून त्याच्या हालचाली पहात होते.
जिवाने तिजोरीचा दरवाजा फोडण्याच्या कामाला सुरूवात केली.
दहाच मिनिटात, नेहमीपेक्षा कितीतरी कमी वेळांत त्याने तिजोरीचा दरवाजा उघडला.
आंतून बाहेर आलेल्या बेबीने आपल्या आईच्या कवेत झेप घेतली.
जिवाने आपला कोट चढवला.
फूल नीट कोटाला लावलं आणि तो तिथून निघाला.
त्याला मागून अवनीची हांक ऐकू आली, “अवि, अवि,”.
तिकडे दुर्लक्ष करून तो मुख्य दाराशी थांबलेल्या आणि त्याने आधीच पाहिलेल्या इन्सपेक्टर बर्वेंकडे आला व म्हणाला, “चला, इन्सपेक्टर बर्वेसाहेब, तुम्ही शेवटी इथे पोहोचलात, नाही कां ?
चला, आतां कशानेच फरक पडत नाही.
मला आता त्याची पर्वा नाही”
दाराशी उभं राहून ही सर्व घटना पहाणाऱ्या उंच धिप्पाड, वयस्क इन्सपेक्टर बर्वेंची प्रतिक्रिया मात्र अगदी विचित्रच होती.
त्यांनी जिवा कापरेला ओळखल्याचे चेहऱ्यावर दिसू दिले नाही.
क्लार्ककडे बोट दाखवत ते म्हणाले, “हे म्हणाले, तू अविनाश काटकर. होय ना !
काटकर, सभ्य गृहस्था, आपली पूर्वीची ओळख नाही.
तुझी नक्कीच कांहीतरी गल्लत होत आहे.”
असं म्हणून ते त्यांच्या नेहेमीच्या पध्दतीने सावकाश वळले.
त्यांचा हात कोटाच्या खिशांत जिवाने त्याच्या मित्राला लिहिलेल्या पत्रावर होता.
तो तसाच ठेवून ते हळूहळू चालत तिथून निघून गेले.
— अरविंद खानोलकर.
मूळ कथा – रिट्रीव्हड् रिफॉर्मेशन
मूळ लेखक – ओ. हेन्री

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..