पुण्याचे भूषण असलेली संगीत क्षेत्रातील एक पूज्य वास्तू पुणे भारत गायन समाज आज ११० व्या वर्षांत पदार्पण करीत आहे. देवगंधर्व पंडित भास्करबुवा बखले यांनी १९११ साली स्थापन केलेली ही वास्तू पुढे अनेक दिग्गज कलावंतांच्या पदस्पर्शाने पुनीत झाली आणि आजही होत आहे. भास्करबुवा बखले यांनी भारत गायन समाजाची स्थापना केली. तेव्हाचे संस्थेचे नाव होते ‘किर्लोस्कर भारत गायन समाज’.
१९४० मध्ये पुण्यातील पुणे गायन समाज ही जुनी संस्था आणि भारत गायन समाज यांचे एकत्रीकरण झाले. पुणे भारत गायन समाज असे संस्थेचे नामकरण रूढ झाले.
समाजाची स्थापना पुण्यातील सरदार नातू यांच्या वाडय़ामध्ये झाली. नटवर्य नानासाहेब जोगळेकर यांच्या प्रेरणेने ही संस्था सुरू झाली तेव्हा भास्करबुवा बखले आपली संगीत आराधना करीत होते. संस्था सुरू होऊन वर्ष होते न होते तोच या संस्थेची सारी जबाबदारी खुद्द बखलेबुवांवरच आली. रसिकांचे कान ‘घडणे’ ही फार महत्त्वाची बाब असते, याची जाणीव बखलेबुवांना होती. त्यामुळेच रसिकांना अनेक मान्यवर कलाकारांचे गाणे सहजपणे ऐकता येईल यासाठी या संस्थेचा उपयोग सुरू झाला. आपल्याला कलावंत म्हणून उभे राहण्यासाठी जे कष्ट उपसावे लागले ते पुढच्या पिढीला उपसायला लागू नयेत असा त्यांचा उदात्त हेतू होता. त्यामुळेच ही संस्था केवळ गायनाचे शिक्षण देणारी शैक्षणिक संस्था राहिली नाही तर, अभिजात संगीताचे ते खरेखुरे विद्यापीठ बनले. गाणे ऐकण्याची इच्छा असणाऱ्यांचे कान जसे तृप्त होत होते, तसेच गाणे शिकण्याची इच्छा असणाऱ्या कुणालाही येथे मनापासून शिकण्याची सोय होती. पुणे हे भारतातील एक महत्त्वाचे संगीत केंद्र बनण्यामध्ये जी अनेक कारणे घडली त्यापैकी भारत गायन समाजाची स्थापना हे एक प्रमुख कारण ठरले.
भारत गायन समाजाचे पहिले प्राचार्य असलेले भास्करबुवा दर गुरुवारी विद्यार्थ्यांसाठी रात्रभर गात असत. रसिकांना सुश्राव्य गायन ऐकण्याची संधी मिळावी या ध्येयाने भास्करबुवांनी विद्यार्थी घडविले. भास्करबुवांसह गोिवदराव टेंबे, उस्ताद रहिमत खाँ असे संगीत क्षेत्रातील दिग्गज सुरुवातीच्या काळात समाजाशी जोडले गेले. आधी किर्लोस्कर नाटय़गृहाच्या मागील इमारत, पुढे शुक्रवार पेठ येथील भूतकर वाडा, तुळशीबाग, शनिपार चौकातील बेंद्रे वाडा असे स्थलांतर होत होत संस्था १९३०मध्ये बाजीराव रस्त्यावरील सध्याच्या इमारतीमध्ये आली. शंकरबुवा अष्टेकर आणि दि. गो. दातार यांच्याकडे संस्थेची धुरा सोपवून भास्करबुवा मुंबईला गेले. मात्र, तरीसुद्धा मुद्दाम वेळ काढून ते पुण्याला येत आणि विद्यार्थ्यांना शिकवीत असत. समाजाच्या इमारत फंडासाठी १९२८ ते १९३१ या कालावधीत पाच जाहीर जलसे करण्यात आले. पुण्यातील किलरेस्कर थिएटर येथे पहिला जलसा झाला. या जलशांतून नटसम्राट बालगंधर्व, संगीत कलानिधी मास्टर कृष्णराव, गोिवदराव टेंबे यांचा प्रामुख्याने सहभाग होता. हे सर्व कलाकार आणि त्यामध्येही बालगंधर्व हे त्याकाळी लोकप्रियतेच्या शिखरावर असल्यामुळे खर्च वजा जाता या जलशांतून २ हजार ८७५ रुपये ही मदत मिळाली. साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांच्या अध्यक्षतेखाली १५ जानेवारी १९२८ रोजी समाजाचे संमेलन झाले. सदाशिवराव पिंपळखरे यांनी केलेल्या भास्कररावांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. गोिवदराव टेंबे यांचे संवादिनीवादन, थिरकवाँ यांचे तबलावादन आणि विलायत खाँ यांचे गायन असा कार्यक्रम झाला. थिरकवाँ आणि विलायत खाँ यांना मुंबईहून येण्या-जाण्याच्या खर्चाबद्दल २५ रुपये देण्यात आले होते.
एखाद्या क्लबाप्रमाणेच रूप असलेल्या समाजाला घटनात्मक स्वरूप देण्याचे प्रयत्न १९२८ मध्ये झाले. त्यानुसार सरदार आबासाहेब मुजुमदार हे संस्थेचे अध्यक्ष झाले. शनिपाराजवळील सरदार मुतालिक यांचे घर विकत घेण्याबाबतचा पत्रव्यवहार सुरू झाला. संस्थेजवळ स्वत:चा निधी चार हजारांपेक्षा अधिक नसल्याने १५ हजार रुपये किमतीच्या घराचा सौदा करणे धोक्याचे होते. परंतु जनतेची संस्थेविषयीची सहानुभूती, जलसे आणि नाटय़प्रयोग करून, देणग्या मिळवून कर्ज फेडता येईल अशा आत्मविश्वासाने हा व्यवहार ठरविण्यात आला. त्यावेळच्या मंडळींनी हिंमत करून मध्यवस्तीतील वास्तू खरेदी केली. म्हणूनच संस्थेस इमारत लाभली. या इमारतीचे मूळ मालक त्याकाळातील प्रसिद्ध वैद्य बाळशास्त्री माटे होते. अमेरिकेमध्ये एकटय़ाने जाऊन वैद्यक परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पहिल्या स्त्री डॉ. आनंदी गोपाळ जोशी या माटे यांच्या नात्यातीलच. त्यामुळे आनंदीबाई जोशी यांचे या इमारतीमध्ये वास्तव्य होते. क्षयरोग होऊन त्यांचे निधनही याच वास्तूमध्ये झाले.
१९४० मध्ये पुण्यातील पुणे गायन समाज ही जुनी संस्था आणि भारत गायन समाज यांचे एकत्रीकरण झाले. पुणे भारत गायन समाज असे संस्थेचे नामकरण रूढ झाले. मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर हे समाजाचे पहिले विद्यार्थी. त्यांना २० रुपये पोशाखासाठी बक्षीस दिल्याचा उल्लेख संस्थेच्या जमा-खर्चामध्ये आहे. समाजाचा प्रथम गायनाचा सहा वर्षांचा अभ्यासक्रम होता. तो पुढे मास्टर कृष्णरावांनी विचक्षण वृत्तीने विकसित करून दहा वर्षांचा केला. पदव्या तयार केल्या. या अभ्यासक्रमाला महाराष्ट्र सरकारची मान्यताही मिळाली. हा अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेल्यांना शाळांमध्ये संगीत शिक्षक म्हणून काम करण्यास पात्र ठरविले. हे समाजाचे योगदान म्हणावे लागेल. नाटय़ाचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर हे भास्करबुवांकडे रोज गायन शिकण्यासाठी दोन वर्षे येत होते, असा उल्लेखही आहे. भास्करबुवा यांच्या निधनानंतर दत्तोपंत बागलकोटकर, नरहरीबुवा पाटणकर, बापूराव केतकर, शंकरराव अष्टेकर, दिनकरराव दातार या शिष्यवर्गाने समाज टिकविला. भास्करबुवांच्या नावाने भास्कर संगीत विद्यालय ही शाखा समाजाच्या याच इमारतीमध्ये गेली अनेक वर्षे चालविली जात आहे. मास्टर कृष्णराव यांनी २२ वर्षे विद्यालयाचे अध्यक्षपद सांभाळले. संस्थेने २० वर्षे संगीत संशोधन मंडळ चालविले. संगीतविषयक महत्त्वाचे ग्रंथ प्रकाशित करण्यात आले. दुर्मीळ ध्वनिमुद्रिका संस्थेने जतन केल्या आहेत. काही काळ संस्थेने संगीतावरील नियतकालिक प्रसिद्ध केले.
भास्करबुवांचे नातू सुहास दातार आणि सुधीर दातार हे गेली काही वर्षे या संस्थेची धुरा वाहत आहेत. सुहास दातार यांचे वास्तव्य याच वास्तूमध्ये असून ते गेली सहा दशके संस्थेच्या कामामध्येच आहेत. सुधीर दातार आणि त्यांच्या पत्नी शैला दातार यांनी अनेक वर्षे संगीत शिक्षकाचे काम केले आहे. या संस्थेमध्ये गायनासह हार्मोनिअम, तबला, सतार, व्हायोलिन, पखवाज, गिटार या वाद्यवादनाचे त्याचप्रमाणे भरतनाटय़म आणि कथक हे नृत्यप्रकार शिकविले जातात. पुणे भारत गायन समाजाच्या कामकाजामध्ये भास्करबुवांची चौथी पिढी कार्यरत आहे. सौ.शैला दातार या पुणे भारत गायन समाजच्या अध्यक्षा आहेत. या संस्थे मार्फत संगीत प्रचार आणि प्रसाराचे काम गेली १०८ वर्ष अविरत पणे चालू आहे. पुणे भारत गायन समाजाच्या ९० व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी आणि ज्येष्ठ संगीतकार नौशाद हे तीन दिग्गज एका व्यासपीठावर आले होते. या संस्थेच्या भास्कर संगीत विद्यालयामध्ये गायन, तबला, सतार, हार्मोनियम, व्हायोलीन, कथ्थक, भरतनाट्यम इत्यादी कलाप्रकारांचे शात्रोक्त पद्धतीनी शिक्षण दिले जाते. यामध्ये मध्यमा, विशारद, पारंगत अशा १० वर्षाचा लिखित अभ्यासक्रमानुसार शिक्षण दिले जाते. संस्थेच्या अभ्यासक्रमाला १९६२ मध्ये राज्यसरकारने मान्यता दिलेली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक संगीत विद्यालये भास्कर संगीत विद्यालयाशी संलग्न आहेत. पुणे भारत गायन समाज संस्थेमध्ये विविध घराण्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बुजुर्ग कलाकारांच्या गायन आणि वादनकलेचे ग्रामोफोनच्या माध्यमातून जतन करण्यात आले आहे. अशा सुमारे चार हजार हून अधिक ग्रामोफोन रेकॉर्ड्स संस्थेकडे आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या शनिपाराजवळच संस्थेचे कार्यालय आहे. पुणे रेल्वेस्थानक, शिवाजीनगर रेल्वेस्थानक, पुणे बसस्थानक, स्वारगेट बसस्थानक या सर्व ठिकाणांहून शनिपाराकडे बस किंवा रिक्षेने जाता येते.
संस्थेने जतन केलेले दुर्मीळ ग्रामोफोन ध्वनिमुद्रण सीडीच्या माध्यमातून जतन करणे, विविध घराण्यांच्या मान्यवर कलाकारांना आमंत्रित करून त्यांचे गायन-वादन श्रोत्यांपर्यंत पोहोचविणे असे विविध संकल्प आहेत.
संस्थेकडे पाच हजार पुस्तकांचा समावेश असलेले ग्रंथालय आहे. पुस्तकांची संख्या वाढवून येथेच वाचनाची, त्याचप्रमाणे ऑडिओ-व्हिडिओ लायब्ररी करून संगीतश्रवणाची संधी देण्यासाठी सुविधा देण्याची इच्छा आहे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply