स्वर – मंच ॲकॅडमीपासून इतके दिवस कधी दूर राहिलो नव्हतो. पुन्हा एकदा सर्व पूर्ववत सुरू केले आणि मग कार्यक्रमांना सुरुवात केली. ‘नज़राना गीत – गज़लोंका’ हा नवीन कार्यक्रम आयोजक मोहन पवार यांच्यासाठी केला. अजून काही कार्यक्रमांसाठी महाराष्ट्राबाहेर गेलो. २७ फेब्रुवारी २०१० रोजी मराठी अभिमान गीत प्रकाशन सोहळा ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये संपन्न झाला. यावेळी आम्ही मराठी अभिमान गीताचे जाहीर गायन केले. यानंतर ‘गौरवशाली महाराष्ट्र-पन्नास वर्षे’ या दूरदर्शनवरील चर्चासत्रात मी भाग घेतला.
माझे मित्र हेमंत रणदिवे यांचा मुलुंडमधील ‘सेरेमोनियल हॉल’ हे माझे कार्यक्रम करण्याचे एक आवडते ठिकाण आहे. विशेषतः हिंदी गझलच्या मैफलीसाठी हा एक आदर्श हॉल आहे. २७ जून २०१० रोजी याच सेरेमोनियल हॉलमध्ये मी गझलचा कार्यक्रम केला. हा माझा ८५०वा जाहीर कार्यक्रम ठरला.
निर्माते किरण कुलकर्णी यांच्या भक्तीसंगीताच्या अल्बमसाठी मी एक गीत १२ जुलै २०१० रोजी रेकॉर्ड केले. संगीतकार विनय राजवाडे होते.
रेकॉर्डिंग संपवून दुपारी साडेबारा वाजता मी बाहेर पडलो तर अनेक मिस्ड कॉल मोबाईलवर दिसले. माझे मामा सुरेश धनवटकर यांचे भिवंडीला निधन झाले होते. ताबडतोब भिवंडीला पोहोचलो. माझा हा एकच सख्खा मामा होता. लहानपणापासूनच्या अनेक आठवणी मामा-मामीच्या भिवंडीच्या घराशी निगडित होत्या. माझ्या आईचा हा धाकटा भाऊ असल्याने आईलाही जबर धक्का बसला. माझी मामेभावंडे दीपक आणि ज्योती, शुभामामी, आम्ही सर्वच जण दुःखात बुडालो. पुढील आठ दिवस मी गाण्याचे कोणतेही काम केले नाही.
एक दिवस माझा संगीत संयोजक मित्र सुभाष मालेगावकर याचा फोन आला. “अनिरुद्ध ‘अनफरगेटेबल मदन मोहन’ करतोय. तुझी गरज आहे.
” ‘सुभाष अरे कार्यक्रमाचा मूड नाहीये.” मी काय झाले ते सांगितले. ते ऐकून घेतल्यावर सुभाष म्हणाला,
“शो मस्ट गो ऑन आणि मला सांग मदन मोहनच्या गझल तू नाही तर दुसरे कोण गाणार?” सुभाष नेमकेच बोलतो. मदन मोहनच्या गाण्यांचे अवघड पीसेस वाजवताना त्याच्यासमोर नोटेशनचा कागद नसतो. सगळे पीसेस त्याला पाठ आहेत. सुभाषचे म्हणणे मान्य करून मी पुन्हा कामाला लागलो. ‘अनफरगेटेबल मदन मोहन’ चा शो अप्रतिम झाला. या गाण्यांनी जादू केली आणि माझा संगीतप्रवास पुन्हा वेगाने सुरू झाला.
-अनिरुद्ध जोशी
Leave a Reply